ज्या काळामध्ये सामाजिक विषमतेचे मूळ खोलवर रुजले गेले होते त्यावेळी सातारा जिल्ह्यातील नायगाव या खेडेगावी एका महान धैर्यशील क्रांतिकारी कन्येचा लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसे पाटील या माता -पित्यांच्या पोटी जन्म झाला. या क्रांतिकारी कन्येचे नाव सावित्रीमाई फुले होय. हीच धैर्यशील क्रांतीमाता पुढे अज्ञान,अंधश्रद्धा, अंध रुढी चा व सनातन्यांचा कर्दनकाळ ठरली.दुःखितांची,पीडितांची, उपेक्षितांची, दीनदुबळ्यांची, रंजल्या गांजल्याची ,गोरगरिबांची शुद्रा दी शुद्रंची, सर्व जातीधर्माच्या महिलांची व मुलींची आई बनली भारतातील पहिली महिला शिक्षिका,पहिली मुख्याध्यापिका, पहिली कवयित्री, मुलींसाठी शाळा काढणारी पहिली विरांगणा बनली. म्हणून सावित्रीमाई फुले यांना कर्मयोगी व ज्ञानयोगी असे म्हटले जाते 3 जानेवारी हा सावित्रीमाईचा जन्मदिन ,हा दिवस म्हणजे समस्त भारतीय महिलांचा स्फूर्ती दिन, प्रेरणा दिन आणि शक्ती दिन असे म्हणता येईल.सावित्रीमाई अवघ्या नऊ वर्षांच्याअसताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीमाई निरक्षर होत्या परंतु त्यांना शिक्षणाची फारच आवड होती. मात्र तत्कालामध्ये महिलांनी शिकायचे म्हणजे धर्म बुडवायचा असे समीकरण लावले जात होते. म्हणजेच स्त्रियांनी शिक्षण घेणे हे महापाप समजले जात होते. अशा विदारक काळात सावित्रीमाई आपल्या पतीच्या सहकार्याने स्वतःच्या हिमतीने शिक्षणाचे धडे कार्यक्षमपणे घेऊ लागल्या. सावित्रीमाईंनी शेतातील मातीचा पाटी प्रमाणे व झाडाच्या फांदीच्या काटकीचा लेखणी सारखा उपयोग करून अक्षरे गिरवीन्यास प्रारंभ केला. शेतकाम करून झाल्यावर विश्रांतीच्या वेळात ज्योतिरावांकडून त्या शिक्षणाचे धडे गिरवत असत. हुशार व जिज्ञासू पणामुळे त्यांनी शिक्षणाचे धडे तात्काळ अवगत केले.सावित्रीमाईँना मीचल बाईंनी शिक्षकी पेशाचे प्रशिक्षण देऊन उत्तम शिक्षिका बनवण्यासाठी मोठे योगदान दिले. सावित्रीमाईंनी निग्रोची गुलामगिरी नष्ट करणाऱ्या टॉमस क्लार्कसन यांचे चरित्र वाचले. अमेरिकेचे लोक आफ्रिकेतील निग्रोना पकडून आणत व त्यांच्याकडून जनावरा समान कामे करून घेत असत. थॉमस क्लार्कसेन यांनी हाती घेतलेल्या चळवळीमुळे अमेरिकन सरकारला गुलामगिरी बंद करण्याचा कायदा त्यावेळी करावा लागला .भारतामध्ये सुद्धा मिशनरी लोकांनी समाजसेवेचे कार्य सुरू केले होते ,त्याचा अनुकूल परिणाम सावित्रीमाई वर मोठ्या प्रमाणावर झाला. स्त्रियांच्या शिक्षणाला विशेष महत्त्व आहे हे त्यांनी ओळखले होते म्हणून १ जानेवारी १८४८ साली पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली .त्यानंतर हडपसर,सातारा, नगर,नायगाव, सासवड, ओतूर, भिंगार ,शिरूर, शिरवळ ,तळेगाव अशा अनेक ठिकाणी 20 शाळा सुरू करून त्या उत्तमरित्या चालविल्या.तत्कालामध्ये शुद्र जातीच्या स्त्रीने पतीसोबत बसणे सुद्धा पहिला गुन्हा समजला जात होता ,शुद्र जातीच्या स्त्रीने शिकणे हा दुसरा गुन्हा समजला जात होता, शिकून शिक्षिका होणे हा तिसरा गुन्हा तर वर्णव्यवस्थेला विरोध करून शाळा काढणे हा सर्वात महाभयंकर गुन्हा समजला जात होता .