मुंबई (प्रतिनीधी) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे . एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे मविआ सरकार धोक्यात आले आहे . याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे . भाजपने आपल्या सर्व आमदारांना भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत . भाजपने " पुढचे ४८ तास संपर्कात राहा " असा आदेश आपल्या सर्व आमदारांना दिला आहे . तसंच कोणत्याही दौऱ्यावर आणि परदेशात जाऊ नका , कोणत्याही क्षणी तुम्हाला मुंबईत पोहचायला लागू शकतं त्यामुळे संपर्कात रहाअसं भाजपने आपल्या सर्व आमदारांना सांगितलं आहे . भाजपने आपल्या सर्व आमदारांना अशा सूचना दिल्याने महाविकास आघाडीची धाकधूक आणखी वाढली आहे . एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचं सांगितलं होतं . शिवसेनेचे एकुण ५५ आमदार आहेत , त्यातले सुमारे ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे मविआ सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे . तर दुसरीकडे भाजपने वे अॅन्ड वॉचची भूमिका घेतली असली तरी पडद्याआड प्रचंड हालचाली सुरू आहेत .बोलताना शिंदे यांनी माझ्यासोबत ४० आमदार असून इतर १० आमदारांचा पाठिंबा देखील मिळणार असल्याचं सांगितलं आहे . शिवाय आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे . शिवाय एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सरकार स्थापन करण्यात यशस्वी होणार की महाविकास आघाडी आणखी काही खेळी करणार याकडे राज्यभरातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे . सामशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले , सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर फारकत घेऊ शकत नाही . तसंच जे हिंदुत्व बाळासाहेबांचे आहेते हिंदुत्व आणि तीच कडवट भूमिका घेऊन आपण या पुढील राजकारण समाजकारण करणार असल्याचंही शिंदे म्हणाले . शिवाय आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत . एकीकडे शिवसेनेने एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव नाकारला आहे , तर दुसरीकडे भाजपने मात्र हालचाली सुरू केल्या आहेत .