Thursday, July 4, 2024

आष्टी ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा. शासनातर्फे दिली मंजुरी.


मुंबई (प्रतिनिधी) : ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाले असून राज्य शासनाने मुख्य इमारतीसह अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामास बुधवारी (ता. तीन) मंजुरी दिली. या कामांसाठी एकूण ८८.३४ कोटी रुपयांचा निधी शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आष्टी येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय असून लोकसंख्येचे विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती. त्यामुळे आष्टी येथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयत झाल्यास आरोग्याच्यादृष्टीने मोठी समस्या दूर होणार असल्यामुळे आष्टी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत होती.

या साठी आमदार बाळासाहेब आजबे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून मंजुरीसाठी प्रयत्न केले. आॅक्टोबर २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कॅबिनेट बैठकीमध्ये आष्टीचा उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळाली. त्यानुसार कासारी हद्दीतील शासनाच्या गायरान जमिनीपैकी बेलगाव रस्त्यावरील स.नं. १४९ मध्ये दोन हेक्टर ४० आर (सहा एकर) जागा शासनाने उपजिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिली आहे.

या जागेत मुख्य इमारतीसह अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांची बांधकाम करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने परिगणित केल्याप्रमाणे व उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ८८.३४ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास बुधवारी (ता. तीन) प्रशासकीय मान्यता दिली.

दुमजली मजली प्रशस्त इमारतीतून मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा

उपजिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारत सुमारे आठ हजार चौरस मीटर क्षेत्रामध्ये दुमजली बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या शेजारीच वर्ग-१ कर्मचा-यांसाठी १२, वर्ग-दोन अधिकारी यांच्यासाठी १२ व वर्ग-तीन कर्मचा-यांसाठी आठ अशी ३२ निवासस्थाने तीन मजली इमारतीमध्ये बांधण्यात येणार आहेत. प्रशस्त अशा उभारण्यात येणा-या इमारतीमधून आष्टी मतदारसंघातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment