Wednesday, May 6, 2020

नागापुर वाणा धरणातील विद्युत मोटारी बंद तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या समयसुचकतेमुळे पाणी संकट टळले.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- परळीचे कार्यतत्पर तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या समयसुचकतेमुळे परळीकरांसमोरील पाणी संकट टळले आहे. नागापुर वाण धरणात कांही शेतकर्‍यांनी अवैधरित्या सुरु केलेल्या विद्युत मोटारी आज बंद केल्या आहेत.
गेल्यावर्षी अत्यल्प पर्जण्यमान झाल्यामुळे नागापुरच्या वाण धरणात पाणीसाठा कमीच होता. जिल्हाधिकारी बीड यांनी वाण धरणातील पाणीसाठा परळीकरांना पिण्याचे पाणी पुरावे म्हणुन आरक्षीत ठेवला होता. या धरण परिसरातील कांही शेतकर्‍यांनी अवैधरित्या पाणी चोरी सुरुच ठेवल्याने तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल, नगर परिषद, पाटबंधारे विभाग, महावितरण कंपनी व ग्रामीण पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथक तयार केले होते. या पथकाने वाण धरण परिसरातील सर्व विद्युत डिपी खाली उतरविल्याने शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी आपोआपच बंद झाल्या परंतु गेल्या चार दिवसांपुर्वी प्रशासन कोरोना विषाणुचा प्रार्दभाव होवु नये म्हणुन यात व्यस्त असतांना कांही शेतकर्‍यांनी वायरमनला हाताशी धरुण विद्युत डिपी सुरु करुन घेतली. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासुन पुन्हा पाणी चोरी सुरु झाली होती. मात्र ही बाब तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदरची विद्युत डिपी खाली उतरविण्याचे आदेश दिले. त्यामुळे परळीकरां समोरील पाणी संकट टळले असुन कार्यतत्पर तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरविंद मुंडे तसेच याकामी सहकार्य करणारे नगर पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे यांचे परळीकरांनी आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment