Tuesday, March 24, 2020

*अमृत पिल्यासारखे वागू नका!**बाजीराव धर्माधिकारी यांच्या लेखणीतून..!*


     मी डॉक्टर नाही,किंवा व्हायरॉलॉजी तज्ज्ञ नाही ; परंतु सार्वजनिक जीवनात वावरणारा एक जबाबदार व संवेदनशील नागरिक म्हणून आणि स्वामी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी कळवावे,शहाणे करुन सोडावे सकळजणा" या उक्तीप्रमाणे थोडा शब्दप्रपंच करीत आहे.

      कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सर्व भारतीयांना काल 22 मार्च रोजी संपूर्ण भारतभर जनता कर्फ्युचे आवाहन केले होते.त्याचबरोबर ठीक 5 वाजता आपाल्या बाल्कनी,गॅलरी, छतावर येवून आरोग्य प्रशासन,पोलीस प्रशासन,पालिका कर्मचारी यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवा,थाळ्या वाजवा तसेच घंटानाद करा म्हणून सुचित केले होते.सकाळी 6 पासून दुपारी 5 वाजेपर्यंत संपूर्ण भारतात अगदी अलबेल चालले होते.सगळे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे निर्मनुष्य झाले होते,जगाला हेवा वाटावा इतके एकीचे व संयमाचे दर्शन भारतीयांनी दर्शविले.मात्र 5 वाजता जे चित्र आपण पाहिले,जे Video  समोर आले ते अतिशय क्लेशदायक होते.सर्वांची 'सोशल डिस्टन्सिंग ' अपेक्षित असताना एखादी लढाई आपण जिंकल्याच्या आविर्भावात बहुतांशजण वागत होते . ठिकाणी ठिकाणी जुलूस निघाले,मिरवणुका निघाल्या, अतिउत्साह होता,जोश होता हा निर्बुद्धपणा दाखविण्याची खरंच गरज होती का? या घटनांचा निष्कर्ष असा काढला गेला पाहिजे की आपण भारतीय अजून या काळातसुद्धा गंभीर नाहीत.

*गंभीरतेने घ्या..काळजीने वागा*

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO ) कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केलेले आहे.जागतिक संघटना जेव्हा अशी घोषणा करते तेव्हा आपण काळाची पावले ओळखली पाहिजेत.भारतात कोरोना विषाणू चा संक्रमण काळ हा स्टेज- 2 मध्ये आहे,सर्वप्रथम केसेस होणे रुग्ण सापडणे ही स्टेज 1 त्यानंतर क्लस्टर्स ही स्टेज - 2. ज्या मध्ये संक्रमित झालेले रुग्ण आपल्या परिवारात,आपल्या मित्र,स्नेहीजनांना संक्रमित करतात;आणि यातील स्टेज -3 कम्युनिटी जी की अत्यंत भयावह आहे.आपण सध्या इटली, जर्मनी , स्पेन , फ्रान्स ,चीन या देशात ही स्टेज बघत आहोत .या स्टेजमध्ये सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर संसर्ग प्रस्थापित झालेला असतो आणि ती परिस्थिती कुठल्याही वैद्यकीयदृष्ट्या समृद्ध देशालाही आटोक्यात आणणे कठीण जाते आणि मनुष्य म्हणून आपण हतबल होतो. इटली , जर्मनीमध्ये याचे सध्या प्रत्यंतर येत आहे .सुदैवाने आपण स्टेज -2 मध्येच आहोत ; आणि खरा परीक्षेचा काळ हाच आहे.प्रशासनाने वेळोवेळी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे आणि स्वतःला होम आयसोलेटेड करणे हाच रामबाण उपाय आहे.सुपरहीरो होऊन रस्त्यावर काय घडत आहे हे बघू नका. कारण तुम्ही बाहेर गेल्यावरच संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. नव्हे , तर केवळ आणि केवळ कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळेच तो होतो .त्यामुळे घरी राहणे हीच खरी प्रशासनाला मदत आहे. आपणच आपले रक्षक आहोत .

   इटली या देशाची लोकसंख्या 6 कोटी असून महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे.आरोग्य सेवेत इटली जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.भारताची लोकसंख्या 130 कोटी आणि इटली ची 6 कोटी तरीही भारताकडे जेवढा पैसा आहे त्याच्या 70% इटली कडे आहे.मग विचार करा जर भारतात या महामारी ने स्टेज- 3 गाठली तर काय हाहाकार माजेल? आज इटली मध्ये आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत,थर्मोस्कॅनर उपलब्ध नाहीत. हजारो लोक मृत्यमुखी पडत आहेत.कोरोनाबाधीत वृद्ध असेल,तरूण असेल, बालक आले तर तिथल्या आरोग्य प्रशासनास ठरवून कुणाला वाचवायचे हा निर्णय घ्यावा लागत आहे.ही परिस्थिती झाली निष्काळजीपणामुळे ! म्हणून आपण अतिशय गंभीरपणे या संकटाशी सामना केला पाहिजे.स्टेज 2 मधून स्टेज 3 मध्ये या संक्रमणाला येवू न देणे आणि इथेच हे संक्रमण संपविणे हे मोठे आव्हान आहे ; आणि ते आपण पेलू शकतो . म्हणून खरी गरज आहे प्रशासनास सहकार्य करण्याची !

*कोण आहे कोरोना व्हायरस?*

  कोरोना हा विषाणू नवीन नाही ; पण जनुकीय रचना बदललेल्या COVID 19 या कोरोना परिवारातीलच विषाणूचे गुणधर्म हे खूप विलक्षण आहेत.यापूर्वी सार्स,मर्स हे विषाणू याच जनुकीय रचनेतले पण COVID 19 हा विषाणू आकाराने 400 मायक्रॉन इतका विशाल आकाराचा दिसायला CROWN म्हणजे मुकुटासारखा म्हणून कोरोना हे नाव तज्ज्ञांनी दिले.हा विषाणू मानवी शरीरात सहज प्रवेश करतो,आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीदेखील ओळखू शकत नाही की हा विषाणू आहे म्हणून आणि आपले शरीर सहज या विषाणू चा स्वीकार करते ;आणि पुढे तासाभरातच मानवी शरीराच्या मदतीने यांची संख्या कोट्यवधी होते ; आणि मानवी शरीर बिमार पडते. हा व्हायरस दुसरे शरीर शोधतो.कोरोनाबाधित रुग्णाच्या थुंकीमधून,खोकल्याच्या ड्रॉपलेट मधून,स्पर्शातून,तसेच ज्या पृष्ठभागावर हा व्हायरस चिटकला आहे म्हणजे Attach झाला आहे जसे की दरवाजाचे हँडल,पायऱ्यांच्या रेलिंग आणि थर्मोस्टॅट गुणधर्माच्या वस्तू जसे की वर्तमानपत्र,पुस्तके ,दुधाच्या पिशव्या,किराणाच्या पिशव्या कपडे यासह अनेक गोष्टींना हे विषाणू सहज चिटकून राहून जिवंत राहू शकतात.जगात अनेक विषाणू आहेत जसे की स्वाईन फ्लू,इबोला,सार्स,मर्स जरी यावरील विषाणू ने बाधित झालेल्या रुग्णांचा मृत्यदर हा जास्त आहे ; पण या विषाणूंचा संसर्गदर हा कमी आहे. या उलट COVID 19 या  विषाणू बाधीत रुग्णांचा मृत्युदर हा कमी आहे पण संसर्गदर कित्येक पटीत आहे आणि हाच मुख्यत्वे काळजीचा विषय आहे.तरुणांना आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक असणाऱ्या बाधित व्यक्तीला नक्कीच धोका नाही ; परंतु दमा,मधुमेह,अस्थमा, हृदय रोगी,वृद्ध,बालके यांना अधिक धोका आहे ; आणि बाधित तरुणांपासून संसर्ग होवू शकतो.याचा संसर्गदर इतका आहे की जगाच्या इतिहासात आणि दुसऱ्या महायुद्धातदेखील जितकी मनुष्यहानी झाली नाही ती या संसर्गजन्य रोगामुळे जगात होत आहे.यापूर्वी प्लेगसारख्या अनेक महामाऱ्या आल्या ; पण  तत्कालिन लोकसंख्या तत्कालीन सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी  पाहिल्या तर ते विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित राहिल्या.आज जगाची लोकसंख्या 8 अब्ज आहे ; आणि 'सोशल डिस्टन्सिंग ' ची अंमलबजावणी करणे खूप कठीण होत चालले आहे .म्हणून जगाच्या पातळीवर आणि मानवी जीवनासमोर हे कोरोनारूपी महाकाय संकट उभे राहिले आहे.

*काय उपलब्ध आहेत आरोग्य सेवा?*

टाईम्स ऑफ इंडिया अग्रगण्य वृत्तपत्राने काल करोनासारख्या विषाणूचे आरोग्य संकट असताना नेमक्या भारतात आरोग्य सेवांची काय स्थिती आहे याविषयी एक शोधवार्ता प्रकाशित केली त्यात अशी बाब पुढे आली की भारतातील प्रत्येक 84000 व्यक्तींमागे एक आयसोलेटेड बेड,प्रत्येक 26000 व्यक्तींमागे एक क्वारंटाईन बेड,प्रत्येक 11400 नागरिकांमागे एक डॉक्टर,देशात एकूण 11लाख 54000 अल्युपॅथी चे डॉक्टर त्यातील 5 लक्ष फक्त सरकारी सेवेत आणी लोकसंख्या 135 कोटी.सरकारी इस्पितळात देशात एकूण फक्त 137000 हॉस्पिटल बेड रेल्वे स्थानके,तसेच विविध पब्लिक ट्रान्सपोर्ट ठिकाणी टचलेस इन्फ्रारेड थर्मोस्कॅनर चा प्रचंड मोठा तुटवडा.ईतकी भीषण परिस्थिती समोर आलेली आहे.

*काय काळजी घ्यावी लागेल?*

जगात पहिली कोरोनाची केस ही डिसेंबर मध्ये चीनमधील'वूहान ' या शहरात सापडली. आणि आज लाखो रुग्ण बाधित आहेत.WHO ने ,प्रशासनाने आपल्याला वेळोवेळी अनेक संदेशात्मक बाबी सांगितलेल्या आहेत. काय करु नये आणि काय करावे DOs & Donts सांगितले आहेतच. त्यात शक्यतो घराच्या बाहेर निघू नये,स्वतःला होम quarantine करावे,अधून मधून सारखे हात हँड वॉश ने धुवावेत. जिथे पाण्याची अडचण आहे तिथे सॅनिटायझर वापरावे,खोकला,सर्दी,ताप असेल तर वैद्यकीय तपासण्या कराव्यात..लक्षणे असतील तर मास्क वापरावेत.मांसाहारी लोकांनी मांस जास्त शिजवून खावे.रोग प्रतिकार शक्ती वाढविणारे खाद्य पदार्थ खावे. 'वर्क फ्रॉम होम ' ला प्राधान्य द्यावे.सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय तपासण्या करायला सांगाव्यात.स्थानिक प्रशासनास कळवावे. 'सोशल डिस्टन्सिंग 'या सह अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.सकळ मनुष्य जातीने कोरोना या व्हायरस विरुद्ध लढाई पुकारलेली आहे तेव्हा एक चांगले सैनिक म्हणून आपले कर्तृत्व दाखवू.नाहक निष्काळजीपणा दाखवून आपले,आपल्या परिवाराचे,आपल्या गावाचे,आपल्या राज्याचे,आपल्या देशाचे आरोग्य धोक्यात टाकू नये.हा ऐतिहासिक लढा आहे पुढे जेव्हा पुढच्या पिढीला आपण कोरोनाची कथा सांगू तेव्हा आपली विजयगाथाच सांगू नाहीतर फोटो दाखवायची वेळ येईल .तेव्हा खूप काळजी घ्या..घाबरू नका..सतर्क रहा..!
 
    " घरी राहणे सध्या हीच खरी देशभक्ती आहे . "

No comments:

Post a Comment