Thursday, February 27, 2025

छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिवला जाता येईल रेल्वेने.नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल.





छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)   छत्रपती संभाजीनगरहून आगामी कालावधीत बीडधाराशिवलारेल्वेने काही तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला धाराशिवबीड- छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग ‘फास्ट ट्रॅक’वर घेत या प्रकल्पाच्या मंजुरीच्या दृष्टीने सविस्तर तपासणी करण्याची सूचना केली आहे.

छत्रपती संभाजीनगरहून बीड आणि धाराशिवला जाण्यासाठी आजघडीला रस्ते मार्गाशिवाय पर्याय नाही. अनेक वर्षांपासून हे जिल्हे रेल्वेने छत्रपती संभाजीनगरशी जोडण्याची प्रतीक्षा आहे. देशभरातील नव्या रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाची स्थिती जुलै २०२२ मध्ये समोर आली होती. यात धाराशिव- बीड-छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाचाही समावेश होता. त्यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु सर्वेक्षणानंतर हा रेल्वे मार्ग कागदावरच राहिला. बीडचे खा. बजरंग सोनवणे यांनी या रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. सोनवणे यांना एका पत्राद्वारे या मार्गासंदर्भात माहिती दिली. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गाच्या मंजुरीच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले आहेत, असे रेल्वेमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून कागदावर असलेला मार्ग आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.

रेल्वे मार्गाचा असा होईल फायदा.

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर हा रेल्वे मार्ग झाल्यास मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. या मार्गामुळे या तीन जिल्ह्यांमधील लोकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि स्वस्त होईल. प्रवाशांना बस किंवा खासगी वाहनापेक्षा कमी वेळेत आणि कमी खर्चात पोहोचता येईल. याचा थेट फायदा शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांना होईल. व्यापार आणि उद्योगांच्या दृष्टीने हा रेल्वे मार्ग फारच लाभदायक ठरेल. धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या भागांतील कृषी उत्पादनांची सहज वाहतूक होईल.

Wednesday, February 26, 2025

जिल्हाधिकाऱ्यांची कार जप्त, आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कैद करण्याचे न्यायालयाचे आदेश.


बीड  (प्रतिनिधी) एका भूसंपादन मावेजाप्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला कैद करण्याचा आदेश बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात भूसंपादनाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी माजलगावच्या न्यायालयाने मावेजाप्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची कार जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच बीडच्या दिवाणी न्यायालयाने आणखी एक आदेश दिला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बीड येथील राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभागाने ( स्थानिक स्तर) प्रकल्पासाठी संपादित केली होती. त्याचा मावेजा देण्याचा आदेश २०१८ मध्ये देण्यात आला होता. मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही. त्यामुळे १३ लाख १९ हजार रुपयांच्या मावेजासाठी शासनाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता यांना कैद करावे तसेच त्यांच्याकडून मावेजाची रक्कम भरणा करुन घ्यावी, अशा आदेशाचे वॉरंट बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने काढले आहेत. या वॉरंटची अंमलबजावणी २१ मार्चपूर्वी करावयाची आहे.

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद.भक्तांच्या सेवेतच खरी ईश्‍वरसेवा - प्रकाशसिंह खोब्रागडे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- "बोल बम! हर हर महादेव!" च्या जयघोषात न्हालेल्या परळी नगरीत महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची अलोट गर्दी झाली होती. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे, श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून आलेल्या शिवभक्तांसाठी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वतीने ५० क्विंटल नायलॉन फराळ महाप्रसाद स्वरूपात वाटप करण्यात आला.
या शुभकार्याचा प्रारंभ अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनीचे अधिकारी श्री.प्रकाश सिंह व कुलदीप खोब्रागडे यांच्या शुभहस्ते दि. २६ रोजी सकाळी करण्यात आला. श्रद्धेने मंदिरात आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेत मोठ्या भक्तिभावाने दर्शन लाभ घेतला. "भक्तांच्या सेवेतच खरी ईश्‍वरसेवा आहे," या भावनेतून  अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी .प्रकाश सिंह  प्रकाश सिंह. कुलदीप खोब्रागडे बाबासाहेब चिकाटे. विवेकानंद शिंदे.रोशन कोकुलवार.रघु घनघव. बाळासाहेब मुंडे.अन्वर भायाकर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, उत्साहात व भक्तीभावाने सेवा अर्पण केली.
परळी नगरीत शिवभक्तांच्या सेवेसाठी उभारलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिवरायाच्या कृपेने आणि अशा सेवाभावी कार्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहो, हीच प्रार्थना!

बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा वाळू माफियांना जोरदार दणका. वाळू माफियांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा.


बीड (प्रतिनिधी) बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. जिल्ह्यातील तब्बल 38 ते 40 वाळू माफियांनी गेल्या दोन तीन महिन्यात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी तब्बल 80 कोटिपेक्षा अधिकारी रकमेचा दंड केला आहे. दंड न भरल्यास संबंधित वाळू माफियांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला आहे. त्यानुसार बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी चार वाळू माफियांच्या मालमत्तेवर बोजा टाकण्याचे आदेश दिले आहेत. अविनाश पाठक यांच्या या कारवाईने वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, परळी, आष्टी या भागात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होतं असल्याच्या तक्रारी येतं होत्या. विशेष बाब म्हणजे अनेक तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस कर्मचारी हेच या वाळूच्या माफियासोबत पार्टनर असल्याचे समोर आले होते

या सर्व बाबीचा अभ्यास केल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 40 वाळू माफि्यांच्या गाड्यामधून गेल्या दोन महिन्यात किती वाळू वाहतूक झाली याचे फुटेज पाडळसिंगी येथील टोल नाक्यावरून घेतले. त्यानंतर या वाळू माफियांना तब्बल साडेअकरा हजार नोटीस पाठवण्यात आल्या.त्यावर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या सर्वाना किमान दोन ते जास्तीत जास्त पाच कोटी रुपये दंड केला.

बीड तालुक्यातील पालवण येथील बाबासाहेब एकनाथ मस्के याला दोन कोटी ब्यानव लाख साथ हजार दंड केला, तसेच त्याच्या पालवण येथील गट न 120,124 आणि 88 मधील मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला आहे. कुर्ला येथील निहाल मजीद पठाण याला तीन कोटी आठ्यांऐंशी लाख बासष्ठ हजार रुपये दंड करून त्याच्या कुर्ला येथील गट न 170,138 आणि बीड येथील घरावर बोजा टाकला आहे.

कुर्ला येथीलच महेश केरबा गुंड याला एक कोटी साठ लाख एक हजार रुपये दंड करून त्याच्या गट न 14 मधील मालमत्तेवर बोजा टाकला आहे. त्याचप्रमाणे पालवण येथील वाळू माफिया मनोज रामभावू पवार याला चार कोटी अठ्यांनव लाख छत्तीस हजार रुपये दंड केला असून त्याच्या घोसापुरी येथील गट न 131,पालवण येथील गट न  319,गवळवाडी येथील गट न  94 आणि बीड येथील घरावर बोजा टाकण्यात आला आहे.याबाबतचे आदेश बीडचे तहसीलदार शेळके यांनी काढले आहेत.जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफियावर धडाकेबाज कारवाई सुरु केल्याने मागील महिना दीड महिन्यापासून वाळू चोरीचे प्रकार थांबल्याचे चित्र आहे.

प्रभु वैद्यनाथांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी.मंदिर परिसर भाविकांनी फुलला.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : हर हर महादेव , ओम नमः शिवाय चा जयघोष करत  बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी देशातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील  प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे महाशिवरात्रीच्या दिवशी  बिल्व पत्र वाहून दर्शन घेतले आहे . तसेच धर्मदर्शन रांगेत उभे टाकून दर्शन घेणाऱ्या भाविकांची  वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्या पर्यंत रीघ लागली आहे. दर्शनासाठी भाविकांच्या महिला, पुरुष व पासधारक  अशा तीन रांगा लावण्यात आल्या आहेत. महाशिवरात्रीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. तर आज सकाळी सहानंतर या गर्दीत मोठी वाढ झाली आहे. 

श्री वैद्यनाथ मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलला आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरातील प्रति वैद्यनाथ  मंदिर , पंचमुखी महादेव मंदिर,संत जगमित्र नागा मंदिर, श्री गणपती मंदिर, सूर्येश्वर मंदिर, जिरेवाडीतील श्री सोमेश्वर मंदिर, तसेच धर्मापुरी, लाडझरी येथील महादेव मंदिरात  भाविकांची गर्दी दिसून आली. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील  वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्त दाखल झाले आहेत. रांगेत थांबून भाविक दर्शन घेऊ लागले आहेत. श्री वैद्यनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट उभारण्यात आले असून त्यावर कापडी मंडप टाकण्यात आला आहे त्यामुळे  उन्हा पासून  रांगेत थांबलेल्या भाविकांचा बचाव होत आहे. 

वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 200 च्या वर पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहे तसेच येणाऱ्या भाविकांना वैद्यनाथ मंदिर रोडवर विविध संस्थेच्या वतीने खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात  येत आहे :महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त प्रजापिता 'ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय' द्वारा संत जगमित्र नागा मंदिर परिसरात  26 फेब्रुवारी रोजी सकाळी ६ते रात्रौ ९ या वेळेत 'शिवलिंग अमरनाथजी बाबा बर्फानी दर्शन'!!ची  सुविधा करून देण्यात येत आहे येथे ही भाविकांची गर्दी होत आहे.

Tuesday, February 25, 2025

आळंदीतील प्रेमविवाहांचा धक्कादायक ट्रेंड; पळून जाऊन लग्न,अन् काही दिवसांत घटस्फोट.

आळंदी (प्रतिनिधी) पुण्यातील आळंदी येथे पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी 70% जोडपी घटस्फोट घेत आहेत, ही बाब समोर आली आहे. सोलापूरच्या एका जोडप्याने सहा-सात वर्षे प्रेमसंबंधानंतर लग्न केले, पण लग्नाच्या रात्रीच मुलीने लग्न तोडण्याचा निर्णय घेतला, हे याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

लग्नानंतर घटस्फोटाचे प्रमाण अधिक

प्रेमविवाह करणाऱ्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. अनेक जोडपी घरच्यांना न सांगता आळंदीत पळून जाऊन लग्न करतात. झटपट लग्न लावून देणारी यंत्रणा आळंदीमध्ये कार्यरत आहे.

व्यसनाधीनता आणि शिक्षणाचा अभावआहेत.

 प्रेमविवाह फसण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील व्यसनाधीनता आणि शिक्षणाचा अभाव ही देखील कारणे आहेत.

कौटुंबिक आणि सामाजिक तफावत : नोकरी व्यवसायामध्ये कमी मोबदला, दोन्ही कुटुंबांमधील सामाजिक, आर्थिक स्थिती, सवयी, परंपरा, आदींमध्ये असणारी प्रचंड तफावत, सत्य परिस्थिती यामधील विरोधाभास, आदी कारणे पुढे येत आहेत.

मुलांची जबाबदारी: दरम्यानच्या काळात जोडप्यांना मूल झाले तर त्याची जबाबदारी घेण्याविषयीची संदिग्धता निर्माण होते, अशी निरीक्षणे नोंदविली आहेत.

समुपदेशकाचा सल्ला

समुपदेशक पी. पी. केरकर म्हणतात, “प्रेमाने पोट भरत नसते. त्यासाठी व्यवहारही लक्षात घ्यावा लागतो. हे व्यावहारिक ज्ञान अनेक जोडप्यांना नसते. समुपदेशनाने याची जाणीव करून दिली जाते. तेव्हा पळून जाऊन लग्न केलेले जोडपे काही सेशन्सनंतर पुढे एकत्र प्रवास करण्यासाठी तयार होतात. तरीही या प्रेमीयुगुलांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.” 


Monday, February 24, 2025

आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वाढणार तरी कधी?;अत्यल्प शुल्कामुळे संस्था चालक हैराण


मुंबई (प्रतिनिधी): आरटीई कायद्यांतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर मुलांचे मोफत प्रवेश होतात. या बालकांची फी राज्य सरकारच्या वतीने दिली जात असली तरी ती सध्याच्या महागाईच्या तुलनेत प्रतिपूर्तीची रक्कम तुटपुंजी आहे. एवढ्या अल्प रकमेत शाळा चालवायच्या कशा असा सवाल खासगी संस्थाचालकांनी केला आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्कप्रतिपूर्तीचा प्रत्येकविद्यार्थ्याच्या मागे शाळांना देण्यात येणारी रक्कम शालेय शिक्षण विभागाने निश्चित करत शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील 1 लाखाहून अधिक शाळांना ही रक्कम वाढेल अशी यंदा आशा होती. तथापि, शैक्षणिक वर्ष 2024-2025 या वर्षात प्रतिविद्यार्थी 17 हजार 670 रुपये या दराने शुल्क प्रतिपूर्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.गेले कित्येक वर्ष हीच रक्कम आहे. गेल्या चार वर्षापूर्वी तरी कोरोना काळात 8 हजार रुपये दिले होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक ही प्रतिपूर्ती 2012- 13 पासून कोणतीही प्रतिपूर्ती शासनाने शाळांना वेळेत आणि सुरळीतपणे दिलेली नाही यामुळे थकबाकी कोट्यवधींनी वाढली आहे.

जूनपासूनच शैक्षणिक वर्ष सुरू होणार सीबीएसईच्या धर्तीवर यंदापासून पहिलीचा अभ्यासक्रम.


मुबई (प्रतिनिधी)  यंदाचे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून नव्हे, तर जूनपासूनच सुरू होणार आहे. सोबतच सीबीएसईच्या धर्तीवर यंदापासून पहिलीचा अभ्यासक्रम तयार केला जात असून त्यासंदर्भातील अंमलबजावणी होणार असल्याची महिती शालेय शिक्षण विभाकडून देण्यात आली आहे.

नव्या शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळाही सीबीएसईच्या धर्तीवर एक एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षक, शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्यात संभ्रम निर्माण झाला. याला राज्यातील शिक्षकांनी आता तातडीने हे कसे शक्य आहे, असे सांगत नाराजी व्यक्त केली.

यावर शालेय शिक्षण विभागाने केलेल्या खुलाशानुसार शैक्षणिक वर्ष जूनपासूनच सुरू होणार असून केवळ नव्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. या अभ्यासक्रमाची आखणी सीबीएसईच्या धर्तीवर केली असून हा बदल वगळता शाळांच्या वेळापत्रकात काहीही बदल झालेला नाही.

याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शाळांच्या वेळापत्रकात यंदा तरी असा कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. शिक्षण विभागाच्या राज्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिली आणि शक्य झाल्यास इयत्ता दुसरीसाठी एनईपी लागू करणे म्हणजेच राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवी पुस्तके आणि बदललेल्या पद्धतीने शिक्षण देणे हा बदल होणार आहे. तथापि, शाळा नेहमीप्रमाणे जून महिन्यातच सुरू होतील, असे सिंह यांनी स्पष्ट केले.

शून्यातून विश्व निर्माण करणारे परळीतील उद्योजक : वैजनाथअप्पा कोल्हे यांचा संघर्षमय प्रवास आणि भव्य यश

रस्त्यावर किराणा दुकान सुरु करुन स्वतःचे सुपर मार्केट निर्माण करणारे प्रेरक व्यावसायिक कुटुंब !

शिवम् सुपर मार्केट : एक भव्य स्वप्न साकारले!

कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं!-हे परळी वैजनाथ येथील सुप्रसिद्ध उद्योजक वैजनाथअप्पा कोल्हे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास करत त्यांनी परळी शहरातील ‘शिवम् सुपर मार्केट’ या भव्य व्यावसायिक साम्राज्याची उभारणी केली आहे. आज त्यांचे नाव केवळ यशस्वी उद्योजक म्हणूनच नव्हे, तर समाजसेवेतील एक आदर्श म्हणूनही घेतले जाते.

*संघर्षाचे दिवस : लहानपणातील कठीण परिस्थिती*

वैजनाथअप्पा कोल्हे यांचे बालपण हे अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. वडील लक्ष्मणअप्पा आणि आई शिवबाई यांनी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी आपल्या मुलांना जगण्याचे संस्कार दिले. वैजनाथअप्पा यांना लहान भाऊ दिलीप होता, मात्र नियतीने त्यांच्यावर मोठा आघात केला. एका दुर्दैवी अपघातात लहान भावाचा मृत्यू झाला आणि कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले. घरची परिस्थिती बेताची असल्याने वैजनाथअप्पा यांनी शिक्षण घेत असतानाच वडिलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मोंढा भागातील एका किराणा दुकानात खाजगी नोकरी केली. तब्बल 16 वर्षे त्यांनी या दुकानात काम करत अनुभव घेतला. मात्र, संपूर्ण आयुष्य दुसर्‍याच्या नोकरीत घालवायचे नाही, तर स्वतःचा व्यवसाय करायचा हे त्यांनी ठरवले.

*स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात : लहान दुकान ते सुपरमार्केट*

1996 साली त्यांनी मोंढा भागातील आठवडी बाजारात किराणा विक्रीला सुरुवात केली. सुरुवातीला फारशी मोठी गुंतवणूक नव्हती, म्हणून त्यांनी जमिनीवर दुकान थाटले. परंतु, मेहनतीची जोड असल्याने ग्राहकांचा विश्वास वाढत गेला. त्यानंतर त्यांनी ‘शिवम् किराणा स्टोअर्स’ या नावाने स्वतःचे दुकान सुरू केले. सुरुवातीपासूनच त्यांनी दर्जेदार आणि स्वच्छ माल ग्राहकांना पुरवण्यावर भर दिला. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे ग्राहकांची संख्या वाढत गेली. व्यवसाय यशस्वी होतोय हे लक्षात आल्यावर 2008 साली त्यांनी ‘शिवम् सुपर शॉपी’ या नावाने अत्याधुनिक सुविधा असलेले किराणा दुकान सुरू केले.

*‘शिवम् सुपर मार्केट’ ची भव्य सुरुवात : यशाचा नवा अध्याय*

22 फेब्रुवारी 2025 रोजी परळी शहरातील नाथ टॉकीज रोडवर ‘शिवम् सुपर मार्केट’ या नावाने त्यांनी नव्या, भव्यदिव्य वास्तूत व्यवसायाचा विस्तार केला. ही सुपरमार्केट संकल्पना अत्याधुनिक असून, येथे ग्राहकांना उत्तम दर्जाचे किराणा व घरगुती वस्तू एकाच छताखाली मिळणार आहेत. परळी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांच्या या नव्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.

*व्यवसायाच्या यशामागे कुटुंबाची साथ*

वैजनाथअप्पा यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. चंद्रकलाताई कोल्हे यांची मोठी साथ लाभली. त्यांनी त्यांच्या पतीच्या व्यवसायात सतत पाठिंबा दिला आणि घर तसेच व्यवसाय दोन्ही मोठ्या जबाबदारीने सांभाळले. त्यांना तीन अपत्ये आहेत-शिवम, शुभांगी आणि शितल. तिघांचाही विवाह मोठ्या आनंदाने पार पडला आहे. मुलगा शिवम हा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत व्यवसायात हातभार लावत आहे. त्याने आपले पदवी शिक्षण पूर्ण करून आता पूर्णवेळ ‘शिवम् सुपर मार्केट’ सांभाळण्यास सुरुवात केली आहे.

*श्रद्धा आणि समाजसेवा : वैजनाथअप्पा कोल्हे यांचा आणखी एक पैलू*

केवळ व्यवसाय वाढवणे हेच उद्दीष्ट न ठेवता, वैजनाथअप्पा हे श्रद्धा आणि समाजसेवेलाही तेवढेच महत्त्व देतात. ते पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथाचे निस्सीम भक्त आहेत. दररोज सकाळी 5 वाजता ते मंदिरात जाऊन दर्शन घेतात. याशिवाय, महिन्यातील प्रत्येक अमावस्येला श्री शनी मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना तेली समाज बांधवांसह खिचडी प्रसाद वाटतात. हा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू असून, त्यातून त्यांची निःस्वार्थ सेवा वृत्ती दिसून येते.

*वैजनाथअप्पा कोल्हे : नव्या पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व*

शून्यातून विश्व निर्माण करणारे, जिद्दीने संघर्ष करत मोठे यश मिळवणारे आणि तरीही जमिनीवर राहून सामाजिक बांधिलकी जपणारे असे वैजनाथअप्पा कोल्हे यांचे व्यक्तिमत्त्व निश्चितच प्रेरणादायी आहे.

*एक नव्या पर्वाची सुरुवात!*

परळी शहरातील नंबर 1 किराणा व्यवसायिक म्हणून ओळख निर्माण करणार्‍या वैजनाथअप्पा कोल्हे यांचे ‘शिवम् सुपर मार्केट’ हे त्यांचे ध्येय आणि मेहनतीचे फलित आहे. भविष्यात हे सुपरमार्केट केवळ परळीपुरते सीमित न राहता, संपूर्ण जिल्ह्यात नावाजले जाईल याची खात्री आहे. स्वप्नं मोठी बघा आणि ती साकार करण्यासाठी अथक प्रयत्न करा!-हेच वैजनाथअप्पा कोल्हे यांच्या प्रवासातून शिकायला मिळते.

*वैजनाथअप्पा कोल्हे यांचा जीवनप्रवास आजच्या तरुणांसाठी शिकण्यासारखा आहे:*
*कष्टाशिवाय यश मिळत नाही*
*प्रामाणिक सेवा हीच ग्राहक मिळवण्याची गुरुकिल्ली आहे*
*श्रद्धा आणि समाजसेवा हाच खरी समृद्धी आहे*

                 *संतोष जुजगर* 
                   परळी वैजनाथ

Friday, February 21, 2025

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीडजिल्हा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जाहीर परळी तालुका अध्यक्षपदी बालासाहेब फड यांची निवड.

*प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे. 
 
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेने जिल्ह्यातील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.तसेच  आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी दीपक जाधव यांची तर बीड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी प्रतिक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांनी तत्काळ नवीन सभासद नोंदणी करून तालुकास्तरीय उर्वरित कार्यकारिणी जाहीर करावी असेही कळवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य समन्वयक संतोष मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष बालाजी तोंडे आणि जिल्हाध्यक्ष शेख रिझवान यांनी जिल्ह्यातील नवीन तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे.या मध्ये
बीड -धनंजय गुंदेकर 
परळी - बालासाहेब फड 
अंबाजोगाई - गोविंद महाराज केंद्रे 
केज - दुर्गादास लांब 
आष्टी - प्रविण पोकळे
धारूर -परमेश्वर राऊत 
पाटोदा -महेश बेदरे 
शिरूर -शहेबाज पठाण 
माजलगाव -अंगद दराडे 
गेवराई- राहुल लोंढे 
वडवणी - दत्ता कराड
        यांचा समावेश आहे.तसेच बीड शहर अध्यक्ष पदी प्रतिक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व शहर अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी त्यांना प्रभारी करण्यात आले आहे.त्याच प्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष या रिक्त पदी आष्टी चे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांची राज्य कार्यकारी समितीच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात आणि शहरात नवीन सभासद नोंदणी करून स्थानिक कार्यकारिणी जाहीर करावी असे जिल्हा संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सर्व तालुका अध्यक्ष यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

काॅफी मुक्तीचा फज्जा! जिल्हा परिषदेचे सिइओ जिवने यांची परीक्षा केंद्रावर धडक! केंद्रचालकसह विद्यार्थीवर कारवाई.


बीड (प्रतिनिधी) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून बीड जिल्ह्यात सुरू असून शुक्रवारी मराठीच्या पहिल्याच पेपरला बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी बीड शहरातील विविध केंद्रांना भेट देऊन मराठी विषयाचे पेपर ला कॉपी करताना एका विद्यार्थ्याला रेस्ट तिकीट केले आहे .


पासून बीड जिल्ह्यातील 156 केंद्रावर इयत्ता दहावीचा मराठी विषयाचा पेपर होता.मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी बीड शहरातील शिवजी माध्यमिक विद्यालय, बीड येथे सर्व प्रथम भेट दिली भेटीच्या वेळी केंद्रावर अनियमितता दिसून आली.तर केंद्र संचालक याच्यावर कारवाई चे निर्देश देण्यात आले.
भगवान विद्यालय बीड येथे भेट दिली असता cctv, खिडक्याचे तावदाने व परीक्षा केंद्राबाहेरील त्रास,गर्दी कमी करण्याच्या सूचना केंडसंचालक व पोलीस यंत्रणेला दिल्या.
चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला त्या विद्यार्थ्यांला रेष्ट तिकीट करण्यात आले.त्या नंतर इंदीरा गांधी उर्दू केंद्राला भेट दिली.
परिक्षा केंद्राबाहेरील उपद्रव, सी.सि. टी.व्ही कॅमेरे, खिडक्यांची तावदाने, प्रत्येक परीक्षा केंद्र कॉपीमुक्त,बैठेपथक,
   बाबत भेटीच्या वेळी केंद्रसंचालक उपस्थित शिक्षण विभागाच्या यंत्रणेला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत
यावेळी शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी नानभाऊ हजारे,प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद तुरूंकमारे व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पं. स.बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम पवार उपस्थित होते.

IPS अधिकाऱ्याची वेशांतर करून वाळू माफियांवर कारवाई; पाच हायवांसह दोन जेसीबी ताब्यात.


अंबड (प्रतिनिधी) : अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथे दुधना नदीपात्रात सोमवारी मध्यरात्री प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांनी वेशांतर करून वाळू माफियांविरूद्ध धडाकेबाज कारवाई केली. वाळू तस्करी करणाऱ्या पाच हायवांसह दोन जेसीबी ताब्यात घेण्यात आले आहेत. वाहनांसह सुमारे अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाच वाळूतस्करांना ताब्यात घेतले आहे.

अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शिवारातून जाणाऱ्या दुधना नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करून बेसुमार वाळू उपसा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंबड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांनी वेशांतर करून एका हायवामधून दुधना नदीचे पात्र गाठले. नदीतून वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांना आणि जेसीबी, हायवाचालकांना पोलिस आल्याची कुणकुण देखील लागली नाही. आयपीएस बारवाल हे हायवातून खाली उतरताच त्यांच्यासोबत असलेल्या साध्या गणवेशातील पोलिसांनी वाळू उपसा करणाऱ्या हायवा, जेसीबी वाहने आणि चालकांना गराडा घातला. त्यामुळे त्याठिकाणी असलेली वाहने आणि चालकांना पलायन करता आले नाही. जायमोक्यावरून वाळू उत्खनन करणारे दोन जेसीबी आणि पाच हायवा वाहने ताब्यात घेतले.

सकाळपर्यंत कारवाई.

वाळू माफियांविरूद्धची कारवाई साेमवारी मध्यरात्री एक वाजता सुरू झाली. ही कारवाई मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. या धडाकेबाज कारवाईत पाच वाळूतस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे २ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. ठुबे, उपनिरीक्षक भगवान नरोडे, विष्णू चव्हाण, दीपक पाटील, तायडे, हिरामण फलटणकर, अरुण मुंडे, भिसे, साठेवाड, चालक भानुसे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

सरकारी अधिकाऱ्यांमुळे एसटी महामंडळा ला 30 कोटींचा फटका कामगार संघटने चा आरोप.

मुंबई (प्रतिनिधी): एसटीचा तोटा वाढतोय म्हणून एकीकडे भाडेवाढ करण्यात आली असताना दुसरीकडे मात्र सरकारी अधिकाऱ्यांमुळे एसटी महामंडळाला जवळपास 30 कोटींचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या अखत्यारीत असलेली दुकाने, गाळे यांची मुदत संपूनही अशा गाळेधारकांना बाहेर काढण्यात आले नाही. त्याच्या परिणामी एसटी महामंडळाचे मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेले वाणिज्य आस्थापना म्हणजेच दुकान गाळे, हॉटेल गाळे, पान टपऱ्या मुदत संपूनही घुसखोरांच्या ताब्यात आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा अधिकार हा निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांचा आहे . पण त्यांनी आस्थापना धारकांशी हातमिळवणी करून वेळीच कारवाई न केल्याने आर्थिक आणीबाणीच्या काळात एसटीला तब्बल 30 कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटीच्या मालकीच्या किती गाळ्याचे भाडे थकले?

एसटीच्या स्व मालकीच्या बांधीव व मोकळ्या जागेतील 3500 वाणिज्य आस्थापना म्हणजेच दुकान गाळे, हॉटेल गाळे व विविध वस्तू भांडार असून त्याचा मुख्य उद्देश प्रवाशांना मूलभूत सोयी देणे असतानाही, त्यातील तब्बल 677 गाळे हे विविध कारणांनी वर्षानुवर्षे भाडे तत्वावर देण्यात आलेले नाहीत. एकूण 2081 गाळे प्रत्यक्ष कार्यरत असून त्या पैकी 1880 गाळ्यांचे नियमित भाडे येत आहे. त्यातील 201 गाळे रिकामे असून काही गाळे मुदत संपून सुद्धा गाळे धारकांनी सोडलेले नाहीत. त्यामुळे साधारण 30 कोटी रुपये बुडाले आहेत. त्याचे पुढे नियमानुसार भाडे सुद्धा ते देत नाहीत. या शिवाय अजून काही आस्थापना धारक हे न्यायालयात गेले असून वर्षानुवर्षे अशी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे साधारण 44 कोटी रुपये इतके उत्पन्न बुडाले असून न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी असल्याचे बरगे यांनी सांगितले.

उप जिल्हाधिकाऱ्यांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष?

मुदत संपूनही वेळेवर गाळे रिकामे न करणाऱ्या घुसखोराना बाहेर काढण्याचा निष्कसणाचा अधिकार निष्कासन अधिनियम 1955 नुसार हा त्या जिल्ह्यातील निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत येत असल्याने एसटीचे अधिकारी भाडे वसुली करण्यास हतबल ठरले असल्याचा आरोप बरगे यांनी केला. घुसखोरांना बाहेर काढण्यास निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांकडून कुचराई होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यात भ्रष्टाचार होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा कारवाईचे अधिकार अधिनियमात बदल करून एसटीच्या त्या त्या प्रदेशातील जे अधिकारी एसटीच्या जागांचे व्यवस्थापन सांभाळतात अशा सक्षम एसटी अधिकाऱ्यांना दिले पाहिजेत, अशी मागणीही बरगे यांनी सरकारकडे केली आहे.

Saturday, February 15, 2025

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात श्री. संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. 
15 फेब्रुवारी रोजी श्री.संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य अतुल दुबे यांच्या हस्ते श्री.संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे धुप दिप व पुष्पहार अर्पण करून पूजन करत अभिवादन करण्यात आले.
यावेळी मिरवट केंद्रप्रमुख एम.बी. कुचेकर, ग्रामपंचायत अधिकारी के.ए.शिंदे, मुख्याध्यापक प्रा.शा. तळेगाव बी.के.खाडे महाविद्यालयाचे प्रा . एस.आर.कापसे, प्रा. ए.डी.शेख, मिलिंद प्रा.शा.चे श्रीराम पवार, एस.बी.अष्टेकर व्ही.एन.शिंदे , जी.व्ही.कांबळे , ए.बी.जगतकर , यु.बी.जगताप यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

एसटी चालकाचा लेक झाला सरकारी अधिकारी.आष्टी तालुक्यातील ७ जणांची एमपीएससी.यश महसूल सहाय्यकपदी झाली निवड.


आष्टी (प्रतिनिधी) सरकारी अधिकारी होण्याची अनेकांची इच्छा असते. प्रशासकीय सेवेत काम करुन काहीतरी करण्याचे स्वप्न त्यांचे असते. यासाठी अनेक गावाखेड्यातील मुले एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देतात. या स्पर्धा परीक्षांमध्ये फार कमी लोकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते. परंतु कितीही अपयश आले तरीही पुन्हा प्रयत्न करणारा व्यक्ती नक्कीच यशस्वी होतो. असंच यश बीडच्या आष्टी तालुकांना तरुणांना मिळालं आहे. तालुक्यातून ७ जणांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. त्यातील एक मुलगा एसटी चालकाचा लेक आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यातील एसटी चालकाच्या मुलाने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज करून दाखवले आहे. या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा होतोय. विशेष बाब म्हणजे एकट्या आष्टी तालुक्यातून सात जणांची एमपीएससीतून महसूल सहायक पदी निवड झाली आहे.

पाटोदा तालुक्यातील पाटसरा येथील पोपट गर्जे एसटी महामंडळात चालक आहेत. मुलाला खडतर परिस्थितीत उच्च शिक्षण देऊन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातील नितीन गर्जे याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत महसूल सहाय्यक पदी गवसणी घातली आहे. गावी पोहोचताच त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आई-वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा करण्यात आला.

आपल्या मुलाने काहीतरी करावं, खूप मोठं व्हावं, असं प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असतात. त्यासाठी मुलं दिवसरात्र मेहनत करुन अभ्यास करतात. एसटी चालकाच्या मुलाचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याने खूप मेहनत करुन हे यश मिळवलं आहे.

आ.सुरेश धस आणि ना.धनंजय मुंडे च्या भेटीने तर्क-वितर्क धसानी विश्वासार्हता गमावली का ? धनंजय देशमुखांची संयमी भूमिका.


बीड (प्रतिनिधी)   बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस हे मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत होते. मात्र नुकतीच धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून वेगवेगळे तर्क-वितर्कही लढवले जात आहे. अशातच मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत या भेटीविषयी आपली भूमिका मांडली आहे.

"सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट का घेतली, याबाबत अद्याप मला पूर्ण माहिती मिळालेली नाही. या दोघांमध्ये भेटीत काय चर्चा झाली, हे समजल्यावरच मी त्यावर व्यक्त होणं योग्य राहील. परंतु काहीही झालं तरी आपण न्यायाच्या भूमिकेत असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही," असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

सुरेश धसांनी काय स्पष्टीकरण दिलं?

"मी स्वत: धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये मी त्यांच्या विरोधातच राहणार आहे," असं धस यांनी या भेटीवर स्पष्ट केले. याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. बावनकुळे यांच्यासोबत भेट झाली का, या प्रश्नावर बावनकुळे यांची माझी आता भेट होईल. बावनकुळे काय म्हणाले ते त्यांनाच बोला मला विचारू नका.  मी परवाच गेलेलो. तब्येतीची चौकशी करणे यात गैर नाही. संतोष देशमुख हत्येचा लढा आणि चौकशी यात कोणताही संबंध नाही, असं धस यांनी सांगितलं. 

दरम्यान,  मुंडे आणि धस यांच्या भेटीसाठी आपण मध्यस्थी केल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत:च सांगितले. ही भेट आपल्या घरी झाल्याचे ते म्हणाले. चार-साडेचार तास आम्ही तिघे एकत्र होतो, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. ही भेट नेमकी कधी झाली असे विचारले असता, बावनकुळे यांनी तारीख, दिवसाचे काय करता? असा प्रतिप्रश्न केला. आ. सुरेश धस यांनी मात्र मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने विचारपूस करण्यासाठी आपण मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो, असे सांगितले. 

Thursday, February 13, 2025

आष्टी उपवन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची धाडसी मोहीम बिबट्या जेरबंद.


पाटोदा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील मातावळी, वनवेवाडी तसेच भुरेवाडी परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून वावरणारा बिबट्या अखेर आष्टी उपवन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाडसी मोहीम राबवत जेरबंद केला. पाटोदा तालुक्यातील कारेगाव व मेंगडेवाडी येथे हल्ला करणारा हाच बिबट्या आहे का? याबाबत वनविभागाकडून पुष्टी मिळालेली नाही.

आष्टी, पाटोदा तालुक्यामध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील युवकावर पाच दिवसांपूर्वीच बिबट्याने हल्ला केला होता, तर त्याच दिवशी मेंगडेवाडी येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर वनवेवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले. वनविभागाने राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. बिबट्या पकडल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या मनातील भीती व दहशत कमी होणार आहे.

विहिरीत पडला अन् पकडला.

वनवेवाडी परिसरात बिबट्या विहिरीमध्ये पडल्याचे तेथील ग्रामस्थांनी वनविभागाला संपर्क करून माहिती दिली. आष्टी उपवन विभागातील कर्मचारी व सौताडा येथील वनविभागाचे कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले. तब्बल दोन ते तीन तास हे ऑपरेशन चालू होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये आष्टी उपवन विभागाचे जायभाय, यादव तागड, काळे, आरगडे, पंदेलवाड, शिंदे, विधाते, अशोक खामकर, भाऊसाहेब पेचे, नवनाथ उबाळे, शहादेव टेकाळे, युनुस शेख, हरिभाऊ वनवे आदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

बीडची गुन्हेगारी कधी थांबणार सामान्य माणसाला पडलेला प्रश्न? पोलिस अधीक्षक बदलले पण गंभीर गुन्ह्याच्या घटना सुरूच.

जिल्ह्यातील गुन्हेगारी पाहता बीडला बिहार संबोधण्यात आले. बीडमधील भयान वास्तव अनेकांनी मांडले. यामुळे बीडची चर्चा राज्यभर झाली. त्यातच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या भरदिवसा अपहरण करून हत्या करण्यात आली. यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही मोकाटच आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक जुने प्रकरणेही आता समोर येऊ लागले आहेत. तसेच, जिल्ह्यात चोरी, घरफोडींसह इतर गंभीर प्रकारही थांबत नसल्याचे दिसते. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी वाळू माफिया, गुटखा माफिया, गुंडांना बोलावून घेत समज दिली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या, परंतु तरीही गुन्हेगारीला लगाम लागत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आजही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे.

गुन्हे उघड होईनात?

मागील काही दिवसांपासून गुन्हे उघड होण्याचे प्रमाण घटले आहे. चोऱ्या २४ टक्के, तर घरफोड्याचे गुन्हे अवघे १६ टक्के उघड झाले आहेत. पोलिसांकडे विचारणा केल्यास तपास चालू, एवढेच उत्तर देऊन तक्रारदाराला परत पाठविले जाते. अनेक गुन्हे हे दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत.

एलसीबीचे काम कमी अन् वादग्रस्तच जास्त.

पोलिस अधीक्षकांच्या थेट आखत्यारीत एलसीबी असते. येथे पोलिस अधिकारी, कर्मचारीही भरपूर आहेत. परंतु, चोरी, घरफोडी, लुटमारीचे तपास फारसे होत नाहीत. एकीकडे तपास कमी असतानाही ही शाखा वादात सापडली आहे. भाजपचे आ. सुरेश धस यांनी पोलिस निरीक्षक उस्मान शेख, उपनिरीक्षक महेश विघ्ने, कर्मचारी सचिन सानप यांच्यावर थेट आरोप केले होते. याच शाखेतील कर्मचारी काही महिन्यांपूर्वी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. सोमवारी या शाखेची वार्षिक तपासणी पोलिस अधीक्षकांनी केली. यात काम सुधारण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

९९ कारवाया दारूबंदीच्या वाढल्या.

दारू बंदीच्या कारवायांमध्ये जानेवारी २०२५ मध्ये ९९ ने वाढ झाली आहे. तर, जुगारामध्ये १८ ने घट झाली.

या मोजक्या घटना वाचा१ - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. चिकन कापण्याच्या सत्तूरने वार केले. वाहनेही जाळण्यात आली.२ - माजलगाव शहरातील राजस्थानी स्मशानभूमीत गुंडांनी गोंधळ घालत स्वर्ग रथ जाळला. वाहनेही पेटवली. येथील लोकांनाही मारहाण केली.३ - बीड तालुक्यातील उमरद खालसा येथील महिलांनी दारू बंद करा, म्हणत थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली.४ - वडवणी शहरात टोबॅको सेंटर, लिंबागणेशमध्ये मेडिकल फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.५ - अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीची रोडरोमिओने छेड काढली, बसस्थानकात आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली, एसबीआय बँकेतून दोन लाखांची रोकड लंपास केली, व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला.६ - चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आजही अवैध वाळू वाहतूक सुरूच.७ - धारूर तालुक्यातील तरनळी येथे एका तरुणावर बातम्या पाहिल्या म्हणून धारदार शस्त्राने वार करून जखमी केले.८ - चोरी, घरफोडीच्या घटना सव्वाशेपेक्षा जास्त घडल्या आहेत.

ही उपक्रम कौतुकास्पद१ -

 सामान्य नागरिकांना तक्रार करण्यासाठी क्यूआर कोडची सुविधा.२ - दररोज दुपारी ४ ते ६ पोलिस अधीक्षकांना भेटण्याची वेळ निश्चित.३ - प्रत्येक शनिवारी पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन व स्वच्छता अभियान.४ - पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातील एक शुक्रवारी भरणार दरबार.

या गुन्ह्यांमध्ये घटप्रकार - जानेवारी २०२५ - डिसेंबर २०२४खुनाचा प्रयत्न - ८ - १२फसवणूक - १० - १२विनयभंग - २९ - ३५

या गुन्ह्यांमध्ये वाढप्रकार - जानेवारी २०२५ - डिसेंबर २०२४बलात्कार - २१ - ११घरफोडी - २६ - २४चोऱ्या - ११० - ९१दंगा - २६ - १८पळवून नेणे - १७ - १६दुखापत - १२४ - १२३सरकारी कर्मचारावर हल्ला - १० - ३

भाग १ ते ५ एकूण गुन्हेजानेवारी २०२५ - डिसेंबर २०२४५८८ - ५१९

Wednesday, February 12, 2025

परळी बीड राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या कठड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले.अ‍ॅड.मनोज संकाये यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी बीड राष्ट्रीय महामार्गावरील चेंबरी रेस्ट हाऊस जवळील उड्डाण पुलावरील सिमेंट कठडे अनेक ठिकाणी पडले आहेत तसेच झाडे झुडपे या मार्गामध्ये पसरले असून त्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे या महामार्गावरून रहदारी करणारे दुचाकी स्वार तसेच चार चाकी वाहनांचा वारंवार अपघात होत आहे मात्र याकडे राष्ट्रीय महामार्गाचे उपाभियंता यांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे. सदरील काम तात्काळ सुरू करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री. अविनाश पाठक साहेब परळी येथे वैजनाथ मंदिर या ठिकाणी आले असता त्यांची भेट घेऊन सादर केले तसेच रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे सदरील काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांनी दिले.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,या राष्ट्रीय महामार्गावर रहदारीचे प्रमाण जास्त आहे. या महामार्गावरून आयटीआय महाविद्यालयाचे विद्यार्थी, थर्मल पावर स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर अनेक वाहनधारक ये जा करतात याच महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांची हात पाय मोडले आहेत. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍याची तसेच उपकार्यकारी अभियंता साहेबांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे अशी तक्रार यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना केली. याविषयी दूरध्वनी वरून त्यांच्याशी बोलले असता मला पंधरा दिवस पाहण्यासाठी वेळ नाही अशी उत्तरे एका जबाबदार अधिकार्‍यांकडून येत आहेत ही उत्तरे शोभणारी नाहीत. लोकांच्या कामासाठी अधिकार्‍यांना वेळ नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे उपअभियंता राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याकडे लक्ष देतील की नाही याबाबतीत परळीकरांच्या मनात शंका आहे. त्याचबरोबर या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्ष भेटून आपण निवेदन सादर केले असून मागणी मान्य होईल अशी अपेक्षा आहे तसे न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग अभियान यांच्या  कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

संसाराच्या मोहजलामध्ये जरूर गुंता पण भगवंताला विसरू नका - ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  मानवी जीवनामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी माणूस संसाराच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. समस्या सोडविता सोडविता त्या मोह झाला मध्ये तो एवढा गुंतून जातो की ज्यांनी कर्म करण्यासाठी जन्माला घातले त्या भगवंतालाच विसरून जातो म्हणून माणसाने संसाराच्या मोजायला मध्ये जरूर अडकावे पण भगवंताचे नामस्मरण व भगवंताला विसरू नये. असा उपदेश बाल कीर्तनकार  ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांनी श्रोत्यांना केला.
परळी तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथील कै. सीताबाई मुंजाभाऊ काळे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त आज मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी आयोजित कीर्तन सोहळ्यामध्ये बाल कीर्तनकार  ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे संगमकर या उपदेश करीत होत्या. प्रारंभी कै. सीताबाई मुंजाभाऊ काळे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्ञानोबा काळे बालासाहेब काळे व लक्ष्मण काळे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा "शेवट तो भला !माझा बहु गोड झाला!! आलो  निजाच्या माहेरा ! भेटी रखुमाईच्या वरा" !! हा अभंग किर्तन सेवेसाठी घेण्यात आला होता. या कीर्तन सोहळ्यासाठी गायनाची साथ‌संगत ह.भ.प. बब्रुवान महाराज गिराम, अश्विनीताई बडे, अरविंद महाराज काळे, मौजे पौळ पिंपरी व पंचक्रोशीतील भजनी मंडळ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना बाल कीर्तनकार  ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे म्हणाल्या की, माणसाने संसारामध्ये गुंरफटताना  आपली अलिप्तता नारळाच्या खोबऱ्याप्रमाणे आणि चिकू मधील बिया प्रमाणे सांभाळावी. गरांमध्ये राहून ही चिकूचा बी अंगाला गर लागू देत नाही. नारळाच्या टणक कवचाचा आधार घेत खोबरे आतमध्ये आनंदात जीवन कंठत असते अशाप्रकारे मानवाने ही जीवन जगावे अशी अपेक्षाही बाल कीर्तनकार  ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांनी व्यक्त केली.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१० शस्त्र परवाने रद्द.तर १० जणांनी परवाना नको म्हणून सरेंडर.


