Monday, May 4, 2020

नविन आदेशाकडे जिल्हाचे डोळे .तीन पानांच्या आदेशासाठी वाजवले रात्रीचे तीन.संचारबंदी चे नवे नियम म्हणजे तोंडाला मुंगसं बांधून चरायला पाठवण्याचा प्रकार !


बीड -(प्रतिनिधी) 4 मे पासून जिल्ह्यात संचारबंदी कायम राहणार की शिथिल होणार,नवे नियम कसे असतील,काय सुरू राहणार,काय बंदच राहणार याकडे डोळे लावून बसलेल्या बीड जिल्हा वासीयांना सोमवारी पहाटे तीन वाजता नव्या आदेशाने धक्काच बसला .प्रशासनाने तीन पानांचे आदेश काढण्यासाठी जणू काही तज्ञ समिती किंवा अभ्यास गट तयार केल्याप्रमाणे वेळ घेऊन मागील आदेशात थोडाफार बदल करीत नवे आदेश पहाटे तीन वाजता काढले .हे आदेश म्हणजे जनावरांच्या तोंडाला ज्याप्रमाणे मुंगसं बांधून त्यांना रानात मोकळं सोडलं जातं तसाच प्रकार झाला आहे .सकाळी सात ते साडेनऊ च्या काळातच दुकाने उघडता येणार असल्याने हे आदेश नसते निघाले तरी काही फरक पडला नसता अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत .

बीड जिल्ह्यात केवळ एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला त्यामुळे अनेक व्यावसायिक,व्यापारी,उद्योजक यांना 17 मे पर्यंत लॉक डाऊन सहंन करावा लागणार आहे .राज्यातील इतर जिल्ह्यात लॉक डाऊन च्या काळात काय सुरू राहील,काय बंद राहील याची माहिती त्या त्या जिल्हा प्रशासनाने 3 मे च्या दिवसभरात नवे आदेश काढून लोकांना दिली,बहुतांश वर्तमानपत्र बंद असल्याने लोकांना हे आदेश सोशल मीडिया मधून समजले .

बीड जिल्ह्यात देखील काय सुरू राहणार,नवे नियम काय असतील याबाबत लोक पत्रकारांना माहिती विचारत होते,मात्र रात्री बारा वाजले तरी नवे आदेशच न आल्याने पत्रकार अन सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे लोकही हैराण होते .

शेवटी रात्री दोन तीन वाजता जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या आदेशाची प्रत बाहेर पडली ,यात संचारबंदी कायम राहणार असून शिथिलता वेळेतही बदल होणार नाही असे स्पष्ट करीत काही दुकाने ज्यात कापड,स्वीट होम,इलेक्ट्रॉनिक दुकाने,यांच्यासह इतर व्यवसायांचा समावेश आहे .ही दुकाने सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत उघडता येतील .

सकाळच्या अडीच तासात किती गिऱ्हाईक येणार,त्यांच्यावर कंट्रोल कसा ठेवणार,किती धंदा होणार,चाळीस दिवस बंद ठेवले मग अजून दहा बारा दिवस बंद राहिले तर काय फरक पडणार अशा प्रतिक्रिया या आदेशानंतर व्यक्त होत आहेत .हे आदेश म्हणजे निव्वळ पंचपक्वान्न असलेलं ताट समोर वाढायच पण तोंडाला मास्क बांधून खाण्याचे आदेश दिल्यासारखे आहेत असे आता स्पष्ट होऊ लागले आहे .

No comments:

Post a Comment