*बीड जिल्ह्यातून एसएफआय कार्यकर्ते सहभागी होणार . 

बीड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंदीचा निर्णय आणि भारतातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्याची झालेली दुर्दशा सुधारून त्याचे "राष्ट्रीय स्मारक" व्हावे या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने "शिक्षण ज्योत" काढण्यात येणार आहे.
एसएफआयचे १८वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दिनांक १८ ते २० नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शिवनेरीच्या पायथ्याशी पार पडत आहे. याची जोरदार तयारी एसएफआयच्या वतीने करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर दि. १७ नोव्हेंबर रोजी भिडेवाडा ते शिवनेरी अशी १०० किलोमीटर पायी, धावत "शिक्षण ज्योत" एसएफआयच्या वतीने काढण्यात येणार आहे, अशी माहिती एसएफआय राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी दिली.
एसएफआयने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, ज्या राज्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी सर्व सामाजिक बंधने झुगारून मुलींच्या, समाजाच्या शिक्षणासाठी काम केले. त्यांनी १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाड्यात ९ विद्यार्थिनींसह मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्याच राज्यात राज्य सरकार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करत आहे. हे फारच गंभीर आहे आणि फुले, शाहु, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि समाजकार्याचा हा अपमानच आहे. या निर्णयाचा एसएफआय तीव्र विरोध करते. यापूर्वी देखील एसएफआयने राज्यभरात शाळा वाचवा आंदोलन केले आहे.
       भिडेवाड्या पासून निघणाऱ्या या शिक्षण ज्योतचे उदघाटन प्रसिद्ध विधीतज्ज्ञ असिम सरोदे करणार असून हि ज्योत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी येथे समाप्त होणार आहे. यामध्ये पुणे आणि बीडसह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
        ही शिक्षण ज्योत पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या मार्गाने शिक्षण ज्योत दापोडी येथे भारतीय स्वातंत्र चळवळीतील क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढचे प्रस्थान करणार आहे. त्यानंतर भोसरी, मोशी, चाकण मार्गे भारतीय क्रांतिकारक शहीद राजगुरू यांची जन्मभूमी असलेल्या राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुढे जाईल. त्यानंतर हुतात्मा बाबू गेनू यांची जन्मभूमी असणारा परिसर मंचर मार्गे शिक्षण ज्योत नारायणगावला पोहचेल. तेथून पुढे किल्ले शिवनेरी (छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ) जुन्नर या ठिकाणी "शिक्षण ज्योत" ची समाप्ती होईल.