मुंबई ,दि.03– सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे, आता लवकरात लवकर विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा घेऊन निकाल लावणे सरकारपुढे आव्हान असतानाच राज्यपालांनी घरातूनच परीक्षा देण्यास परवानगी दिली आहे.याच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टीकल परीक्षा होऊ शकते, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. त्यानंतर, आज या परीक्षांच्या तारख्या अंदाजे स्वरुपात जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 15 ते 30 सप्टेंबर प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात. तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षाचे नियोजन आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न विद्यापीठांकडून होईल. विद्यार्थ्यांना घरी बसून परिक्षा देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली असून सोप्या पद्धतीनं परीक्षा होतील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.कोणताही विद्यार्थी परीक्षांपासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाचीच असेल, असेही सामंत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment