Sunday, April 25, 2021

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा व भोजन. शहरात दोन ठिकाणी व्यवस्था; मोहनलालजी बियाणी अन्नछत्रचा उपक्रम.



परळी वैजनाथ (प्रतिनिधी-)शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालय, कोव्हीड सेंटर येथे कोरोना रुग्णांवर मोठ्या संख्येने उपचार केले जात असून सर्वच कोव्हीड सेंटर रुग्णसंख्येने वाढले आहेत. एकीकडे उपचार तर दुसरीकडे रुग्णांचे नातेवाईक निवारा नसल्याने रुग्णालयाच्या परिसरात भर उन्हात, अन्नपाण्याशिवाय ताटकळत बसत असून ही गंभीर अडचण लक्षात घेऊन स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र, राधा मोहन साथी प्रतिष्ठान व आरोग्य मित्रच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नपाणी देण्यासोबत निवाराही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय परिसर व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र, बचपन प्ले स्कुल जवळ हे निवारे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे मार्गदर्शक चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. 
स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र, राधा मोहन साथी प्रतिष्ठान व आरोग्य मित्रच्या वतीने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा माणूसकीचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार चालू असून प्रत्येक रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय परिसरात रुग्णांचे नातेवाईक थांबलेले असतात, त्यांना रुग्णांवर होणार्‍या उपचाराची प्रतिक्षा असते. परंतु कोरोना वॉर्डात कोणत्याच नातेवाईकाला प्रवेश दिला जात नसल्याने शेकडो नातेवाईक रुग्णालय परिसरात थांबलेले दिसतात. हे चित्र शहराच्या शासकीय, खाजगी कोव्हीड सेंटरवर दिसून येते. रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी कोणतीही व्यवस्था तर नाहीच शिवाय लॉकडाऊनमुळे हॉटेल व खानावळी बंद असल्याने त्यांची अडचण होत आहे.
या पार्श्वभूमीवर राधा मोहन साथी प्रतिष्ठान, स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र व आरोग्य मित्रच्या वतीने लवकरच सुरु होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड सेंटर परिसरात तसेच स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र येथे निवारा माणूसकीचा या अंतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी निवारा उपलब्ध करुन दिला जात आहे. मोठा मंडप येथे टाकण्यात आला असून सोबतच नातेवाईकांना बसण्यासाठी खुर्च्या, गादी व सतरंजी येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एवढेच नाही तर सकाळचा चहा, नाष्टा आणि दोन वेळचे जेवणसुद्धा स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रच्या वतीने नातेवाईकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही सर्व व्यवस्था रुग्ण नातेवाईकांच्या करिता मर्यादीत असून येथे पिण्याचे पाणी (शुद्ध) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 
वेळ वाईट आहे, आपण नाहीत...
कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग, रुग्णांवरील उपचारात येणार्‍या वैद्यकीय अडचणी, वाढत चाललेला मृत्यूदर आणि त्यातच रुग्णांच्या नातेवाईकांचे होणारे ससेहोलपट या डोळ्यांनी पाहणे शक्यच नाही. रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावर समाधानाचे हसू उपचारानंतरच येतील परंतु त्यांना या दोन हाताने काही मदत करता आली तर निश्चितच रुग्णांच्या नातेवाईकांना समाधान मिळेल या भावनेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. शहराच्या अनेक भागात रस्त्यावर थांबलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणे हाच या मागचा उद्देश असून वेळ वाईट आहे परंतु आपण कोणीही वाईट नाहीत म्हणूनच मदतीचा हात देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment