Tuesday, June 20, 2023

पंढरपूरात 115 इमारती धोकादायक पडक्या मठ, धर्मशाळांत भाविकांनी राहू नये : पालिकेचे आवाहन

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील तब्बल 115 मठ आणि धर्मशाळा यांच्या इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या धोकादायक इमारतीमध्ये वारक-यांनी मुक्कामासाठी उतरू नये असे आवाहन पंढरपूर पालिकेने केले आहे. तसेच धाेकादायक इमारतींवर सावधनतेचे फलक लावले आहेत. 
आषाढी एकादशी  निमित्त लाखाे भाविक पंढरपूरला येत असतात. भाविकांची काेणतीही गैरसाेय हाेऊ नये यासाठी पंढरपूरात प्रशासन सज्ज झाले आहे. भाविकांसाठी एसटी महामंडळाने यंदा नवे बसस्थानक खूले करण्याचे नियाेजन केले आहे. भाविकांना विठ्ठलाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी पत्रा शेड उभारण्यात आले आहेत. पंढरपूरात सध्या माेठ्या संख्येने भाविक दाखल हाेऊ लागले आहेत.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील मठ, धर्मशाळा आणि राहत्या घरांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये 115 मठ, धर्मशाळा धोकादायक झाल्याची गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे.

या सर्व धोकादायक इमारतींच्या मालकांना संबंधित इमारती उतरवून घेण्याच्या लेखी सूचना पालिकेतून देण्यात आल्या आहेत. तसेच पालिकेने शहरातील अशा सर्व धोकादायक इमारतींवर सूचना फलक लावले आहेत. अति धोकादायक इमारती पालिका स्वत: पाडणार असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment