बीड (प्रतिनीधी )- गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रोज कोरोनाबाधीत रुग्ण आढळत असतानाच बाधीतांचा मृत्यूचा आकडाही वाढताना दिसून येत आहे. काल रात्री पॉझिटिव्ह आलेली बीड शहरातील ७५ वर्षीय महिला आज सकाळी उपचार घेत असताना मरण पावली. गेल्या ४८ तासात चार कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील दोघे जिल्हाबाहेर उपचार घेत होते.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असताना गेल्या सहा दिवसात मात्र कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सहा दिवसांच्या कालखंडात तब्बल ६५ बाधीत आढळले असून जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधीतांची संख्या २१९ वर जावून पोहचली असून आतापर्यंत १२९ बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढत असतानाच या आठवड्यात उपचार घेणार्या रुग्णांचा मृत्यूही तेवढ्याच प्रमाणावर झाला आहे. काल बीड शहरातील मिल्लीया कॉलेज परिसरात राहणार्या ७५ वर्षीय महिलेचा कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आला होता, ती महिला कोरोना बाधीत आढळली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता आज पहाटेच्या दरम्यान सदरील महिलेचा मृत्यू झाला. गेल्या ४८ तासांमध्ये बीड जिल्ह्यातल्या चार कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चार रुग्णांमधून येवलवडी व बेनसूर येथील दोन रुग्ण जिल्हाबाहेर उपचार घेत होते. त्यांचा मृत्यू झाला आहे तर उमापूर येथील रुग्णाचा काल मृत्यू झाला आहे. आज सकाळी पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
आज पाठवले ५४२ स्वॅब, कालच्या ४३१ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
काल जिल्ह्यातून ७१८ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २८६ नमुन्यांचा अहवाल रात्री आला. यामध्ये ९ पॉझिटिव्ह तर २६९ नमुने निगेटिव्ह आले होते तर ८ अनिर्णित राहिले असून ४३१ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी होते. त्यानंतर आज नव्याने ५४२ अहवाल अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आज एकूण ९७३ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आज पाठवलेल्या अहवालामध्ये जिल्हा रुग्णालय बीड १९, सीसीसी बीड ९०, आष्टी ३९, माजलगाव १३, गेवराई २९, केज ५, परळी ३४०, अंबाजोगाई सीसी ४, स्वाराती ३ असे एकूण ५४२ आणि कालचे ४३१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबीत आहेत
No comments:
Post a Comment