Sunday, February 11, 2024

मराठ्यांशी दगाफटका करू नका, असा स्पष्ट इशारा. मनोज जरांगे यांचे उपोषण पुन्हा सुरू.


जालना (प्रतिनिधी) कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र कधी देणार, सगेसोयर्‍यांच्या संदर्भात अधिक स्पष्टता कधी आणणार? सरकारला असे अनेक प्रश्न उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली.

आरक्षण हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता मराठ्यांशी दगाफटका करू नका, असा स्पष्ट इशाराही यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, मनोज जरांगे यांनी कोणताही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी आजपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कुणबी नोेंदी, प्रमाणपत्र तसेच सगेसोयर्‍यांच्या संदर्भातील अध्यादेश यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारशी संवाद साधण्याचा मार्ग खुला आहे असेही ते म्हणाले. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पहाटे बदलतो, मग मराठा आरक्षणाच्या निर्णयालाच का वेळ लागतो, असा सवालही त्यांनी केला.मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे का घेण्यात येत नाहीत. वारंवार यासंदर्भात आम्ही बोलत आहोत. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. जो चिथावणीखोर भाषा बोलतो त्याला संरक्षण दिले जाते, असा टोलाही त्यांनी गृहविभागाला मारला. आमच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण मला मराठा समाजाचे संरक्षण आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

No comments:

Post a Comment