* शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे.
नवी दिल्ली : सब चीजे सार्वजनिक नही होती, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीवर सूचक उत्तर दिलं. राजधानी दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत भेटीबाबत छेडलं असता अमित शाहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे.
* अमित शाहांची पवार-पटेलांशी गुप्त भेट?
शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* राष्ट्रवादीने वृत्त फेटाळलं.
अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

No comments:
Post a Comment