करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु होणार की ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायच निवडला जाणार याकडे राज्यातील पालकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरु करण्यात येणार आहे. तर करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागासोबत बैठक पार पडली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बैठकीत उपस्थित होत्या. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शिक्षण विभागाने राज्यात जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. शाळा सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे. यानुसार राज्यात जुलै महिन्यापासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी एक महिना गावात कोणताही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही याची खात्री करावी लागणार आहे. त्यानंतरच शाळा सुरु करण्याची परवानगी आहे. यानुसार नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलै २०२० पासून तर सहा ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरु करण्यास परवानी दिली आहे. पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरु करता येऊ शकतात.
विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा असून शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक असणार आहे. तसंच प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. शाळा सुरु करताना परिस्थितीचा आढावा घेऊनच करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
नव्या शैक्षणिक वर्षाला आज सुरुवात होत असताना करोना पार्श्वभूमीवर शैक्षणिक कामकाज कसे सुरू होणार याकडे शिक्षण जगताचे लक्ष वेधलं होतं. विद्यार्थी-पालक यांनाही याविषयी कुतूहल निर्माण झाले होतं. मात्र करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात याव्यात, असे आदेश सोमवारी शाळांना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले होते. १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. शिक्षकांना शाळेत हजर राहण्याच्या आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी शाळेचा पहिला दिवस सुरु होत असताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळांमध्ये हजेरी लावली. मात्र शिक्षण विभागाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शैक्षणिक कामकाज करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले.
No comments:
Post a Comment