पुणे : (प्रतिनीधी ) राज्यातील सत्ता बदलानंतर धार्मिक संस्थांवरील नेमणुकांची चर्चा सुरू झाली असून साई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पंढरपूर देवस्थान समिती, शिर्डीचे साई संस्थान व मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्ट या तीन प्रमुख संस्थांवरील राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका येत्या काळात होणार आहेत.
आघाडीतील तीन पक्षांच्या वाटपात सिद्धीविनायक ट्रस्ट शिवसेनेकडे, पंढरपूर देवस्थान समिती कॉंग्रेकडे तर साई संस्थान राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धविनायक ट्रस्टवर अभिनेते आदेश बांदेकर यांची नेमणूक फडणवीस सरकारच्या काळात झाली होती.
त्यामुळे या पदावर बांदेकर यांनाच कायम यांना कायम ठेवण्यात येणार असल्याचे समजते. शिर्डी संस्थानवर आमदार रोहित पवार यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा नगर जिल्ह्यात सुरू आहे.
शिर्डी संस्थानवर सध्या कुणीही विश्वस्त नाही. युती सरकारच्या काळातील विश्वस्त मंडळ सध्या अस्तित्वात नाही. संस्थानच्या घटनेप्रमाणे विश्वस्तांची संख्या सध्या 15 इतकी आहे. त्यात वाढ करून ही संख्या 25 पर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे. सत्ता बदल झाल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी तसेच नगरमधील थोरात-विखे-पाटील यांचे अनेक समर्थक विश्वस्त होण्यासाठी इच्छुक आहेत.
विश्वस्तपदासाठी नगर मधून शिवसेनेकडूनही काहीजण इच्छुक आहेत. पंढरपूर देवस्थान समिती कॉंग्रेसच्या वाट्याला आली असून कॉंग्रेसकडून देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार याचीही उत्सुकता आहे.
No comments:
Post a Comment