Tuesday, June 17, 2025

गंगाखेड शहरातील वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी सवंगडी कट्टा सज्ज! सेवेचे 10 वे वर्ष!


गंगाखेड (प्रतिनिधी) : परभणीतील गंगाखेड तालुक्यातील प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील संत जनाबाई मंदिर व परिसरात पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी विदर्भ व उत्तर मराठवाड्यातून निघालेल्या पायी दिंड्या रात्रीच्या मुक्कामी थांबतात. थकल्या भागलेल्या वारकऱ्यांसाठी गंगाखेड शहरातील सवंगडी कट्टा समूह वारकरी आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करणार आहे. सेवेचे हे त्यांचे 10 वे वर्ष असून सर्व महिला व पुरुष सवंगडी वारकऱ्यांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत.

वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार!

आषाढी एकादशी निमित्य विदर्भातून पायी पंढरपूरकडे जाणाऱ्या बहुतांश दिंड्या संत जनाबाईचे जन्मस्थान असलेल्या गंगाखेड येथे मुक्कामी थांबतात. येथील त्यांचा विसावा आनंदात जावा व पुढील प्रवासासाठी नवचैतन्य मिळावे. यासाठी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत पुरुष व महिलांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सवंगडी कट्टा समुहाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे वारकरी सेवा आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. यात शहरातील तज्ञ डॉक्टरांसह सेवांकुर संस्थेच्या डॉक्टरांच्या टीमकडून पायी दिंडीत सहभागी वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करत त्यांच्या हाता-पायाची इलेक्ट्रिकल मशीन तसेच हाताने मसाज केली जाते. मसाज करण्यासाठी महिला व पुरुष अशा दोन वेगवेगळ्या टिमसह सवंगडी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहे. या आरोग्य सेवा शिबिराची सुरुवात बुधवार 18 जून रोजी होत असून, सांगता 24 जुन रोजी होणार आहे. आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे उदघाटन प. पू. यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुशील राठी, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. केदार खटिंग, डॉ. हेमंत मुंढे, डॉ. किशन गारोळे, डॉ. बागेश्री भरड, घनश्याम मालपाणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. गंगाखेड येथे मुक्कामी येणाऱ्या हजारो वारकऱ्यांना या आरोग्य सेवा शिबिराचा लाभ होणार असून संत जनाबाईच्या पावन भूमीतील वारकऱ्यांचा मुक्काम अविस्मरणीय होणार आहे. प्रतिवर्षी प्रमाणे कट्टयातील सदस्यांनी वर्गणी करून वारकऱ्यांसाठी भरपूर औषधीसाठा उपलब्ध केला असुन, दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक प्रकाश घन, रमेश औसेकर, मनोज नाव्हेकर आदींनी केले आहे.

कट्टा समूहातील शिबीर यशस्वीतेसाठी सवंगडी!

शिबीर यशस्वीतेसाठी सवंगडी कट्टा समूहातील डॉ. किशोर कुगणे, डॉ. योगेश मल्लूरवार, डॉ. देविदास चव्हाण, डॉ. संजय भरड, डॅा. अनिल बर्वे, डॉ. सौ. शोभा काबरा, डॉ. सौ. बागेश्री भरड, अतुल तुपकर, संतोष तापडीया, नागेश पैठणकर, गजानन महाजन, ॲड. पंकज भंडारी, अक्षय जैन, नंदकुमार सोमाणी, सचिन नाव्हेकर, कारभारी निरस, संदीप कोटलवार, नागेश कोनार्डे, गोविंद रोडे, गजानन भारती, ऋषी काबरा, पुरुषोत्तम भंडारी, जगदिश तोतला, गोपाळ मंत्री, मकरंद चिनके आदी परिश्रम घेत आहेत.


No comments:

Post a Comment