अंबाजोगाई (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीचे वातावरण गरम झालेले असताना विजय मिळवण्याकरता बीड जिल्ह्यात जातीय ध्रुवीकरण होऊ नये यासाठी पंकजा मुंडे कडून प्रयत्न केले जात होते. मात्र अंबाजोगाई येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसींच्या आरक्षणाला मागच्या दाराने कोणालाही लुटू देणार नाही असे सांगत आरक्षणाच्या मुद्द्यावरून भडकलेल्या आगीत पेट्रोल टाकून निघून गेले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील निवडणुकीचे वारे एकतर्फी फिरून पंकजा मुंडे यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब करून गेले. 2019 ची विधानसभेची पुनरावृत्ती लोकसभेत पाहायला मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंबाजोगाईत झालेल्या सभेत विकासाचे मुद्दे हाताळले तर गेले नाहीतच पण इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पूरक वातावरण ते तयार करून गेले.मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जिल्ह्यात वातावरण गरम आहे. बहुसंख्या असलेल्या या समाजावर भाजप नेत्यांचा देखील डोळा आहे. मराठा आरक्षणाची झळ इथल्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना प्रचारा दरम्यान अनेक वेळा सहन करावी लागली. अनेक ठिकाणी त्यांच्या गाड्या अडवून मराठा आंदोलकांनी आक्रमकपणा दाखवला. मात्र हा समाज आपल्याकडे वळवण्यासाठी कसरत करावी लागत होती. तीच स्थिती मुस्लिम मतदारांबाबत देखील होती. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेतून काँग्रेसने कर्नाटकात ओबीसी मधून मुस्लिमांना आरक्षण दिले. मागच्या दाराने मी कोणालाही अशा पद्धतीने ओबीसी आरक्षण देणार नसल्याच सांगत एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम समाजावर टीका टिपणी केल्यामुळे मुस्लिम समाजाची नाराजी तर ओढवून घेतलीच शिवाय मराठा समाजाला देखील अप्रत्यक्षरीत्या ओबीसी मध्ये समावेश होणार नसल्याचा गर्भित इशारा त्यांनी दिला. यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण पूर्ण बदलले असून भाजपची मानसिकता यातून उघडकीस आली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पूरक वातावरण बनू लागले आहे. मोदींची सभा पंकजा मुंडे च्या पराभवासाठी होती अशी शंका जन सामान्यातून व्यक्त केली जाऊ लागली आहे. 2019 साली विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेनंतर वातावरण फिरले व पंकजा मुंडेंना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. याच घटनेची पुनरावृत्ती 2024 मध्ये होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment