* सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये देणार कोवीड रुग्णांना सेवा.
अंबाजोगाई(दि.१)- महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये कॊरोनाचा कहर वाढत असताना त्यांना रुग्ण सेवा देण्यात मुंबई येथील डॉक्टर कमी पडत आहेत, अशा वेळी राज्यशासनाच्या आदेशानुसार अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील ३८ डॉक्टरांची एक टीम ३१ मे च्या मध्यरात्री अंबाजोगाई येथून मुंबईला रवाना झाली आहे.
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील ही ३८ निवासी डॉक्टरांची टीम ३१ मे च्या मध्यरात्री ३ वाजता अंबाजोगाई येथुन निघाली आहे. १ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईत दाखल होईल. आता ही टीम पुढचे १५ दिवस सेव्हन हिल रुग्णालयात कोवीड रुग्णांना रुग्णसेवा देणार आहे.
मार्चपासून मुंबईत मार्डचे निवास डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, सिपीएस डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टर जीवाची बाजी लावत काम करत आहेत. काही डॉक्टर कॊरोनाग्रस्तही होत आहेत. कॊरोनामुक्त झाल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू होत आहेत. पण त्याचवेळी रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने आता डॉक्टर-नर्सेस कमी पडू लागल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने केरळकडे ५० डॉक्टर आणि १०० नर्स स्टाफची मागणी केली होती. यानंतर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संचालकाने राज्यातील सर्ल वैद्यकीय महाविद्यालयातुन किंही डॉक्टर व परिचारीकांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील ३८ निवासी डॉक्टरांची टीम आज रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातुन मुंबई येथे कोवीड रुग्णसेवेसाठी गेलेल्या या ३८ निवासी डॉक्टरांच्या या टीममध्ये १६ विद्यार्थीनीही आहेत. या टीमच्या राहण्याची व्यवस्था ललित हॉटेलमध्ये करण्यात आली असून ते सेव्हन हिल या रुग्णालयात कोवीड रुग्णांना १५ दिवस वैद्यकीय सेवा देणार आहेत.
या वेळी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी “मुंबईतील आमचे मार्डचे डॉक्टर आणि इतर डॉक्टर रात्रंदिवस काम करत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत ते काम करत असून त्यांच्यावर खूप मोठा ताण पडला आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही मुंबई येथे रुग्णसेवा देण्यासाठी चाललो आहोत अशा परिस्थितीत काम करणे, रुग्णसेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही हे कर्तव्य पार पाडत आहोत” अशी प्रतिक्रिया दिली.
No comments:
Post a Comment