* परळी रेल्वे संघर्ष समितीच्या मागण्यांना जीएमकडून सकारात्मक प्रतिसाद,
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळी रेल्वे स्थानकातून सध्या बंद असलेल्या रेल्वे सेवा पुर्ववत चालू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून मुंबई, तिरूपती, वेरावळ सोमनाथ, शिर्डी, तसेच काही डेमु रेल्वे सुरू करण्याबाबतच्या आपल्या मागण्या योग्य असून नव्या रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत आम्ही प्रयत्नशिल आहोत अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद झोनचे जनरल मॅनेजर गजानन मल्या यांनी दिली.
रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्या यांनी आज परळी रेल्वे स्थानकास भेट देवून तेथे रेल्वे कर्मचार्यांसोबत स्थानकाची नियमित पाहणी केली. यावेळी परळी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक चंदुलाल बियाणी, संयोजक जी.एस.सौंदळे यांच्यासह संजय आघाव, चेतन सौंदळे आदी पदाधिकारी व सदस्यांनी जनरल मॅनेजर गजानन मल्या यांना निवेदन दिले.
प्रस्तुत निवेदनात रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने रेल्वेचे जंक्शनवरील इंजन बदलण्यासाठीच्या वेळ लागत असल्याने तो वेळ टाळण्यासाठी बायपास रेल्वे मार्ग घाटनांदुर आणि वडगाव निळा स्टेशन दरम्यान करावा. तसेच लातूर रोडवर वडवळ नागनाथ आणि धरणी स्टेशनवर बायपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. रेल्वे विभागाने सदरचे बायपास यापूर्वीच मंजूर केले असून त्याची प्रत्यक्षात काम सुरू करून अंमलबजावणी करावी असे निवेदनात म्हटले आहे.
याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते परळी ही रेल्वे परभणी, मनमाड मार्ग सुरू करावी. विकाराबाद व गुंटकल मार्गे परळी तिरूपती रेल्वे सुरू करावी. लातूर रोड कुर्डूवाडी अहमदनगर मार्गे साईनगर शिर्डी रेल्वे सुरू करावी, तसेच परळी येथून औरंगाबाद, लातूर, अकोला, शेगाव अशा डेमु रेल्वे सुरू कराव्यात अशाही मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. आज सकाळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने सदरचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी महाव्यवस्थापक उपिंदरसिंग, विभागीय व्यवस्थापक धनंजयलु, परिचालन अधिकारी जॉन प्रसाद, मुख्य वाणिज्य अधिकारी यांच्यासह परळी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक चंदुलाल बियाणी, संजय अघाव, चेतन सौंदळे, ओमप्रकाश बुरांडे, अॅड.संजय रोडे, नंदकुमार शेटे, नरसिंग अन्नलदास, सचिन स्वामी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment