मुंबईः(प्रतिनिधी) दोन महिन्यांपूर्वी बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांचे अटकसत्र सूरुच असून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक केल्याची माहिती बीडच्या एसपींनी दिली.
बीडमध्ये ३० ऑक्टोबर रोजी माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरी जाळपोळ करण्यात आलेली होती. त्याला कारण होतं त्यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी केलेलं वादग्रस्त विधान. त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान बीड शहरामध्ये जाळपोळीच्या घटना सुरु झाल्या.
यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी भवन जाळण्यात आलं, त्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय, शिवसेना जिल्हाप्रमुखांची कार्यालयं, आमदार संदीप क्षीसागर यांचं घर, छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांचं हॉटेल; असं एकापाठोपाठ एक जाळपोळीच्या घटना घडल्या.
हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजलं होतं. आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी जाळपोळीच्या घटनेचा आणि मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचं म्हटलं होतं. ही घटना राजकीय द्वेषातून झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे या घटनेमागे नेमकं कोण आहे, हे तपासण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
बीड जोळपोळीच्या घटनेमध्ये पोलिस विनाकारण मराठा समाजाच्या तरुणांना त्रास देत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी वारंवार शासनाकडे मागणी करत, निरापराध तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. शिवाय बीडच्या पोलिस अधीक्षकांचीही त्यांनी भेट.
आता या प्रकरणी ३०७ आरोपींना अटक केल्याची माहिती रविवारी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. ठाकूर म्हणाले की, आम्ही इतर फरार आरोपींनाही लवकरच अटक करणार आहोत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जाळपोळीच्या अनुषंगाने पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अटकसत्र केलेलं असून बरेच आरोपी फरार आहेत. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी बीड पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केलेल्या आहेत; अशी माहिती एसपींनी दिली.
No comments:
Post a Comment