Friday, August 28, 2020

मुलाने प्रेम विवाह केला, सासर्‍याकडून सुनेची हत्या .


* बायकोच्या पाठीतही वार, पट्टी वडगांव येथील धक्कादायक घटना.


अंबाजोगाई (प्रतिनीधी ):- प्रेम विवाह केलेल्या लेकावर नाराज असलेल्या पित्याने लेक आणि सून गावाकडे आल्यानंतर त्यांना घरात का घेतले म्हणून पत्नी सोबत वाद केला आणि तो रागाने घरातून बाहेर पडला. परंतू आपल्या सुने विरूद्धचा राग त्याच्या मनात घर करून होता. काल अखेर रागाच्याभरात सासर्‍याने सूनेच्या मानेवर कुर्‍हाडीने घाव केले. पत्नी आडवी आली असता तीही जखमी झाली. सासर्‍याच्या खूनी हल्ल्यात सून जागीच ठार झाली. ही खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे रात्री घडली. या प्रकरणातील खूनी सासरा पोलीसांनी गजाआड केला आहे.

शितल लव्हारे (वय- २२ वर्षे) असे मयत विवाहीतेचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, अजय लव्हारे वय- २२ वर्षे हे गेल्या काही वर्षापासून पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला होते. यादरम्यान त्याचे नात्यातीलच शितल लव्हारे या मुलीशी प्रेम संबंध जुळले. घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी पुण्यातच लग्नही केले. लग्न केल्यानंतर दोघेही त्यांच्या मुळगांवी पिट्टी वडगांव येथे आले होते. मात्र मुलाचे वडील बाळासाहेब लव्हारे यांनी मुलाला आणि सुनेला घरात घेण्यावरुन विरोध केला. त्यामुळे सासरा बाळासाहेब लव्हारे यांना त्यांची बायको सुन व मुलगा हे बोलत नव्हते. त्यामुळे बाळासाहेब लव्हारे हे गेल्या तिन वर्षापुर्वी घरातून निघुन गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे पुन्हा ते दोन महिन्यापुर्वी गावी आले. मात्र आल्यानंतरही त्यांना घरात कोणी व्यवस्थीत बोलत नव्हते. शिवाय पोरांने माझ्या परस्पर प्रेम विवाह केला याचा रागही त्यांच्या मनात होता. याच कारणावरुन रात्री घरात भांडण झाले अन् आरोपी बाळासाहेब लव्हारे याने सुनेच्या मानेवर कुर्‍हाडीचे घाव घालून ठार केले. तर मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पत्नीच्याही पाठीत कुर्‍हाडीचे वार केल्याने पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. ही घटना काल रात्री ९.३० वाजता घडली. त्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी बाळासाहेब लव्हारे यांनी पळ काढला. घटनेची माहिती पोलीसांना मिळताच बर्दापुर पोलीस  ठाण्याचे सपोनी रविंद्र शिंदे, यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर आरोपीचा शोध घेत आज दुपारी नांदुरघाट येथील एका शेतात लपून बसलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी बर्दापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

No comments:

Post a Comment