Monday, March 13, 2023

पेपराच्‍या दिवशी दहावीतील मुलीचा बालविवाह; आई– वडीलांसह १८३ जणांवर गुन्हा दाखल.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 
: बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहने डोकं वर काढले आहे. दहावी वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह आज तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आला. हा धक्कादायक प्रकार बीडच्या  परळी तालुक्यातील नंदागौळ गावात उघडकीस आला आहे. तर याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल १८३ जणांवर गुन्‍हा दाखल केला आहे.
पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीवरून परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एका १६ वर्षीय मुलीचा गावालगत असणाऱ्या चोपणवाडी येथील तरुणाशी आज दुपारी बालविवाह झाला. सदर मुलगी इयत्ता दहावीत शिकत असुन तिचा आज गणित विषयाचा पेपर सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे होता. मात्र ती पेपरला गैरहजर होती. त्याचवेळेत तिचा बालविवाह झाला.
बीड येथील चाईल्ड लाईन सदस्य तत्वशिल कांबळे यांना या विवाहासंदर्भात माहिती होताच त्यांनी बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासकीय यंत्रणा नंदागौळला पोहचण्यापुर्वीच बालविवाह झाला. त्यानंतर तत्वशिल कांबळे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली.

१८३ जणांवर गुन्‍हा दाखल

परळी येथे झालेल्‍या बालविवाह प्रकरणी आता मुला– मुलीच्या आई- वडीलांसह मामा- मामी, भटजी, फोटोग्राफर, मंडपवाला, आचार्यावर आणि नंदागौळसह चोपणवाडी लग्नाला असणाऱ्या तब्बल १८३ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment