बीड - शिंदे साहेब..! आपल्या सरकारची अंमलबजावणी वेगवान आहे असं म्हणता पण गेल्या वर्षी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. “शेतकऱ्यांनो धीर सोडू नका शासन आपल्या पाठीशी आहे” असं म्हणत बडेजाव करत अतिवृष्टी अनुदान जाहीर केलं याला सव्वा वर्षाचा काळ उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या हातात तुम्ही बावचा दिला नाही. तीच स्थिती गारपीटीची झाली. दुष्काळ जाहीर करून देखील शेतकऱ्यांना कुठलीच ठोस मदत दिली नाही. पिक विम्याचं देखील अजून पूर्ण वाटप झालं नाही. 2020 च्या पिक विम्याचा प्रश्न अजून प्रलंबितच आहे.परिणामी शेतकऱ्यांची सरणं वेगाने रचली जात आहेत दीड दिवसाला एका शेतकऱ्याला जीवन संपवावं लागत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत 254 जणांनी कंटाळून जीव दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा सरकार लय भारी, शेतकरी सरणावरी अन् म्हणे शासन आपल्या दारी असं संतापाने म्हटलं जाऊ लागला आहे.
बोलेल तो तोलेल काय? गरजेल तो पडेल काय? ही म्हण तंतोतंत शिंदे -फडणवीस सरकारला लागू पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. “लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं”या जुन्या म्हणीचा देखील अनुभव शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. हाता तोंडाची आलेल्या घासाची अक्षरशः माती झाली.पिक हातातली गेल्यानंतर “शेतकऱ्यांनो धीर सोडू नका शासन आपल्या पाठीशी आहे”. असं म्हणत कोरडाच पुळका दाखवला गेला. अतिवृष्टीच अनुदान दिमाखात जाहीर केल्या गेलं. शेंबडात माशी घोटाळावी तसं शेतकरी ई केवायसी, आधार अपडेट, खाते आधारला लिंक मोबाईल ला लिंक करून कागदपत्रांची जमवाजमव करण्यात वर्षापासून परेशान झाला.पण लबाडाच अवतन जेवल्याशिवाय खरं नसतं या म्हणी प्रमाणच घडलं. सव्वा वर्षाचा काळ उलटून गेला तरी बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालं बाकीच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच पुसल्या गेली. तीच स्थिती नंतर झालेल्या अवकाळी गारपीट मूळे झालेल्या नुकसानी च्या मदतीची झाली. त्याची ही मदत शिंदे सरकारने शेतकऱ्यांना दिलीच नाही. कसाबसा शेतकऱ्यांनी धीर धरत 2023 च्या खरिपाची पेरणी केली. पण सरकार सारखाच निसर्गाने देखील रडीचा डाव खेळला. आभाळ आलं पण पाऊस पडलाच नाही. शेतकऱ्यांच हिरव स्वप्न शिवारात फुललच नाही. जे काही पीक आलं ते पीक काढणीला पुरलं नाही. 2020 च्या पिक विम्याचा प्रश्न देखील तसाच प्रलंबित राहिला गेला.विमा कंपन्यांना ठणकावून सांगण्याची त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची हिम्मत सरकारने दाखवलीच नाही.किमान राष्ट्रवादी सत्तेच्या वळचणीला गेल्यामुळे तरी खरीपाच्या अग्रीम पिक विम्याचा प्रश्न मार्गी लागला गेला.थोडीफार शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट निर्माण झाली. दुष्काळ जाहीर केला मात्र दुष्काळाच्या अंमलबजावणीचा “दुष्काळ”जाणवू लागला आहे.अजूनही शेतकऱ्यांना ठोस मदतीची कुठलीच घोषणा सरकारने केली नाही. शिंदे साहेब..! आपण मुख्यमंत्री झाला ही आनंदाची बाब आहे पण शेतकरी माय बापाची चूल मात्र तुमच्या कर्तबगारीने थंड पडत आहे. तुमच्या मोठमोठ्या कोरड्या घोषणामुळे शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढला आहे.दीड दिवसाला एक शेतकरी सरणावर जात आहे. जानेवारी 2023 पासून नोव्हेंबर पर्यंत 254 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. शेतकरी जगलाच नाही त्याच्या संसाराची राखरांगोळी झाली तर तुम्ही कुणाच्या जरी वळचणीला जाऊन बसलात तरी राज्य करणार कुणावर? याचा तरी थोडासा विचार करा. आता तरी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करा असं उद्विग्नपणाने शेतकरी वर्ग बोलू लागला आहे.
No comments:
Post a Comment