मुंबई - दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेत आणि ऑफलाईनच घ्यायच्या का, याबाबतचा निर्णय पुढील पाच दिवसात घेण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी केली.
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आज आम्ही दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने, विद्यार्थ्यांच्या हितात जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो पुढील पाच दिवसांत घेतला जाईल, असे त्यांनी बैठकीनंतर सांगितले.
दरम्यान, सूत्रांच्या मते, कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून, दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येण्याची शक्यता आहे. पहिली ते आठवी आणि नववी ते अकरावीच्या परीक्षांसंदर्भात जो निर्णय घेण्यात आला, असा कोणताही निर्णय दहावी, बारावीबाब घेणे शक्य होणार नाही.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज या मुद्यावर बैठक बोलावली होती. त्यात यावर चर्चा झाली. 29 एप्रिल रोजी दहावीची परीक्षा सुरू होत आहे. यात राज्यभरातून 16 लाखावर विद्यार्थी बसणार आहेत. 23 एप्रिलपासून सुरू होणार्या बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थी बसणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा उभी करणे सहज शक्य नाही. ही यंत्रणा उभी करण्यासाठी किमान दोन वर्ष लागतील, असा अभिप्राय आयटी कंपन्यांनी दिला आहे. त्यामुळे या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे सूत्रांचे मत आहे.

No comments:
Post a Comment