परंतु या सगळ्या गुन्ह्यांना अतिशय धैर्याने तोंड देण्याचे सामर्थ्य सावित्रीमाई बाळगून असलेल्या दिसून येतात. एक पुरुष शिकला तर तो एकटा शकतो, परंतु एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते, हा मंत्र सावित्रीमाईंनी मोठ्या प्रमाणात अंगीकारला होता. शिक्षणाला श्रेष्ठ धन मानताना सावित्रीमाई म्हणतात ,विद्या धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून l तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जण l तत्कालामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात रूढ झाल्या होत्या.अज्ञानामुळे अंधश्रद्धेचा अंधकार पसरला होता. म्हणून अज्ञानावर जालीम औषध म्हणजे शिक्षण होय हे त्यांनी वेळीच ओळखले होते व त्यातून त्यांनी शिक्षणाची बीजे सर्वत्र रुजविण्याचा अंतकरणातून प्रयत्न केलेला दिसून येतो. अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रहार केला. त्यासंदर्भात सावित्रीमाई म्हणतात की, गोट्याला शेंदूर फासून तेलात बसवि देवात दगड तो l धोंडे मुले देती नवसा पावती लग्न का करिती नारी नर lतत्कालात सर्व जाती, धर्माच्या विधवा किंवा आभागी स्त्रियांना पुरुष फसवत असत व आपल्या वासनेची शिकार करत असत.त्यामुळे त्या गरीब स्त्रिया आत्महत्या करण्यासाठी पुढे सरसावत असत.अशाच एका निरक्षर असलेल्या काशीबाई नामक ब्राह्मण विधवा स्त्रीला महात्मा फुले यांनी आत्महत्येपासून परावृत्त करून आपल्या घरी आणले व विधवा आश्रमात तिचे बाळातपण स्वतः सावित्रीमाईंनी केले व तिच्या अनौरस मुलाला दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत असे ठेवले. त्यास डॉक्टर बनवले. बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केल्यामुळे त्यांचा समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात छळ केला. सावित्रीमाई स्त्री शूद्रांचे व दिन दलितांचे दुःख पाहून रडत बसल्या नाहीत तर त्यांनी स्त्रीमुक्तीचा संग्राम मोठ्या जिद्दीने ,धैर्याने ,चिकाटीने, कौशल्याने यशस्वी करुन दाखवलेला आपणास दिसून येतो. स्त्री व शूद्रांना अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा विरुद्ध त्यांनी बंड करण्यास शिकविले. ज्योतरावांच्या पश्चात सावित्री माईनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. इ.स १८९३ सालि सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेमध्ये सावित्रीमाई यांनी अध्यक्षपद भूषविले होते. इ.स.१८९७ सालि प्लेगणे मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. डॉक्टर यशवंतला सावित्रीमाईंनी रजा काढून बोलावून घेतले व उपचाराचे सत्र २४ तास सुरू ठेवले. संस्थानाच्या माळरानावर प्लेग निवारण करण्यासाठी यशवंताचा दवाखाना सुरू केला.सावित्रीमाई स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात घेऊन येत होत्या. प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे हे माहीतअसतानाही त्या स्वतः प्लेगची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करत होत्या. मुंडगावच्या महारवाड्यातील पांडुरंग बाबाजी गायकवाड नामक मुलाला प्लेग ची लागण झाली होती,हे समजताच सावित्रीमाई तेथे पोहोचल्या व त्या मुलाला पाठीवर घेऊन धावत धावत दवाखान्यात आल्या. त्यातच सावित्रीमाईँना प्लेगची लागण झाली. व १० मार्च १८९७ रोजी धैर्यशील क्रांतीमाता सावित्रीमाईची प्राणज्योत मालवली. अशा या धैर्यशील क्रांतीमातेस कोटी कोटी प्रणाम! *प्रा. मकरंद जोगदंड* (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) वसुंधरा महाविद्यालय,घाटनांदुर. मो.९४२१२७१००५
Very nice bhashan and post sir
ReplyDelete