बीड (प्रतिनीधी )- महायुतीकडून राज्यभरातील दूध उत्पादक शेतकर्यांना वाढीव १० रुपये लिटरमागे दरवाढ व भुकटीला ५० रुपये प्रति किलो अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी यापूर्वी दूध पिशव्या जिल्हाधिकारी व तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवून आंदोलन पुकारण्यात आले होते. या मागणीची दखल राज्य सरकारने घेतली नसल्याने महायुतीकडून १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा महायुतीकडून करण्यात आली आहे. शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी याबाबत माहिती दिली आहे. महायुतीचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आ विनायक मेटे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. १ ऑगस्ट रोजी राज्यभरात हे दूध आंदोलन पेटणार असून दूध उत्पादक शेतकर्यांनी त्या दिवशी दूध संघाला दूध विकायचे नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे. दूध रस्त्यावर ओतणे, नासाडी करणे असे प्रकार न करता गोरगरिबांना दूध मोफत वाटण्यात येणार असल्याचे आ मेटे म्हणाले. राजू शेट्टी यांचे आंदोलन हे राज्य सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आलेला आहे. दुधाला प्रति लिटर १० रुपये दरवाढ व भुकटीला ५० रुपये अनुदान द्यावे ही मुख्य मागणी आंदोलनाची असणार आहे. जे दूध संघ यामध्ये सहभागी होणार नाहीत त्यांच्या वाहनांची हवा सोडून दिली जाणार असल्याचे महायुतीकडून जाहीर करण्यात आले आहे. या आंदोलनात सर्व दूध उत्पादक शेतकर्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महायुतीच्या वतीने आ विनायक मेटे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment