*रूग्णालय परिसरामध्ये कर्मचार्यांची श्रद्धांजली.
*गेल्या ३६ तासात बीडमध्ये कोरोनाचे पाच बळी.
बीड (प्रतिनीधी ):-बीड जिल्ह्यात समुह संसर्ग वाढत चालल्याने कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून गेल्या दोन दिवसात कोरोना बाधितांचा मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करणार्या ४० वर्षीय परिचारिका कोरोना बाधित होवून धारातिर्थ पडल्याने बीड जिल्हा रूग्णालयातच नव्हे तर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून बीड जिल्ह्यात कोरोना योद्ध्याचा हा पहिला मृत्यू आहे. आज सकाळी जिल्हा रूग्णालयातील कर्मचार्यांनी रूग्णालयाच्या बाहेर येवून साश्रुनयनांनी कोरोनासारख्या अदृश्य शत्रुशी लढा देत खर्ची पडलेल्या आपल्या साथीदाराला श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेकांना रडू कोसळले तेंव्हा रूग्णालय परिसरातील वातावरण हळवे झाले होते. आज सकाळी सदरील परिचारिकेसह अन्य एक ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या ३६ तासात पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून अन्य एका वृद्ध महिलेची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
काल दिवसभरात कोरोना बाधित तीन रूग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात असतांनाच आज सकाळी पुन्हा दोन कोरोना बाधित रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ३६ तासात बीड जिल्हा रूग्णालयत पाच कोरोना बाधित रूग्ण मृत्यूमुखी पडले. यामध्ये कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करणार्या एका ४० वर्षीय कोरोना योद्धा परिचारिकेचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षापासून संबंधित परिचारिका आरोग्य सेवा देत आहेत. गेल्या काही दिवसापासून त्या कोविड वार्डामध्ये सेवा देत होत्या. काल त्यांचा स्वॅब हा पॉझिटीव्ह आला आणि आज सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अदृश्य शत्रु असलेल्या कोरोनाशी लढा देतांना संबंधित ४० वर्षीय परिचारिका शहिद झाल्याने रूग्णालयात आणि जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी जिल्हा रूग्णालयातील कर्मचार्यांनी रूग्णालया परिसरात येवून कोरोनाशी लढा देतांना खर्ची पडलेल्या आपल्या साथीदाराला दोन मिनिट शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. संबंधित परिचारिका या मनमिळावू स्वभावाच्या आणि सर्वांच्या कामाला पडत असल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अनेक महिला कर्मचार्यांनी हंबरडा फोडून दु:ख व्यक्त केलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. त्याचबरोबर आज सकाळी अन्य एका कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment