Sunday, October 29, 2023
परळी तालुक्यातील युवकाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या. गळफास लावून जीवन संपवले.
सर देवाचे घर कुठे आहे त्यांचा नंबर द्या.... सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या; तर मुलीचे मुख्यमंत्र्यांना हृदयपिळवणारे पत्र.!
हिंगोली (प्रतिनिधी) हिंगोली जिल्ह्या तील एका शेतकऱ्याने सततच्या नापिकी मुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात घडली. तर या घटनेने सदर शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आपले वडील गमवलेल्या मुलीने; हृदयपिळवणारे पत्र ज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.
शेगाव खोडके येथील शेतकरी नारायण खोडके यांनी सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. त्यानंतर इयता आठवीत मध्ये शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी किरण खोडके हिने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र पाठवले. ही चिमुकली आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी उद्देशुन म्हणते की; तुमचा दसरा चांगला गेला असेल आणि दिवाळी ही चांगली जाईल.! पण आमच्या घरी दसराही नाही आणि दिवाळी ही नाही. आई सतत रडत असते. सोयाबीनला भाव असता तर तुझा बाबा वारला नसता; असे सांगते. घरातुन गेलेला बाबा पुन्हा आलाच नाही. आजीला विचारले तर ती म्हणते बाबा देवा घरी गेले. सर देवाचे घर कुठे आहे त्यांचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला पाठवा असे भावणिक पत्र मुख्यमंत्री यांना लिहिले.
Friday, October 27, 2023
मराठा आरक्षणासाठी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाच्या उपाध्यक्षपदी डॉ.संतोष मुंडें.
मोठी बातमी! माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजाराने निधन .
शेतकरी, बेरोजगारी आणि ऊसतोड कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे लढवय्ये नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले
संघर्षशील नेते अशी बबनराव ढाकणे यांची ओळख होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांच्यावर अहमदनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. निमोनियाचं निदान झाले होते. तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. काल, गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. यात त्यांचे निधन झाले.
Monday, October 23, 2023
दुष्काळी परिस्थितीतही नवरात्र दांडिया उत्सव जोरात. लाखोंची उधळण.
शारदा विद्या मंदिर येथे नवरात्री निमित्त जागर नवदुर्गांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.यावेळी माता विद्यार्थी पालकांनी मनोरंजना सोबतच दांडियाचा लुटला मनसोक्त आनंद.
भवानीनगर दुर्गोत्सव येथे होम हवन संपन्न.आई जगदंबे सर्वांना आरोग्यमय आयुष्य दे! - भोजराज पालीवाल
Friday, October 20, 2023
भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते आरती संपन्न.
Monday, October 16, 2023
भवानीनगर दुर्गोत्सवाच्या वतीने देवी मुर्तीची उत्साहात स्थापना.शालेय विद्यार्थ्यां साठी विविध स्पर्धांचेही आयोजन.
Saturday, October 14, 2023
बीडच्या तिरूमला ग्रुपची ज्ञानराधा मल्टी स्टेट बँकेचे अध्यक्ष म्हणाले.अफवांवर विश्वास ठेवू नका.तुम्ही जेव्हा बँकेमध्ये याल तेव्हा तुमचे पैसे आम्ही देऊ'.
अनेकांच्या ठेवी मिळाल्या परत :
मागील 2 महिन्यांपूर्वीच मा. जिजाऊ मल्टीस्टेट या बँकेनं कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आणि अनेक लोक रस्त्यावर आले. त्यानंतर काही दिवसांतच पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरही जीएसटी विभागानं कार्यवाही करत 19 कोटींची मालमत्ता जप्त केली. या प्रकरणानंतर आता कुटे ग्रुपच्या मालकीची असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बुडाली अशी अफवा उठवली जात असल्याचे बघायला मिळतंय. त्यामुळं आपल्या ठेवी बुडतील, या भीतीने बँकेतील ठेवीदार मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी करतायत. मात्र, काल दुपारनंतर अनेक मोठ्या घडामोडी झाल्या आणि या दरम्यान अनेक लोकांच्या ठेवी परतही मिळाल्या. मात्र हे सर्व प्रकार बीड जिल्ह्यातच का घडतायचत? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.
बँकेचे अध्यक्ष काय म्हणाले? :यासंदर्भात प्रतिक्रिया देत बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे म्हणाले की, 'तुम्ही जेव्हा बँकेमध्ये याल, तेव्हा तुमचे पैसे आम्ही परत देऊ. कारण बँक सुस्थितीमध्ये आहे. त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ठेवीदारांना एकच विनंती आहे की, आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करू नका. शिस्तीत रक्कम काढून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी कुठलीही अडकाठी येणार नाही.'
उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष वाळकेंची प्रतिक्रिया :
ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या समोर आज अचानक ठेवीदारांनी गर्दी केल्यामुळे आम्हाला इथं यावं लागलं. आपापल्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केलीय. या अनुषंगाने आम्ही ब्रांच मॅनेजरशी बोललो. त्यांच्या मते, खातेदारांना त्यांची रक्कम परत देण्यात कुठलीही अडचण नाही. फक्त खातेदारांच्या गर्दीमुळे नियोजनात अडथळे येत आहेत. या संदर्भात बॅंकेच्या संस्थापकांनी त्यांना ठेवी परत देण्यात काहीच अडचण नसल्याचं स्पष्ट केल्याचं सांगत ठेवीदारांनी शिस्तीचं पालन करत, रांगेत उभं राहून आपापल्या ठेवी परत घ्याव्यात, संयम दाखवावा, असं आवाहन वाळके यांनी केलंय.
*नवरात्री विशेष* दुर्गा मातेचे दैवी रूप पाहून खरी दुर्गा पूजा साजरी करा : गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी.संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान.
आजपासून सरकारकडे दहा दिवस.आम्हा ला हक्काचं आरक्षण पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांचा सभेपूर्वी मोठा इशारा!
जालना (प्रतिनिधी) जालन्यातील अंतरवली सराटी गावात आरक्षणासाठी मराठा समाजातील लोक एकवटले आहेत. जरांगे पाटील यांनी सभेला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सूचक इशारा दिला आहे.
आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे. ते सरकारला द्यावंच लागेल. सरकारने भावना शून्य होई नये, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
आजपासून दहा दिवस हातात आहे. दहा दिवसात आरक्षण द्यायचं आहे. हा सुवर्ण क्षण आहे. या क्षणाला साक्षीदार व्हायचं आहे. एकही मराठा घरी राहणार नाही. पण सरकारने भावना शून्य होऊ नये. त्यांनी दहा दिवसात आरक्षण द्यावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय.
जालन्यात आज मनोज जरांगेची तोफ धडाडणार; जालना-बीड रस्ते वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?वाचा.
शुक्रवारी रात्री दहा वाजल्यापासून ते शनिवारी (१४ ऑक्टोबर) रात्री १२ वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिले आहेत. सर्व वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- छत्रपती संभाजीनगर-पाचोड-शहागडमार्गे बीडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, बिडकीन, पैठण, मुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळसिंगीमार्गे बीडकडे जातील. छत्रपती संभाजीनगर, कचनेर कमान, बिडकीन, पैठण, मुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळसिंगीमार्गे बीडकडे जातील. छत्रपती संभाजीनगर, पाचोड, डोणगाव फाटा, विहामांडवा, पैठण, मुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळसिंगीमार्गे बीडकडे जाता येईल.
- छत्रपती संभाजीनगर ते बीडकडे जालनामार्गे जाणारी वाहतूक छत्रपती संभाजीनगर, बदनापूर, जालना, घनसावंगीमार्गे बीडकडे जाईल.
Thursday, October 12, 2023
भाजपा विचारसरणीमुळे देशात लोकशाही धोक्यात.ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचा घणाघात.
अवैध वाळू माफियांची मुजोरी; पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातली कार.
गेवराई (प्रतिनिधी) जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध वाळू माफियांची मुजोरी समोर आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली आहे. या घटनेत पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे गणेश मुंडे आणि पोलीस कर्मचारी वायबसे हे गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगावच्या वाळू साठ्याची पाहणी करून राक्षसभुवनकडे जात होते. त्यावेळी राक्षसभुवन फाट्यावर काळ्या रंगाची बिना नंबरची कार थांबलेली होती. ही कार गणेश मुंडे यांच्या कारचे लोकेशन घेत निघालेली होती. त्यावेळी मुंडे यांनी त्या काळ्या रंगाच्या कारला हात दाखवला आणि विचारपूस करण्याचा प्रयत्न केला.
त्या गाडीतील चालकाने गणेश मुंडेंच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यात मुंडेंच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी हा जालना जिल्ह्यातील गोंदी येथील असल्याचं सांगितलं जात आहे.
Tuesday, October 10, 2023
बीडमध्ये प्रकाश आंबेडकरांची परिवर्तन महासभा. काय बोलणार महाराष्ट्राचे लक्ष..
शिवसेनेच्या वतीने सागर कुकडे यांचा सत्कार. सागर याने क्रीडा क्षेत्रात परळीचा नावलौकिक वाढवावा-अभयकुमार ठक्कर
Friday, October 6, 2023
निवेदिता धावडे यांचे सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर रविवारी परळीत प्रबोधन.
Thursday, October 5, 2023
हिटरमुळे ड्रम फुटून उकळते पाणी अंगावर पडले, मायलेकराची मृत्यूशी झुंज मदती च्या हातांची गरज.
आष्टी ( प्रतिनिधी): हिटर सुरू राहिल्याने पाण्याने भरलेले ड्रम वितळून उकळते पाणी अंगावर पडल्याने दोन चिमुकल्यासह आई गंभीर भाजल्याची घटना घडली होती. त्यात तीन दिवसापूर्वी मुलीचा मृत्यू झाला. तर आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मायलेकरांच्या उपचाराची परवड होत आहे. याबाबत माहिती मिळताच मदतीचे हात सरसावले. मात्र, अजूनही मोठ्या मदतीची गरज असल्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहेझाला.
आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथील २६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान ड्रम वितळून उकळते पाणी जवळच झोपलेल्या सुनीता योगेश सावंत ( ३०), श्रेयश ( ८) , श्रेया ( ५) यांच्या अंगावर पडले. यात तिघेही गंभीर भाजले. पुणे येथील ससून रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, रविवारी ( दि.१) सकाळी ५ वर्षीय श्रेयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तर आई व मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या कुटुंबाची परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च पेलवणे अवघड होत आहे. याची माहिती मिळताच काही त्यांना मदत केली. मात्र, आणखी मदतीची गरज असल्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे. योगेश सावंत, शहाजी सावंत यांच्या ८८०६२५६१०२ या मोबाईल नंबरवर युपीआय द्वारे मदत करण्याचे आवाहन सांगवी आष्टीचे सरपंच विनोद खेडकर यांनी केले आहे.
कर्मचाऱ्याला मागितले १५ लाख माजलगाव च्या माजी नगराध्यक्षांवर गुन्हा.
माजलगाव (प्रतिनिधी) : येथील माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी नगरपालिकेचे कर्मचारी शिवहर शेटे यांना १५ लाखांची खंडणी मागितली. तसेच धमकी देऊन फसवणुक केल्या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव नगरपालिकेचे नामांतर विभाग प्रमुख शिवहर चनबसअप्पा शेटे यांना १४ फेब्रुवारी २०१९ रोजी नगरपालिकेत शेख मंजूर हे गेले. तेथे त्यांनी शेटे यांना काही कामे करण्यास सांगितले. नियमात बसत असेल तरच काम करेल असे सांगताच मंजूर यांनी हुज्जत घातली. तू सामान्य कर्मचारी आहे, तुझी वाट लावतो. माझे न ऐकल्यास तुला जीवे मारील, अशी धमकी दिली. याचवेळी तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी दोघांनाही बोलवुन घेतले. चाऊस यांच्यासमोरही हा माझे काम कसे करीत नाही, असे म्हणत काटा काढील. त्याला सस्पेंड करील, त्याच्या तक्रारी करीन अन्यथा मला पंधरा लाख रुपये देण्यास सांगा, अशी धमकी मंजूर यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, शेख मजुर यांनी शेटे यांच्या वेगवेगळ्या तक्रारी करून त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे परिवार भयभीत झाला होता. त्यानंतर मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी ४ जुलै २०२३ बोलून घेतले व पुरावे देण्यास सांगितले. त्यानंतर आपण सर्व पुरावे पोलिसांना दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात शेख मंजूरविरोधात गुन्हा दाखल केल्याचे शेटे यांनी म्हटले आहे.
Wednesday, October 4, 2023
दूध खरेदीचा दर वाढवा गायीच्या दूधला 40 रुपये तर म्हशीच्या दूधाला 75 रुपये प्रतिलीटर द्या. शेतक-यांची मागणी.
बीडमधील हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी.
बीड (प्रतिनिधी) : शहरात हातभट्टी दारू, शिंदी, ताडी तयार करून विक्री करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
प्रल्हाद बापुराव भालशंकर (रा.हनुमान नगर, बीड) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात बीड शहरात शिंदी, ताडी दारू तयार करणे, जवळ बाळगणे आणि तिची विक्री करणे अशा स्वरूपाचे ९ गुन्हे दाखल आहेत. पाेलिसांनी वारंवार कारवाया केल्यानंतरही तो जुमानत नव्हता. अखेर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशानुसार बीड शहरचे पोलिस निरीक्षक मुकूंद कुलकर्णी यांनी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला.
याला मान्यता मिळताच बुधवारी त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक संतोष साबळे, शहरचे मुकूंद कुलकर्णी, उपनिरीक्षक किरण पवार, सुशेन पवार, अशपाक सय्यद, मनोज परजणे, शेख शहेंशाह, सिरसाट, अभिमन्यू औताडे, बप्पासाहेब घोडके आदींनी केली.
पाटोदा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी १० हजाराची लाच घेताना पकडले.
बीड (प्रतिनिधी) : वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी व कृषिसेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील विस्तार अधिकाऱ्याने दहा हजारांची लाच मागितली. ती स्विकारतानाच धाराशिवच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी पाटोदा शहरात करण्यात आली.
जयश मुकूंद भुतपल्ले (वय ३६, विस्तार अधिकारी कृषि, वर्ग-३, पंचायत समिती पाटोदा) असे लाच स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने तक्रारदाराकडून तुमच्या कृषि सेवा केंद्र दुकानातील औषधाचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी दहा हजाराची मागणी केली होती. यामध्ये दहा हजाराची रक्कम घेताना भुतपल्ले याला धाराशिव एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, पोलीस उपअधीक्षक धाराशीव सिद्धराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस अंमलदार विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, दत्तात्रय करडे यांनी केली.
सागर संजय कुकडे यांचा क्रीडा रत्न पुरस्काराने गौरव.
Tuesday, October 3, 2023
दारू पिण्यासाठी मोटारसायकलींची चोरी.दुचाकी चोरांची टोळी जेरबंद
दारू पिण्यासाठी चोरी
हे आरोपी दारू पिण्यासाठी मोटरसायकल चोरत होते. मोटारसायकल चोरून विक्री करणाऱ्या या टोळीने संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
श्री ठक्कर यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सत्कार.सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी यापुढेही कार्यरत राहणार-अभयकुमार ठक्कर.
Monday, October 2, 2023
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २० वर्षांचा सश्रम कारावास. आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले.
बीड (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी भिमराव बळीराम धुमक (रा. घाटेवाडी, ता. केज, जि. बीड ) याला २० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड व दंड न भरल्यास दीड महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा केज येथील सत्र न्या. के. डी. जाधव यांच्या न्यायालयाने सुनावली.
या प्रकरणातील पीडित मुलीस भिमराव धुमक याने बळजबरीने कारमध्ये बसवून अंधोरा मस्सा, पंढरपूर, आळंदी व नंतर भोसरी येथे नेऊन भाड्याने रूम करून तेथे पीडितेची इच्छा नसतानादेखील तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध अपहरण, बलात्कार. ३४ भादंवि आणि कलम ४ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए. एन. वाठोडे यांनी करून अंबाजोगाईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्या. के. डी. जाधव यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर झालेला पुरावा व सहायक सरकारी वकील राम बिरंगळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी भिमराव बळीराम धुमक यास अतिरिक्त सत्र न्या. जाधव यांच्या न्यायालयाने दोषी ठरविले.
आरोपीस कलम ३६३ भादंविनुसार दोषी धरण्यात आले. त्यास पाच वर्षे कारावासाची शिक्षा व कलम ४ पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षे कारावास व पीडितेस एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी व नुकसान भरपाई न भरल्यास दीड महिना सश्रम कारावसाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात अभियोग पक्षाच्या वतीने राम बी. बिरंगळ यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील आर. पी. उदार, सहायक सरकारी वकील एस. व्ही. मुंडे, पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक लांडगे यांनी सहकार्य केले.