मांजरसुंबा – अंबाजोगाई या महामार्गाचे काम दोन वर्षांपूर्वीपासून रडतपडत करणाऱ्या गुत्तेदारास अनेकदा सूचना देऊनही कामात सुधारणा होत नसल्यानं नमिता मुंदडा यांनी गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत गुत्तेदारास तिसऱ्या पट्टीत खडसावत नमिता मुंदडा यांनी त्यांच्याकडून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करणार असल्याचं लेखी पत्र घेतलं.

केज विधानसभा मतदार संघातील नागरिकांना होणारा त्रास तुम्हीही अनुभवा, असं म्हणत आमदार मुंदडा यांनी गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडनं दुचाकीवरून फेरी मारण्यास भाग पाडलं. खड्डे आणि धुळीच्या रस्त्याची फेरी मारल्यानंतर मग या गुत्तेदारानं दिलगिरी व्यक्त करत काम लवकर पूर्ण करण्याची हमी दिली आहे.
केज मतदार संघातून जाणाऱ्या या महामार्गाचं काम गुत्तेदाराच्या ढिसाळपणामुळे मागील 2 वर्षांपासून रखडल्यामुळे नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा सूचना देऊनही गुत्तेदाराच्या कामात सुधारणा होत नसल्यानं आमदार नमिता मुंदडा यांनी गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. बैठकीत गुत्तेदारास चांगलंच फैलावर घेतलं.
अंबाजोगाईतील भगवानबाबा चौक ते मांजरसुंबा हा 82 किमीचा 548-ड महामार्ग जातो. याचं काम कोरोनाच्या काळात रखडलं. कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही गुत्तेदाराचा ढिसाळपणा आणि नियोजनाचा अभाव यामुळे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत गुत्तेदाराने रडत-पडत 90 टक्के काम पूर्ण केलं आहे.
No comments:
Post a Comment