Tuesday, April 5, 2022

ठाकरे सरकारच्या महाविकास आघाडीत राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता !



मुंबई  (प्रतिनिधी) : राज्यातील ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) मंत्रिमंडळात मोठे फेरबदल (State Cabinet reshuffle) होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या महिन्यातच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेत्यांची एक बैठक होणार असून या बैठकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये गृहखात्याची अदला-बदल होण्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. साधारणत: 8 एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत.
इतकेच नाही तर निधी वाटपातही राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना डावलून कमी निधी वाटप केल्याचा आरोप होत होता. तसेच काँग्रेस पक्षाचे 25 आमदार नाराज असल्याचंही वृत्त समोर आलं होतं. एकूणच या सर्व प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये येत्या बैठकीत चर्चा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. राज्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे बोलून दाखवली आहे. अशात आता काँग्रेसचे तब्बल 25आमदार नाराज असल्याचंही समोर येत होतं. या आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहून भेटीसाठी वेळ देण्याची मागणी केली होती. यावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे. अशात आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत असल्याचं समोर येत आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये लवकरच मोठा फेरबद्दल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्याचे सहप्रभारी बीएम संदीप यांना करण्यात कार्यमुक्त करण्यात आलं आहे. तर, काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्यावर टांगती तलवार आहे. विरोधात झेंडा हातात घेतलेल्या जी 23 गटाच्या दबावानंतर पाच ते सहा प्रभारी बदलण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांच्याबद्दल देखील अनेक तक्रारी गेल्या असल्याचं समोर आलं आहे.

No comments:

Post a Comment