Wednesday, April 13, 2022

*आधुनिक भारताचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.१४ एप्रिल जयंती निमित्त विशेष लेख.

 
आज १४ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती  निमित्त त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा हा खास लेख आपल्यासाठी. 
   मित्रांनो, जागर से जो टकराता है, उसे तुफान कहते है, और तुफान से जो टकराता है उसे भिमराव रामजी आंबेडकर कहते है !  या उक्तीप्रमाणे बाबासाहेबांचे बालपण अतिशय कष्ट करण्यातच गेले. १४ एप्रिल १८९१ साली मध्य प्रदेशातल्या 'महू' या गावी जन्म झालेल्या बाबासाहेबांना फार काळ आईची माया मिळाली नाही. ते अवघ्या पाच वर्षाचे असताना त्यांची  आई त्यांना सोडून देवाघरी गेली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील अंबावडे हे त्यांचे मूळ गाव. भीमरावांची आत्या बाबासाहेबांच संगोपन करत असताना सैन्यात सुभेदार असलेल्या रामजी सपकाळ यांना भीमरावांनी शिकून खूप मोठे व्हावे असे वाटत होते.  
       बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. बाबासाहेब पुढे इंग्रजी शिक्षणासाठी मुंबईच्या मराठा हायस्कूलमध्ये शिकू लागले, पण याच काळात आपल्याच बांधवांकडून स्पृश्य-अस्पृश्यतेची मिळालेली वागणूक बाबासाहेबांना खूप काही शिकवून गेली. यातूनच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व इतर सार्वजनिक कार्याची प्रेरणा बाबासाहेबांना मिळाली हे कटू सत्य मला, तुम्हाला, आपणा सर्वांना नाकारता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बालपणापासूनच वैचारिक दृष्टिकोन अतिशय प्रगल्भ होता, हे त्यांनी पुढे मांडलेल्या विचारातून स्पष्टपणे दिसून येते. 'शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा' या विचारांप्रमाणे बाबासाहेब प्रथम शिकले. शिकत असताना बाबासाहेबांना अनेक प्रश्न पडले. आज आपल्याला सगळं आयत  मिळतं म्हणून आपणाला प्रश्नच पडत नाही. पण बाबासाहेबांच तसं नव्हतं, म्हणून त्यांच्या मनात विचारांचे काहूर उठत असत. आपल्या  समाजात वैदिक काळात जातीव्यवस्था नव्हती म्हणून अस्पृश्यता ही नव्हती. मग ही कीड आपल्या समाजात कधी आली हे नक्की सांगता येत नसले तरी, या अन्यायाविरुद्ध कोणी आवाज उठवला नाही का ? तो दूर करण्याचा प्रयत्न केला नाही का ? केला तर मग कोणी केला ? यात रामानुजाचार्य, बसवेश्वर, चक्रधर, एकनाथ, तुकाराम या महान पुरुषांनी समतेची व बंधुत्वाची शिकवण दिली, तर फुले दांपत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अस्पृश्यांच्या शिक्षणाकरीता खर्ची घातले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृशांसोबत जेवण तर केलेच पण त्यांच्यासाठी शाळाही उघडल्या. अशा या सर्व पुरुषां पैकीच बाबासाहेब एक होते. म्हणून मी तर असे म्हणतो 
     बाबासाहेब विशादातही  चमकणारे तुम्ही तेजस्वी तारे होता, जगी घाव घालणारे तुम्ही परिवर्तनाचे वारे होता, तुमचे विचार आत्मसात करून या जागी बदल लागले होऊ, हे शतशः अभिवादन करतो आज तुम्हाला भीमा भाऊ, आज तुम्हाला भीमा भाऊ. 
    १९०७ साली दहावी शालांत परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर बाबासाहेबांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमधून बी.ए. ची पदवी संपादन केली. मागासवर्गीय पहिला पदवीधर मुंबई विद्यापीठातून प्रथमच बाहेर पडला. त्यावेळी मागासवर्गीय समाजाच्या आनंदाला सीमा, पारावार राहिला नाही. बडोदा संस्थाने दरमहा २५ रुपये एवढी शिष्यवृत्ती मंजूर केली. पुढील उच्च शिक्षण अमेरिकेच्या कोलंबिया या जगप्रसिद्ध विद्यापीठातून पूर्ण करत एम. ए.,पीएच.डी. पूर्ण केली. ज्यावेळी बाबासाहेबांनी अमेरिकेत प्रवेश केला, त्यावेळी शिवा-शिव, जातीपातीची  बंधने तर नव्हतीच पण अतिशय उच्च दर्जाच्या प्राध्यापकांनी बाबासाहेबांना घडविले. पिण्याचे पाणी न देणे,वाहनात बसू न देणे, वर्गाबाहेर बसून शिकणे, या कुप्रथा अमेरिकेत नव्हत्या. नेमक्या याच गोष्टींनी भारतीय समाज रसातळाला गेला होता. ही बाब बाबासाहेबांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून १९१९ साली बि्टीश भारताच्या संसदेत बाबासाहेबांनी आवाज उठवला. यामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले. बाबासाहेबांनी  मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू करून तमाम मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. हे बाबासाहेबांचे महान कार्य आज कोणताच राजकीय पुढारी मोठ्या जोमाने पुढे नेताना दिसत नाही. म्हणून मी तर असं म्हणतो 
ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी, बाबासाहेबांचा जीव फक्त तळमळत होता, बहुजन मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी, अशी होती बाबासाहेबांची छाती म्हणूनच जगभर पसरली होती त्यांची ख्याती.
 १९२६ रोजी बाबासाहेब मुंबई प्रांतिक विधान परिषदेचे सदस्य बनले तेव्हा १९२७ साली, जनावर जाऊन बसत, बायाबापड्या कपडे धुवित, त्या चवदार तळ्यावर मागासवर्गीय समाजाला पाणी भरण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणून चवदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी करून, अस्पृश्य समाजाला त्याचा न्याय हक्क  मिळवून दिला. अहो एवढेच काय २मार्च १९३० रोजी नाशिक मुक्कामी मोठे जनआंदोलन करून काळाराम मंदिर प्रवेश सर्वांसाठी खुला केला. पण आज आमच्या माता-भगिनींना केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेश नाकारला जातो. आज बाबासाहेब असते तर अशा घटनांमुळे बाबासाहेबांनी कायदा मंत्रीपदाला लाथ मारून स्वाभिमानाचे जगणे पसंत केले पण. आज सत्ता आणि पैशाला हपापलेले मंत्री राजीनामा देताना दिसत नाहीत म्हणून असं वाटतंय 
हजारो संकटे आली, तरी भिम माझा झुकलाच नाही, उपाशी पोटी राहीला पण कधी सुटलाच नाही. 
बाबासाहेबांनी मनात आणलं असतं तर आजही त्यांच्या एवढा श्रीमंत मागासवर्गीय माणूस जगात शोधूनही सापडला नसता. १९२० च्या दशकात बाबासाहेब दलितांचे नेते बनले. त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेस आणि गांधी यांनी दलितांवरील अन्याय केल्याचा ठपका येऊ लागला, तेव्हा ८ ऑगस्ट १९३० रोजी मागासवर्गीय समाजाची भूमिका बाबासाहेबांनी संसदेसमोर मांडली व काही मागण्या मान्य करून घेतल्या. तिकडे गांधीजी उपोषणाला बसले होते पण राष्ट्रहित लक्षात घेऊन गांधींचे प्राण जाऊ नयेत म्हणून विधिमंडळ व सरकारी नोकऱ्यात काही जागा राखीव करून पुणे करार संपन्न झाला. बाबासाहेब शिक्षणाच्या संदर्भात म्हणतात, 'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करील तो नक्कीच गुरगुरल्याशिवाय राहणार नाही' पण आज बहुजन समाज शिकूनही कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला आश्रय घेत असल्याने तो गुरगुरतांना दिसत नाही, म्हणून मित्रांनो लक्षात असू द्या, आज आम्हाला ना घड्याळ,ना इंजिन,ना कमळ, ना बाण,ना गांधींची नोट पाहिजे आज डोक्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा थॉट पाहिजे. तुमच्यासाठी बाबांसाहेबांनी कित्येक लढाया लढल्या, सत्तेसाठी तुम्ही किती काढल्या, ना कोट, ना वोट, ना मतांचा घाट पाहिजे, आज डोक्यामध्ये फक्त बाबासाहेबांच्या विचारांचा थाट पाहिजे. बहुजन समाज शिकला पाहिजे, सुधारला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज तर मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालय सुरू करून सुजाण नागरिक घडविण्याचे महान कार्य केले. एवढे करूनही हिंदू धर्मात सुधारणा होत नाही याची जाणीव झाल्यावर १३ ऑक्टोबर १९३५ रोजी, नाशिकच्या येवला शहरात, लाखो अनुयायांच्या उपस्थितीत, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, अशी भीमगर्जना केल्यावर देशभरासह जागतिक स्तरावरून धर्म संस्थांमध्ये वाद निर्माण झाले. तेव्हा कुठे हिंदू समाजातील कुप्रथा नाहीशा होऊ लागल्या‌. हिंदू धर्म से नफरत करो ये कुराण नही कहता, कथा भारत की मज्जिदे तोडो ये श्रीराम नही कहते, है दोस्तो रोटी का कोई धर्म नही होता, पानी की कोई जात नही होती, जहां इन्सानियत जिंदा है, वहां मजहब की बात नही होती, किसी को लगता है, हिंदू खतरेमे है, किसी को लगता है मुसलमान खतरे मे है, धर्म का चष्मा उतर कर देखो यारो पता चलेगा कि आज के हमारे नेताओ के कारण हमारा विकास (हिंदुस्तान) खतरे मे है ! अशा राजकारण्यांना ओळखूनच बाबासाहेब म्हणाले होते, 'गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल' तेव्हा कुठे देशात स्वातंत्र्य, समता, बंधुत्चाचे वारे वेगाने वाहू लागले. बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदु कोड बिल कायदा पास झाला असता तर आज देशात याहूनही वेगळी अतिशय चांगली परिस्थिती दिसून आली असती. एस.सी., एस.टी., ओबीसी व बहुजन समाजातील तमाम शेतकरीवर्ग सुखासमाधानाने जीवन जगला असता पण तसे झाले नाही. एप्रिल १९४६ मध्ये ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केल्याने नवीन प्रांतिक सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाली होती. या देशाचा कारभार राज्यघटनेनुसार व्हावा म्हणून देश एका घटना तज्ञांच्या शोधात होता. तेव्हा सेलिग्मन या विचारवंताने दुसऱ्याचा शोध कशाला घेता, तुमच्याच देशात एवढा मोठा उच्चविद्याविभूषित कायदेपंडित असताना. असे सांगितल्यावर सगळेच अचंबित झाले. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुढे आले. बाबासाहेबांनी मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवत घटनेच्या प्रत्येक कलमावर प्रकाश टाकला. तेंव्हा सगळे सभाग्रह बाबासाहेबांच्या विद्वत्तेचे पुढे नतमस्तक झाले. ही घटना दोन वर्ष अकरा महिने 18 दिवसात लिहून पूर्ण झाल्यावर 26 जानेवारी 1950 रोजी देशाला लागू करण्यात आली तेव्हा तमाम भारतीयांच्या आनंदाला उधाण आले होते. हे बाबासाहेबांचे महान कार्य आपल्याला विसरता येणार नाही म्हणून मला असं वाटतं, चरख्या शेजारी फोटो काढून कोणी गांधी होत नाही, कितीही तापवल तरी कलईची कधी चांदी होत नाही, माती उपसून रोड केला म्हणून कोणी कार्यसम्राट होत नाही, या दगदगीच्या काळातही बाबासाहेबांना समता आणि बंधुता चे विचार स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून सदाचाराचा मार्ग अवलंबित १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हे जरी खरे असले तरी, बाबासाहेबांनी हिंदू समाजाला कधीच शत्रू मानले नाही. या उलट ते हिंदू धर्माचे उद्धार करते राहिले याची खात्री तमाम भारतीयांना झाली होती. पण वेळ निघून गेली. बहुजन समाजाच्या या महामानवा वर ६ डिसेंबर १९५६ रोजी काळाने झडप घातली आणि मागासवर्गीयां बरोबर तमाम भारतीय समाजावर शोककळा पसरली. आज त्यांच्या या जयंतीदिनी मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून शेवटी एवढंच सांगतो, सिंह जरी गेला तरी विचार नाही मेला, ना दंगा ना पंगा, ना रक्ताळलेली वाट पाहिजे, आज आम्हाला आमच्या विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा थॉट पाहिजे.

      *प्रा. डाॅ. सखाराम वाघमारे*
      भूगोलशास्त्र विभाग प्रमुख व
            "संशोधक मार्गदर्शक" 
       वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर.
           मो. नं. ९६२३२२८५७५

No comments:

Post a Comment