Monday, February 12, 2024

जिरेवाडी बायपास रस्त्यावर. पुलाच्या अर्धवट कामाच्या पाईपला कार धडकून परळीचे सुप्रसिद्ध डॉ.वाल्मीक मुंडे यांचा अपघातात मृत्यू.


परळी वैजनाथ :(प्रतिनिधी) तालुक्यातील जिरेवाडी बायपास रस्त्यावर एका नाला बांधकाम ठिकाणी पुलाच्या पाईपला कार धडकून कार खड्ड्यात कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजता घडली. या अपघातात कारमधील वानटाकळी येथील रहिवाशी असलेले परळी येथे रुग्णसेवा करणारे डॉ. वाल्मीक मुंडे हे जागीच ठार झाले. तर  डॉ. प्रवीण खाडे हे जखमी झाले आहेत. जखमी डॉ. खाडे यांना उपचारासाठी  अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविले आहे. 

जिरेवाडी बायपास रोडवर गावा लगत एका ठिकाणी नाला पुलाचे काम चालू असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक बोर्ड लावलेला नाही.  नाला काम अर्धवट असल्याने रस्त्यात पाईप पडलेले आहेत. यामुळे वाहन चालविताना अनेक अडचणी येत आहेत. या रस्त्यावरून डॉ प्रवीण खाडे व डॉ.वाल्मीक मुंडे हे दोघेजण कारने जिरेवाडी रविवारी  रात्री अकराच्या सुमारास येत होते. नादुरुस्त रस्त्याच्या अंदाज न आल्याने कार रस्त्यावरील पाईपला धडकुन खाली खड्ड्यात कोसळली. त्यात डॉ. वाल्मीक मुंडे यांचा मृत्यू झाला. तर डॉ खाडे हे जखमी झाले आहेत.

गरीब रुग्णांचा आरोग्यदूत हरपला

डॉ वाल्मीक मुंडे हे नाममात्र दरात रुग्णांची सेवा करीत होते त्यामुळे परळी व परिसरात ते लोकप्रिय झाले होते  .त्यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील नागापूर जवळील वानटाकळी हे  आहे .डॉ. मुंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे . 

अपघातास गुत्तेदार आणि प्रशासन कारणीभूत

गेल्या काही दिवसात जिरवाडी बायपास रस्त्यावर तिघांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच मोटर सायकल व ऑटो रिक्षांचे अपघात झाले आहेत..बायपास रस्ता  पूर्ण झाला आहे. परंतु  नाला काम  काही महिन्यापासून रखडल्यामुळे   अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासन व गुत्तेदारांची हलगर्जी कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment