मुंबई (प्रतिनीधी) - देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान असून, यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रणी राज्य राहील. महाराष्ट्रातील संतांनी देशाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध करण्याबरोबरच समाजाला नवी दिशा दिली, यातून हिंदुस्थानमध्ये नवीन चेतना जागृत झाली, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्यात राष्ट्रपती कोविंद बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, आंतरराष्ट्रीय बोन्सायतज्ञ डॉ. प्राजक्ता काळे, डॉ. डी. काय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तसेच लक्ष्मीदत्त या कॉफिटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले.
रामनाथ कोविंद म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सरदारांनी हिंदुस्थान एकजूट करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. सामाजिक कामातही महाराष्ट्राने आघाडीची भूमिका बजावली. मुलींच्या शाळेच्या पहिल्या संस्थापक सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांनी या भूमीला पावन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीतून शोषित, वंचितांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी कार्य केले आणि ते एक आदरणीय व्यक्तीमत्व ठरले.
दगडूशेठ दाम्पत्याने पुण्यात गणपती व लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराच्या माध्यमातून नवीन ऊर्जा दिली. दगडूशेठ हलवाई यांनी लोकमान्य टिळकांसोबत राष्ट्रीयता आणि सामाजिक सद्भावनेचा स्रोत म्हणून उत्सवाला सुरुवात केली. तेच महाराष्ट्रात जनआंदोलन बनविण्याचे माध्यम झाले. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असून, देशातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र यापुढेही चांगले योगदान करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप कळसे-पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त ऍड. शिवराज कदम जहागिरदार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment