बीड (प्रतिनिधी)- केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या मसुद्याचे बीड मध्ये राष्ट्रीय जनसेवा शिक्षा आंदोलन, बाल हक्क अभियान आणि समविचारी संस्था संघटना यांच्या बैठकीत शिक्षक दिनाचे औचित्य साधून विश्लेषण करण्यात आले. बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.
राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या बीड येथील कार्यालयावर झालेल्या बैठकीच्या वेळी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कडूदास कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरुवात केली.
या बैठकीस उपस्थित असलेले विचारवंत प्रमुख्याने अॅड. कृष्णा पंडित, महादेव धांडे, अॅड. राहुल साळवे, सहा देव हिंदोळे, यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती देऊन भविष्यातील येणारे केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण कसे चुकीचे आहे ते विश्लेषण करून मांडले. केंद्र सरकारने जे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे त्यामध्ये अनेक विसंगती आहेत ज्यामुळे येथील सर्वसामान्य समाजाच्या विद्यार्थ्यांचे जीवन उध्वस्त होणार आहे. यामुळे केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणास आपण कडाडून विरोध करून सर्वसामान्य समाजापर्यंत हे धोरण समजावून सांगण्याची गरज असल्याचे मत यावेळी काँग्रेस सेवादलाचे बीड जिल्हा अध्यक्ष योगेश शिंदे यांनी मांडले.
यावेळी केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. या बैठकीसाठी चरण सिंग ठाकूर, शकुंतला सरोदे, शाहीन अस्लम पठाण आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस सेवादलाचे बीड शहराध्यक्ष जयप्रकाश आघाव यांनी केले तर आभार प्रदर्शन यंग ब्रिगेडचे बीड जिल्हा अध्यक्ष ऋषभ कोठारी यांनी मानले.
No comments:
Post a Comment