बीड (प्रतिनिधी) पाेलिसांनी प्रस्ताव पाठविलेल्या आणखी १२७ जणांचे शस्त्र परवाने रद्द, निलंबित करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ३१० परवाने रद्द केले आहेत. १० जणांनी परवाना नको म्हणून सरेंडर केला आहे. तसेच आणखीदेखील पोलिसांकडून प्रस्ताव पाठविणे सुरूच असून, हा आकडा ५००च्या घरात जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

जिल्ह्यात १२८१ जणांकडे शस्त्र परवाना होता. अविनाश बारगळ यांनी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेताच ज्या लोकांवर मारहाण, हवेत गोळीबार करणे, शिवीगाळसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा २३२ जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठविली. विधानसभा निवडणुकीमुळे यावर कारवाई झाली नाही. परंतु सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने हा मुद्दा समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द, निलंबनाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आतापर्यंत ३१० शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आणखी ५ प्रस्ताव पाठविले असून, १९ जणांच्या अर्जावर आक्षेप नोंदवला आहे.

बीडनंतर राज्यभर मोहीम.

बीडमधील शस्त्र परवान्यांचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरातील माहिती मागवण्यात आले. सर्वच पोलिस अधीक्षक, आयुक्त यांना सूचना करून अनावश्यक परवाने रद्दच्या सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये शस्त्र परवाने रद्द करण्यात आले होते. सध्या ही मोहीम राज्यभर सुरू आहे.

जिल्ह्यात चने, फुटाण्याप्रमाणे शस्त्र परवाना दिल्याचे प्रकरण  चव्हाट्यावर आले. त्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. यामुळे शस्त्र परवान्यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यामुळे जिल्ह्यातील शस्त्र परवाने रद्दची कारवाई हाती घेण्यात आली.

१९ जणांच्या प्रस्तावावर आक्षेप.

एवढे परवाना रद्द झाल्यानंतरही काही लोक परवान्यासाठी अर्ज करतात. गरज नसतानाही अर्ज करणे, गुन्हा दाखल असणे, अशा विविध कारणांमुळे मागील दीड महिन्यात १९ जणांच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदविला आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याचा निगेटिव्ह अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना मिळणार नाही, हे निश्चित आहे.

परवाना रद्दची आकडेवारी काय सांगते?

पहिला टप्पा - १०० दुसरा टप्पा - ६०तिसरा टप्पा - २३चौथा टप्पा - १२७


प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा सोडायला येत'!! वडिलांच्या आठवणीत वैभवीने अश्रूंना केली वाट मोकळी.


केज (प्रतिनिधी) तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या दुःखातून अद्यापही न सावरलेली त्यांची कन्या वैभवी हिने मंगळवारी बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला. परीक्षा केंद्रावर वडील सोडवायला न येता दिलेली ही पहिलीच परीक्षा असल्याची प्रतिक्रिया वैभवीने दिली.

वैभवी देशमुख हिचे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात विज्ञान शाखेतून शिक्षण सुरू आहे. लातूर पॅटर्न राज्यासह देशात गाजत असल्यामुळे बारावीची तयारी वैभवी लातूर येथे करीत असताना तिचे पित्याचे छत्र हरपले. ९ डिसेंबर रोजी गुन्हेगारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या केली. त्यामुळे बारावी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या वैभवीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन महिने अभ्यासापासून दुरावलेल्या वैभवीने अखेर हिमतीने बारावीची परीक्षा दिली.

अश्रूंना केली वाट मोकळी.

आमच्या प्रतिनिधीने मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मस्साजोग येथे जाऊन वैभवीची भेट घेत तिची प्रतिक्रिया जाणून घेतली. डोळ्यांमध्ये भरून आलेल्या अश्रूंना वाट करून देत प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा मला सोडवायला परीक्षा हॉलपर्यंत यायचे; परंतु आज बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पित्याची उणीव प्रकर्षाने व तीव्रतेने जाणवली. दोन महिन्यांपासून आमच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे अभ्यासात मन लागत नव्हते. तरीही मी आत्मविश्वासाने बारावीच्या परीक्षेला सामोरे जात १२ वीच्या परीक्षेचा पहिला पेपर छान सोडविल्याची भावना वैभवी देशमुख  व्यक्त केली.

२७ तारखेला परीक्षा संपणार

११ फेब्रुवारी रोजी सुरू झालेली परीक्षा २७ फेब्रुवारी रोजी संपणार असून, परीक्षेच्या दिवशी काका धनंजय देशमुख परीक्षा केंद्रावर पोहोचवायला आल्याचे वैभवीने सांगितले.

Sunday, February 9, 2025

बीडच्या SP कावतांचा निर्णय नागरिकां साठी QR कोड. स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा.


बीड (प्रतिनिधी) राज्यात गेल्या दोन महिन्यां पासून बीड जिल्हा केंद्रस्थानी असून बीडमधील गुन्हेगारी व दहशत चर्चेचा विषय बनला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून खून प्रकरणातील आरोपही तुरुंगात आहेत. दरम्यान, बीडच्या एसपींची बदली करुन नवनीत कावत यांना बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात पाठवण्यात आलं आहे. त्यादृष्टीने नवनीत कावत यांनी गेल्या काही दिवसांत पोलीस दलात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता, नागरिकांना पोलिसांशी सहज संवाद साधता यावा म्हणून त्यांनी तांत्रिकदृष्ट्या सोय केली आहे. जिल्ह्यात नागरीक आणि पोलीस दलाचा सुसंवाद हवा या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक  नवनीत कावत यांनी संवाद प्रकल्प’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

क्यू. आर. कोड च्या माध्यमातून पोलीस स्टेशनमधील बरीच माहिती सामान्य लोकांना मिळणार आहे.  तसेच तक्रार देखील करता येणार आहे, यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी QR Code तयार केला आहे. हा QR Code पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे कक्षात व पोलीस ठाणे अंमलदार यांचे कक्षात लावण्यात येणार असून मोबाईलद्वारे सदरचा QR Code स्कॅन केल्यानंतर माहिती भरता येईल. विशेष म्हणजे पोलिसांच्या कामगिरीचे गुणांकन देखील याच फॉर्मच्या माध्यमातून केले जाणार आहे. एखादी व्यक्ती पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत असमाधानी असल्यास त्यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 24 तासांच्या आत समस्या जाणून घेवून समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

सदरचा QR Code हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरीकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या नागरिकास अवैध धंदे किंवा इतर महत्वाची गोपनीय माहिती द्यायची असेल तर ते सदरचा QR Code स्कॅन करुन माहिती देऊ शकतात. अशा व्यक्तींचे नाव व मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवले जाईल. तसेच, याद्वारे नागरिकांना त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या QR Code द्वारे ते देऊ शकतात. नागरिकांनी केलेल्या तक्रारी, दिलेल्या प्रतिक्रीया, सूचना ह्या पोलीस अधीक्षक स्वतः पाहू शकणार आहेत. तसेच नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलिसांकडून घेतली जाणार आहे. दरम्यान, ‘संवाद उपक्रमाचा नागरीकांनी योग्य उपयोग करुन पोलीस व नागरीकांमध्ये निर्माण झालेली दरी दूर करावी. तसेच नागरीकांनी सुचवलेल्या सुधारणांचे स्वागत केले जाईल, असे मत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी व्यक्त केले आहे. 

पोलिस समोरून आले जुगारी पाठीमागील दरवाज्यातून पळाले!!


परळी (बीड) : तालुक्यातील धर्मापुरी येथील बस स्थानक रोडवर एका इमारतीमध्ये मोबाईलवर ऑनलाईन कल्याण मुंबई नावाचा जुगार चालू असल्याची खबर पोलिसांना मिळाली. यावरून परळी ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. मात्र, पोलीस आल्याची चाहूल लागल्याने जुगारी पाठीमागील दरवाजातून पसार झाले. तेवढ्यात समोरील दरवाजातून पोलिस दाखल झाले. जुगारी हाती लागले नाही, पण पोलिसांनी यावेळी तीन लाख २३ हजार रुपये ८० रुपये किमतीचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात ८ फेब्रुवारी रोजी पहाटे जगन्नाथ फड ,शिवाजी पांचाळ, अक्षय सावंत ( राहणार धर्मापुरी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारपर्यंत यातील एकाही आरोपीस अटक करण्यात आली नव्हती.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी; धर्मापुरी येथील बस स्थानकाजवळ एका इमारतीमध्ये मुंबई -कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेलविला जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यावरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार पोलीस उपनिरीक्षक रियाज शेखलाल, निमोणे व पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वाले ,पोलीस कर्मचारी चेमटे,  वाहन चालक महादेव वाघमारे व इतर कर्मचाऱ्यांनी सात फेब्रुवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला. मात्र, पोलीस पथक आल्याचे समजताच जुगार चालक आणि जुगारी पाठीमागील दरवाज्यातून उड्या टाकून पळून गेले. त्यामुळे एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

दरम्यान, पोलिसांनी मटका जुगाराचे साहित्य व दोन प्रिंटर, एक लॅपटॉप ,रोल्स मशीन एलईडी टीव्ही, वाय-फाय राऊटर ११ खुर्च्या, तीन टॅब दोन मोबाईल असा एकूण तीन लाख २३ हजार रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार हे करीत आहेत. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे गेला काही दिवसापासून जुगार चालू होता. शुक्रवारच्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

अंगणवाडीच्या खिचडीतून विषबाधा; ११ बालकांना मळमळ उलटीचा त्रास.माजल गाव तालुक्यातील फुलसिंग नगर तांडा येथील घटना.


माजलगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील टाकरवन जवळ असलेल्या फुलसिंग नगर तांडा येथील अंगणवाडीत  शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खिचडी खाल्ल्याने ११ बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

टाकरवन जवळ असलेल्या फुलसिंग नगर तांडा या ठिकाणी असलेल्या अंगणवाडीत २९ बालकी असून त्यापैकी ७ बालके शनिवारी उपस्थित होते. या अंगणवाडीतील मुलांबरोबर शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी या ठिकाणी खिचडी खाण्यासाठी आले होते. खिचडी खाऊन ही बालके आपापल्या घरी गेली. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास अंगणवाडीतील ७ व ४ जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या बालकांना अचानक मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. अंगणवाडी सेविका कविता राठोड यांनी सरपंच  सुनील तर व उपसरपंच दयानंद बोबडे यांना याची माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका पाठवून बालकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्वांवर उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. घुबडे यांनी सांगितले.

अंगणवाडीत शिकणारी श्रावणी नवनाथ राठोड (वय ३ ) संध्या लखन राठोड (वय ५ ), पल्लवी अतुल राठोड  (वय ५ ), प्रीतम रवींद्र राठोड  (वय ५ ),देवांश अजय राठोड  (वय १८ महिने )  रा. फुलसिंग तांडा  त्याचबरोबर आर्यन परमेश्वर राठोड  (वय ४ ), आरव परमेश्वर राठोड (वय ३ ) रा. टाकरवन येथील बालके आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे अक्षर लहू चव्हाण, देवांश अजय राठोड  (वय ३ ) रा. वारोळा , इशिता देविदास धनगाव (वय ७ ), प्रथमेश दिलीप पवार (वय ७) व प्रांजल दिलीप पवार(वय ८ ) हे सर्व रा. फुलसिंग तांडा येथील रहिवासी आहेत. 

रात्रभर देखरेखविषबाधा झालेल्या बालकांची तब्येत स्थिर आहे. रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखित ठेवण्यात येणार आहे.- डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, माजलगाव

Saturday, February 8, 2025

डांबून बंदी ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची दीड महिन्यानंतर सुटक.ा


वाशी(प्रतिनिधी) - तालुक्यातील कोठावळे पिंपळगाव मध्ये उत्तर प्रदेश मधील 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांना पोलीस ठेवले गेले होते.तब्बल 45 दिवसापासून गायब असलेल्या या मजुरांच्या टोळीची तीन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली.

उत्तर प्रदेश मधील ऊस तोडी साठी आलेले 19 मजूर 15 मुलांसह अचानक एका एकी गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. तर 3 दिवसाच्या शोधानंतर मजूरांची माहिती मिळाली आणि आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.या प्रकरणी मजुरांना घेऊन येणाऱ्या दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यातील हे मजूर असून या मजुरामध्ये 11 पुरुष, 8 महिलांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासह 15 मुलांची यातून आता सुटका करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, थेट उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिव च्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या बाबत तक्रार दिली असता ही सुटका करण्यात आली आहे.ललितपूर जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र येताच धाराशिवच्या जिल्हाधिकारी यांनी कामगार विभागाला या मजूरांना शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या हालचालींना वेग आला आणि अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत समज.


बीड (प्रतिनिधी) अवैध वाळू उपसा प्रकरणातील आरोपींना समज दिल्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत समज दिली आहे. यापुढे गुन्ह्यांमध्ये नाव आले तर एमपीडीए ,मकोका सारख्या कारवाया करण्यात येतील अशी तंबी देखील देण्यात आली आहे. एस पी नवनीत कांवत यांनी गुन्हेगारांना बोलावून सज्जड दम दिल्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात वारंवार उद्भवणार्‍या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. आठ दिवसांपूर्वी पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यात अवैध वाळू उपशा संदर्भात गुन्ह दाखल असलेल्या 51 जणांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे अवैध वाळू उपसा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर शुक्रवारी राजकीय, सामाजिक व इतर गुन्हे दाखल असलेल्या 80 जणांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते.

या सर्वांना प्रारंभी अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांनी सूचना केल्या. यामध्ये जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी पोलिस दल कठोर पावले उचलत असून यापुढे तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यास यापुर्वीच्या गुन्ह्यांच्या आधारावर मकोका, एमपीडीए तसेच हद्दपारीसारखी कठोर कारवाई केली जाईल असा इशारा या 80 जणांना देण्यात आला. यानंतर स्वतः पोलिस अधिक्षक नवनित कावत यांनीही या 80 जणांना अशाच पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा भरात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले हे सर्वजण होते. आता पोलिस अधिक्षकांनी थेट अशा पद्धतीने कारवाईचा इशारा दिल्याने या 80 जणांसह इतर गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या मंडळींमध्येही जरब निर्माण होत जिल्ह्यात शांतता नांदेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

करुणा मुंडे चे गंभीर आरोप.पण मुलगा धनंजय मुंडेंसाठी मैदानात,श्रीशिव मुंडे याने आई करुणा मुंडें विरोधात लिहिली पोस्ट.

मुंबई (प्रतिनिधी) धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांनी वांद्रे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाकडून निर्णय देण्यात आलाय. करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असून त्यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. करुणा मुंडे पोटगीसाठी पात्र असून त्यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी द्यावी, याशिवाय मुलीला लग्नापर्यंत महिन्याला 75 हजार रुपये द्यावे, असे आदेश कोर्टाने दिलेत. करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचारप्रकरणात कोर्टाने आज निकाल दिलाय.

मुलाची आईविरोधात पोस्ट

दरम्यान धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा श्रीशिव मुंडे याच्या नावाने आई करुणा शर्मा यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. वडिलांनी घर सोडल्यानंतर आईने आम्हाला घरातून हाकललं, तसंच आईने आम्हाला मानसिक त्रास दिल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. श्रीशिव मुंडे यांच्या नावाने ही पोस्ट करण्यात आली आहे. तरी या पोस्ट आणि अकाऊंटची पुष्टी करत नाही.

या पोस्टमध्ये नेमकं काय आहे?

‘मी श्रीशीव धनंजय मुंडे, मला बोलणं गरजेचं वाटत आहे कारण मीडियासाठी माझं कुटुंब मनोरंजनाचं साधन झालं आहे. माझे वडील सर्वोत्कृष्ट नाहीत, पण माझ्या आईसारखा त्यांनी कधीच आम्हाला त्रास दिला नाही. आमच्या आईला मानसिक धक्के बसले, पण यातून तिने आम्हालाच त्रास दिला. ती ज्या घरगुती हिंसाचाराचा दावा करत आहे, तो मी, माझी बहीण आणि माझ्या वडिलांसोबत झाला आहे.

माझ्या वडिलांनी तिला सोडल्यानंतर तिने आम्हाला निघून जायला सांगितलं, कारण तिला आमच्याबद्दल काही देणंघेणं नव्हतं. 2020 पासून आमचे वडील आमची काळजी घेत आहेत. आमची आई कोणत्याही आर्थिक अडचणीत नाही. गृह कर्ज न भरण्याचा निर्णय तिने स्वत: घेतला आहे. सूड उगवण्यासाठी ती ही कपोलकल्पित कहाणी रचत आहे’.

Friday, February 7, 2025

लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी जाताना अपघातात वधू पित्यासह मध्यस्थ महिलेचा मृत्यू.


केज ( प्रतिनिधी)  23 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील कासारी येथील मुलीचा विवाह असल्यामुळे तिच्या पित्यासह नातेवाईक जीपने अहिल्यानगर येथे कपड्याचा बस्ता बांधण्यासाठी सकाळी रवाना झाले होते. सांगवी सारणी पुलावरील वळणावर समोरून येणाऱ्या मालट्रकची जीपसोबत धडक होऊन झालेल्या अपघातात वधू पित्यासह लग्न जुळविण्यात मध्यस्थी असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अहमदनगर - अहमदपूर राष्ट्रीय महामार्गांवर सारणी शिवारात झाला.

केज तालुक्यातील कासारी येथील रामेश्वर शाहूराव डोईफोडे यांच्या मुलीचा विवाह बोरदेवी ता. बीड येथील  इंजिनियर मुलासोबत 23 फेब्रुवारी आहे. दोन्ही बाजूच्या नातेवाईकांना सोयीचे म्हणून अहिल्यानगर येथे बस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता एका जीपमधून (एम एच 16 ए टी 0016) मुलीचे वडील, नवरी मुलगी व इतर नातेवाईक अहिल्यानगरकडे निघाले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास अहमदपूर -अहमदनर राष्ट्रीय महामार्गवरील सारणी - सांगवी पुलावरील वळणावर समोरून येणाऱ्या टेम्पो ( क्रमांक एम एच 01 / यु सी 5502) आणि जीपची जोरदार धडक झाली. यात वधू पिता रामेश्वर शाहूराव डोईफोडे ( 50 वर्षे, रा कासारी) आणि उर्मिला उर्फ उमा श्रीराम घुले ( 45 वर्षे, रा कोरेगाव ह मू  शिक्षक कॉलनी केज) या दोघांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील, जमादार दत्तात्रय बिक्कड, शिवाजी कागदे, प्रकाश मुंडे, चालक दराडे यांनी अपघातस्थळी भेट दिली. मृत व जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले

Thursday, February 6, 2025

भाजपकडून १७ जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नेमणूक,बीडच्या संपर्कमंत्री ना.पंकजाताई मुंडे.


मुंबई (प्रतिनिधी) रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीत  धुसफूस सुरू असताना भाजपने बुधवारी १७ जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा संपर्कमंत्री नियुक्त केल्याचे भाजपने म्हटले असले तरी ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री देऊन पक्षाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यात भाजपने संपर्कमंत्री दिले आहेत. शिंदे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले वनमंत्री गणेश नाईक यांची ठाणे जिल्ह्यासाठी तर कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांची मुंबई शहर जिल्ह्यासाठी नेमणूक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्यात अनुक्रमे चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे हे भाजपचे जिल्हा संपर्कमंत्री असणार आहेत.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात जबरदस्त रस्सीखेच असताना भाजपने संपर्कमंत्री म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यावर सोपवली आहे. तर नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदाला स्थगिती मिळाल्याने सध्या या पदापासून वंचित असलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे संपर्कमंत्री म्हणून जळगाव जिल्ह्याची धुरा देण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने जिल्हा संपर्कमंत्री म्हणून नितेश राणे यांना तर नंदुरबार जिल्ह्यात जयकुमार रावल यांची नियुक्ती केली आहे.

असे आहेत संपर्कमंत्री

गोंदिया – डॉ. पंकज भोयर

बुलढाणा – आकाश फुंडकर

यवतमाळ – अशोक उईके

वाशीम – राधाकृष्ण विखे पाटील

छ. संभाजीनगर- अतुल सावे

बीड – पंकजा मुंडे

धाराशिव – जयकुमार गोरे

हिंगोली – मेघना बोर्डिकर

जळगाव – गिरीश महाजन

नंदुरबार- जयकुमार रावल

मुंबई शहर – मंगलप्रभात लोढा

ठाणे – गणेश नाईक

रायगड – आशिष शेलार

रत्नागिरी – नितेश राणे

सातारा – शिवेंद्रराजे भोसले

कोल्हापूर – माधुरी मिसाळ

पुणे – चंद्रकांत पाटील

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला लाथा-बुक्क्या, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण.


धारूर (प्रतिनिधी)- धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील केज तालुक्यातील तरनळी येथे आज (ता.5) रोजी दुपारी वाल्मीक कराड व मुंडे साहेबांच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत गावातील दोन युवकांनी अशोक मोहिते नावाच्या तरुणाला लाथा-बुक्क्या, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. सध्या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार घेत असून, त्याचा मावस भाऊ बालासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये 2 आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील व केज तालुक्यातील तरनळी गावामध्ये (ता.5) फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता गावातील रमाई चौकात अशोक शंकर मोहिते हा मोबाईलवर व्हिडिओ पाहत होता. यावेळी गावातील एका लाल रंगाच्या बाईकवरुन(MH 44 R 9294) वैजनाथ भारत बांगर आणि अभिषेक सिद्धेश्वर सानप आले व त्यांनी अशोक मोहितेला लाथा-बुक्याने, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण केली.

यापुढे वाल्मीक कराड व धनंजय मुंडे साहेबांच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू, म्हणत शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर जखमी अशोक मोहीतेला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोकचा मावस भाऊ बालासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये सानप व बांगरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

वांद्रे कौंटुबिक न्यायालय घरगुती हिंसाचार प्रकरण सुनावणी."दरमहा दोन लाखांचा देखभाल खर्च द्या"; मंत्री धनंजय मुंडेंना न्यायालयाचे आदेश.


मुंबई  (प्रतिनिधी) : करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार तक्रारीच्या सुनावणीदरम्यान वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने अंतरिम निकालात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. तक्रारकर्त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत त्यांना दरमहा १ लाख २५ हजार तर त्यांच्या मुलीला दरमहा ७५ हजार रुपये असे एकूण दोन लाख रुपये देखभाल खर्च म्हणून द्यावेत, असं न्यायालयानेधनंजय मुंडे यांना सांगितलं आहे.

मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही आठवड्यांपासून वादात सापडले आहेत. बीड जिल्ह्यातील पवनचक्की खंडणी प्रकरण, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, कथित पीक विमा घोटाळा, तसंच कृषी खात्यातील साहित्य खरेदी घोटाळ्यावरूनही मुंडे यांच्या गंभीर आरोप झाले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणातील सुनावणीवेळी मुंडे यांना करुणा मुंडे यांना देखभाल खर्च देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, "मंत्री असलेल्या पतीविरोधात मी लढत असलेली लढाई अत्यंत कठीण होती. कारण सर्व यंत्रणा त्यांच्या बाजूने होत्या. मी माझ्या वकिलांचे आभार मानते," अशी प्रतिक्रिया न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी दिली आहे. 

Wednesday, February 5, 2025

देहूत शोककळा! संत तुकाराम महाराजाचे वंशज प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प.शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या.


देहू (प्रतिनिधी) संत तुकारामांचे ११ वे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देहू गावात आणि वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. शिरीष महाराजांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राहत्या घरी घेतला गळफास.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी शिरीष महाराज मोरे यांचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या निधनाच्या बातमीने कुटुंबीय, सहकारी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. आज संध्याकाळी 4 वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

*लवकरच बांधणार होते लग्नगाठ. 

शिरीष महाराज मोरे हे लवकरच विवाहबद्ध होणार होते. त्यांच्या लग्नाचा टिळा कार्यक्रमही नुकताच पार पडला होता. असे असताना त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

शिरीष महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिरीष महाराजांनी उचललेले हे पाऊल समस्त देहू ग्रामस्थांसाठी, मोरे कुटुंबीयांसाठी तसेच धार्मिक, आध्यात्मिक आणि कौटुंबिक दृष्ट्या मोठे नुकसान करणारे आहे. महाराजांचे निधन आकस्मिक झाले आहे. या संदर्भात पोलीस सखोल चौकशी करतीलच, मात्र तोपर्यंत त्यांच्या चाहत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या दुःखात आम्हाला आधार द्यावा,” असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे. 

संघात कार्यरत, वादग्रस्त वक्तव्यामुळे आले होते चर्चेत:

शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. ते शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे वादग्रस्त वक्तव्य करून ते चर्चेत आले होते.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत. 


राज्यातील नवीन सरकारचे बदल्याचे सत्र सुरूच 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

मुंबई : राज्यात नवीन सरकार पासून बदल्यांचा धडाका सुरूच आहे. नवीन वर्षात देखील हे बदल्यांचे सत्र सुरूच असून आताही राज्यातील 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी काढले आहेत.

त्यामध्ये पर्यावरण विभागातून बदली झाल्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण दराडे यांची बदली सहकार आणि वस्त्रोद्योग खात्याच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. सध्या सहकार विभागाचा अतिरिक्त कार्यभार नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे आहे. दराडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी ओळखले जातात.

तसेच डॉ. प्रशांत नरनावरे यांची राज्यपालांचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. राहुल कर्डिले यांची आता नांदेड जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात जवळपास 30 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणाची बदली कुठे झाली?

प्रवीण दराडे (IAS:RR:1998) यांची प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री पंकज कुमार (IAS:RR:2002) यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री नितीन पाटील (IAS:SCS:2007) सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीमती श्वेता सिंघल (IAS:RR:2009) राज्यपालांच्या सचिव, महाराष्ट्र यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. प्रशांत नरनावरे, (IAS:RR:2009) सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री अनिल भंडारी (IAS:RR:2010) सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री पी.के.डांगे (IAS:SCS:2011) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांची सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री एस. राममूर्ती (IAS:RR:2013) सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री अभिजित राऊत (IAS:RR:2013) जिल्हाधिकारी, नांदेड यांची सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री मिलिंदकुमार साळवे (IAS:SCS:2013) सह आयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री राहुल कर्डिले (IAS:RR:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची जिल्हाधिकारी, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीमती. माधवी सरदेशमुख (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांची संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री अमित रंजन (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, चारमोशी उपविभाग, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा, आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.