गुजरात - देशाला हदरवून सोडणारी एक धक्कादायक घटना गुजरात मधील अहमदाबाद येथे घडली आहे. तब्बल 230प्रवासी आणि 12 क्रू मेंबर ला घेऊन निघालेले एयर इंडिया चे विमान अपघातग्रस्त झाले आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. या अपघातात मृत आणि जखमीचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.
विमानात 242 प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. अपघाताचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादच्या मेघानीनगर भागात आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसल्या. दूरवरून काळ्या धुराचे लोट दिसत होते. प्राथमिक माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळल्याचे मानले जात आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
विमानात क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते. अहमदाबाद पोलिस नियंत्रण कक्षाने याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला. विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली.
विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून आकाशात काळा धूर उठताना दिसत आहे. घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण निश्चित केलेले नाही. मेघानीनगर परिसरातील धारपूरमधून प्रचंड धूर दिसत आहे.
No comments:
Post a Comment