Thursday, June 9, 2022

विधानपरिषद निवडणूक पक्षाने पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलले कार्यकर्त्यांत संतापाची लाट मराठवाड्यातून भाजपाला हद्दपार करणार.


पंकजाताई यांना विधान परिषद निवडणुकी करीता डच्चू मिळाल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. मराठवाड्यातील भाजपाला सुरुंग लावण्याची सध्या त्यांच्यात चर्चा आहे. मराठवाड्यातुन भाजपाला हद्दपार करण्यासाठी ताईंचे समर्थक नियोजन करण्याच्या विचारात आहेत.
भाजपाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे, ताई नाही तर भाजपा नाही, अशी कठोर भूमिका पंकजा मुंडे समर्थकांनी मांडत संपूर्ण मराठवाड्यातून ‘कमळ’ हद्दपार करण्याची मागणी केली आहे. विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी डावलण्यात आल्याने पंकजा समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मराठवाड्यातील भाजपचं ज्वलंत नेतृत्व म्हणून पंकजा मुंडेंची ख्याती आहे. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींपुढे त्यांना अनेकदा नमतं घ्यावं लागतं. यंदादेखील विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल, असं जवळपास निश्चित वाटत होतं. या निमित्ताने पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संधी मिळेल, अशी शक्यता वाटत होती. कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. संधी मिळाली तर त्याचं अवश्य सोनं करीन, असं वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केलं होतं. मात्र ऐनवेळी सूत्र हलली आणि पंकजा मुंडे यांना विधान परिषदेतून डच्चू देण्यात आला. यावर मराठवाड्यातील मुंडे समर्थकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या या धोरणावर चिडून त्यांनी आमच्या भागातून कमळ हद्दपार करू, असा इशाराच दिला आहे.

मराठवाड्यात प्रचंड प्रमाणात नाराजी
पंकजा मुंडे यांना विधानपरिषद उमेदवारी डावलल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. ताई नाही तर भाजपा नाही… अशा आशायाचे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याच्या सोशल मीडियावरील एक पोस्ट अधिकच व्हायरल होत आहे. ताईंना विधान परिषद उमेदवारी न दिल्यामुळे आता गंगाखेड तालुक्यातून ‘कमळ’ हद्दपार करण्याचा इशारा गंगाखेडचे मुंजाराम मुंडे यांनी सोशल मीडियावर दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील समर्थकांनी दिलेला हा इशारा भाजपासाठी धोकादायक ठरू शकतो. ओबीसी समाजाचं खंबीरपणे नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील भाजपचं प्रभुत्व कायम राखलं आहे. मागील विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यासमोर हार पत्करावी लागल्यानंतरही पंकजा मुंडेंचा प्रभाव या पट्ट्यात टिकून आहे. मात्र वरिष्ठांनी पंकजांची विधान परिषदेतील नाकारलेली संधी पाहता, भाजपासाठी समर्थकांचा इशारा गंभीर ठरू शकतो. या चिडलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना भाजपा कसी थोपवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment