Saturday, February 25, 2023

आ.नमिता मुंदडा यांनी केज शहरासाठी आणला तब्बल 76 कोटीचा निधी. केज शहरातील रस्ते होणार चकाचक.


केज (प्रतिनिधी) केज तालुक्याच्या लोकप्रिय आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे केज विधानसभा मतदार संघातील विकासकामांसाठी शासनाकडून भरभरून निधी दिला जात आहे. आ. मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे नगरोत्थान योजनेंतर्गत केज शहरातील पाच रस्त्यांसाठी तब्बल ७६ कोटी रुपयांच्या निधीस शुक्रवारी (दि.२४) मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच केज शहरातील पाच प्रमुख रस्ते चकाचक सिमेंट कॉंक्रीटचे होणार असून नागरिकांची खड्डेमय रस्त्यांच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. केज वासियांची अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या उमरी रोड, कानडी रोड व मंगळावर पेठ रस्त्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. केज शहरातील रस्त्यांसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.

दिवसेंदिवस केज शहर चौफेर वाढ होत आहे. केजमध्ये राहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक प्राधान्य देतात. त्यामुळे नवनवीन वसाहती तयार होत आहेत, त्यासोबतच लोकसंख्याही वाढत आहे. उमरी रोडच्या आजुबाजूला व लगत तर अनेक नवीन कॉलनी अस्तित्वात आलेल्या आहेत. या वाढत्या शहरीकरणाची गरज लक्षात घेऊन आ. नमिता मुंदडा यांनी शहरासाठीच्या विकासकामांकडे विशेष लक्ष दिले आहे. रस्त्यांची वारंवार होणारी दुरावस्था लक्षात घेऊन शहरात सिमेंट कॉंक्रीटचे पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर आ.नमिता मुंदडा, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून केज शहरात सिमेंट कॉंक्रीटचे पाच रस्ते तयार करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून तब्बल ७५ कोटी ८५ लाखांचा निधीस शासनाने शुक्रवारी मंजुरी दिली. हे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत. सदरील रस्ते उत्तम दर्जाचे होणार आहेत. प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणात केज शहरातील रस्ते कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, लोकप्रिय खासदार प्रितम ताई मुंडे, पालकमंत्री अतुल सावे व सार्वजनिक बांधकाम मंञी रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

स्व.विमलताई मुंदडा यांनी केज मतदारसंघात विकासाची गंगा आणली होती. त्यांचेच अनुकरण करत मी केज मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मतदारसंघातील इतर आवश्यक विविध विकासकामांसाठी देखील सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच त्या साठी निधी मंजूर होईल अशी अपेक्षा आहे. —– आ. नमिता मुंदडा.

No comments:

Post a Comment