जालना (प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यानी १० फेब्रुवारीपासून पाण्याचा घोटही घेतलेला नसून, उपचार घेण्याससुद्धा नकार दिला आहे.आज त्यांच्या नाकातून रक्त येत असल्याचे समोर आले आहे. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषणावर आपण ठाम आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यांना उठायला, बोलायलाही त्रास होत आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याने आता सरकारपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची दखलही घेण्यात आलेली नाही. सोमवारी रात्री अंतरवाली सराटीमध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल स्वतः त्यांच्या भेटीला पोहोचले होते. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत जरांगे मात्र उपोषणावर ठाम आहेत.
उपोषणामुळे काय परिणाम होतात?
* पाणी घेत नसल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या
* शरिरात पुरेसं पाणी नसल्यामुळं रक्तभिसरण पेशींवर दुष्परिणाम
* अन्नपाण्याअभावी मेंदू, यकृत, मूत्रपिंडासह इतर अवयवांवर परिणाम
* रक्तदाब कमी होऊन ह्रदयावर परिणाम होऊ शकतो
* किडनी, लिव्हरला सूज येऊन फेल होण्याची भीती
* मेंदू पॅरेलाइज होऊन झटका येऊ शकतो
मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी १६ किंवा १७ तारखेला अधिवेशन घेण्याचा विचार सुरु होता. मात्र १७ तारखेला होणारी राज्यसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने चुरशीची झाली आहे. त्यामुळे आता हे अधिवेशन २० तारखेला घेण्याचा पर्याय समोर आला आहे. त्यावर बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते. आज दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळ बैठक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मागासवर्ग आयोग शक्य झाल्यास या बैठकीपुर्वी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करू शकतो. हा अहवाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळाला सादर करुन मराठा आरक्षणावर पुढील निर्णय घेण्यासाठी अधिवेशनाची तारीख निश्चित करू शकतात.
No comments:
Post a Comment