Monday, April 28, 2025

वीरशैव लिंगायत समाज.वीरशैव विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजि त महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन - शिवकुमार केदारी

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) : वीरशैव लिंगायत सभा आणि वीरशैव विकास प्रतिष्ठान, परळी वैजनाथ यांच्या वतीने जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व पोटजातींसाठी ह्या कार्यक्रमांतर्गत वक्तृत्व, रांगोळी, आणि चित्रकला स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे.  

वक्तृत्व स्पर्धा
- विषय: महात्मा बसवेश्वर चरित्र, अनुभव मंटप, वीरशैव संत परंपरा.  
- प्रथम बक्षीस: ₹३१००/-  
- द्वितीय बक्षीस: ₹२१००/-  
- तृतीय बक्षीस: ₹११००/-  
- वय: ८ ते १६ वर्षे  
- तारीख व वेळ: सोमवार, २८ एप्रिल २०२५, सकाळी ११ ते दुपारी १.  
- प्रवेश: विनामूल्य  
रांगोळी स्पर्धा
- विषय (वय ८ ते १६ वर्षे): म. बसवेश्वर, बेटी बचाव पाणी वाचवा  
- विषय (वय १६ वर्षांपासून पुढे): निसर्ग चित्र डिझाईन मुक्तहस्त  
- प्रथम बक्षीस: ₹३१००/-  
- द्वितीय बक्षीस: ₹२१००/-  
- तृतीय बक्षीस: ₹११००/-  
- आकार: 4x4  
- तारीख व वेळ: सोमवार, २८ एप्रिल २०२५, सकाळी १० ते १२.  
- प्रवेश: विनामूल्य  

चित्रकला स्पर्धा
- विषय: पर्यावरण, दहशतवाद, म. बसवेश्वर प्रतिमा  
- प्रथम बक्षीस: ₹३१००/-  
- द्वितीय बक्षीस: ₹२१००/-  
- तृतीय बक्षीस: ₹११००/-  
- वय: ८ ते १६ वर्षे  
- तारीख व वेळ: सोमवार, २८ एप्रिल २०२५, सकाळी १० ते १२.  
-प्रवेश: विनामूल्य  
-टीप: स्पर्धेचा पेपर आयोजकांच्या वतीने पुरवण्यात येईल. स्पर्धकांनी रंग व साहित्य स्वतः सोबत आणावे.  

जयंती महोत्सव व बक्षीस वितरण सोहळा
- महात्मा बसवेश्वर महाराजांचा जयंती उत्सव बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.  
- स्थळ: संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिर, बेलवाडी, परळी वैजनाथ.  
- या दिवशी सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल.  

नाव नोंदणी आणि संपर्क: 
- नाव नोंदणीसाठी संपर्क: शेखर फुटके - 9325063512  
-अधिक माहितीकरिता संपर्क: 9021504779, 9763106645, 8888356173  

सर्व वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती निमित्त असे आवाहन शिवकुमार केदारी उपाध्यक्ष वीरशैव विकास प्रतिष्ठान यांनी केले आहे.

Saturday, April 26, 2025

बीड जिल्हा कारागृहात वरिष्ठ तुरुंग आधिकार्यासह महिला शिपाई निलंबित.



बीड (प्रतिनिधी) - जिल्हाधिकारी कारागृहात असलेल्या एका बड्या पार्टीच्या कुटाण्यामुळे एक सिनियर जेलर वर सस्पेंड होण्याची वेळ आली. वरिष्ठ कार्यालयाच्या चौकशी मध्ये बीडच्या जेलमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने या सिनियर वर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यभरातील कोणत्याही जेलमध्ये कैद्याना रोज वापरात येणारे काही सामान खरेदी करण्यासाठी कँटीन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक कैद्याला महिन्यासाठी किती खरेदी करता येईल याची मर्यादा घालून दिलेली आहे.

बहुतांश ठिकाणी कागदोपत्री का होईना ही मर्यादा पाळल्याचे दाखवले जाते. प्रत्येक जेलमध्ये अनेक डॉन, दादा, भाई, आका असतातच. त्यांचे पंटर किंवा गॉडफादर हे आपल्या जेलमधील सहकाऱ्याची नीटनेटकी व्यवस्था करण्यासाठी फिल्डिंग लावतात.

बीडच्या जेलमध्ये देखील असे अनेक कैदी आहेत ज्यांची व्यवस्था करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. या व्यवस्थेमध्ये एकाच नावावर मोठ्या प्रमाणावर कँटीन ची खरेदी झाल्याचे उघड झाले.याबाबत तक्रार झाल्यानंतर चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना दुरुत्तरे दिल्याने सिनियर जेलरवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जातीभेद व विषमता संपविण्याचे कार्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी केले- ष.ब्र.108 काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर

*महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त परळीतील कल्याणकारी हनुमान मंदिरात पाच दिवसीय परमरहस्य पारायणास उत्साहात सुरुवात. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जगात जातिभेद व विषमता संपविण्याचे कार्य करणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त न्यू माणिकनगर, परळी येथील कल्याणकारी हनुमान मंदिरात पाच दिवसीय परमरहस्य पारायणाचा शुभारंभ आज भाविकांच्या उपस्थितीत झाला.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ष.ब्र.१०८ काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर यांच्या आशीर्वचनाने पारायणास प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, "१२ व्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून बसवेश्वरांनी जातीय विषमता व कर्मकांडाविरुद्ध लढा दिला आणि स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श प्रस्थापित केला. त्यामुळे आजही असे महापुरुष आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरतात."
या कार्यक्रमास महाराष्ट्र वीरशैव सभा बीड जिल्हा अध्यक्ष दत्तापा इटके गुरुजी प्रमुख उपस्थित होते. श्रीगुरूंचे स्वागत आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांनी सपत्नीक केले. अशोक नावंदे सरांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा उत्सव दिनांक २६ एप्रिल २०२५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान संपन्न होणार आहे. दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत परमरहस्य पारायण, दुपारी महाप्रसाद व संध्याकाळी ४ वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. समारोपाच्या दिवशी, बुधवार दि. ३० एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याणकारी हनुमान मंदिर महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती, न्यू माणिकनगर, परळी वै. परिश्रम घेत आहे.

एका ध्वजाजवळ दुसरा ध्वज लावल्याच्या कारणावरून. दोन गटांत दगडफेक.गावात तणावपूर्ण शांतता.


आष्टी (प्रतिनिधी) : १४ एप्रिल रोजी गावात काही ध्वज लावले होते. त्याचबरोबर, गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकात एका ध्वजाजवळ दुसरा ध्वज लावल्याच्या कारणावरून गावात तणावाचे वातावरण निर्माण होते. हे प्रकरण रोजच धुमसत असताना, शुक्रवारी पोलिसांचा फौजफाटा असतानाही दोन गटांत दगडफेक झाल्याची घटना घडली. आष्टी तालुक्यातील खडकत येथे हा प्रकार घडला.

आष्टी तालुक्यातील खडकत येथे छत्रपती संभाजी महाराज चौक आहे. याच ठिकाणी एका ध्वजाशेजारी दुसरा ध्वज लावल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकासह पोलिस प्रशासनाला दोन्ही गटातील तरुणांना समजून सांगत वाद होणार नाही, यासाठी मार्गदर्शन केले. गुरुवारी ध्वजही पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्त खाली काढण्यात आला, पण शुक्रवारी अचानक याच कारणावरून गावासह, बाहेर गावावरून आलेल्या तरुणांनी दगडफेक केल्याने यात काही जण जखमी झाले आहेत. सध्या गावात पोलिसांची कुमक वाढविण्यात आली असून, तणावपूर्ण शांतता असल्याचे बोलले जात आहे.

गावात पोलिस बंदोबस्त तैनात!

खडकत येथे जयंतीनिमित्त लावलेला एक झेंडा काढण्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, पाटोदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, आष्टीचे प्रभारी ठाणे प्रमुख विजय नरवाडे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्यासह मुख्यालयातील आरएसपीच्या दोन ट्रॅकिंग फोर्स व स्थानिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

पोलिसांसमोरच महिला वकिलास पती कडून मारहाण. शिरूर पोलिस ठाण्यात घडला प्रकार.


शिरुर (प्रतिनिधी) एका महिला वकिलास तिच्या पतीने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शिरूर पोलिस ठाण्यात गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविकिरण विष्णू सानप असे त्या आरोपीचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील ॲड. शीतल यांचा विवाह शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव येथील रविकिरण विष्णू सानप याच्यासोबत २०२१ मध्ये झाला होता. लग्नाच्या एक वर्षानंतर सासू व तीन नणंदा शीतल यांना शारीरिक व मानसिक त्रास देत होते. पती रविकिरण हा दारू पिऊन मारहाण करीत होता. त्यामुळे शीतल यांनी १८ सप्टेंबर २०२४ रोजी गडचिरोली पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. सदरील अर्जाच्या सुनावणीसाठी शीतल यांची पती रविकिरण व सासरचे कोणीच हजर राहिले नाहीत. गडचिरोली येथील भरोसा सेल यांनी २५ जानेवारी २०२५ रोजी पुढील कारवाई करीता पत्र दिले. त्यामुळे ८ फेब्रुवारी २०२५ आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी रविकिरण सानप हा व्यवसायाने वकील असल्याचे समजते.

काय घडली घटना ?

आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी शीतल सानप यांना शिरूर येथील सासरच्या राहत्या घरी शेळके बिल्डिंग हॉल येथे बोलावले होते. त्यानुसार त्या तिथे गेल्या असता रविकिरण सानप हा पोलिसांसमोरच शीतल यांच्या अंगावर धावून गेला, हिचे हात-पाय तोडणार, हिचे खानदान संपवणार आहे, अशी धमकी दिली. आष्टी येथे मीच खोटा गुन्हा दाखल केला आहे, त्यात तुझा बाप व भाऊ कसा फसवला आहे असे म्हणत अश्लील भाषेत शिव्या दिल्या. त्यावेळी आरमोरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास गवते, रणजित पिल्लेवान, कुंदा व प्रधान हंसराज धस हे पंच उपस्थित होते.

पोनि गवते यांनी शीतल यांना शांत बसण्यास सांगितले. पंचनामा झाल्यानंतर उपस्थित पोलिस, दशरथ वनवे व फिर्यादी शीतल सानप या शिरूर ठाण्यात गेल्या असता रविकिरण सानप हा तेथे आला. पाेलिसांसमोर शिव्या देऊन कोण पंच आले होते, कोण स्टेटमेंट देतो असे म्हणत शीतल यांना हात-तोंडावर चापटांनी मारहाण केली, तसेच शीतल यांचे काका दशरथ वनवे यांना शिवीगाळ करून त्यांच्याही अंगावर धावून गेला. त्यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस अशोक सोनवणे, बावनकर व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी रविकिरण यास हाताला धरून बाहेर काढले तरी तुझ्या भावाचे तुकडे करणार असल्याची धमकी दिली. याप्रकरणी रविकिरण विष्णू सानप याच्या विरुद्ध शिरूर कासार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकांकडे माझ्याबाबत काय सांगितले' जाब विचारत काकाचा खून, पुतण्याला जन्मठेप. पाच वर्षांनंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.


पिंपळनेर (प्रतिनिधी) लोकांकडे माझ्याबाबत काय सांगितले, असे म्हणत सुरी खुपसून मोहमंद शरीफ अबुलगणी कुरेशी (रा. पिंपळनेर) या काकाचा २९ सप्टेंबर २०२० च्या दुपारी ४:३० वाजता खून केला होता. यातील आरोपी पुतण्या फारूक रमजान कुरेशी याला २३ एप्रिल रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी सुनावली.

या प्रकरणात मोहमद शरीफ अबुलगणी कुरेशी हे पिंपळनेर येथील हॉटेलसमोर गप्पा मारत बसलेले होते. त्यावेळी आरोपी पुतण्या फारूक रमजान कुरेशी तेथे आला आणि म्हणाला, लोकांकडे माझ्याबाबत काय सांगितले असे म्हणून त्याने हातातील लोखंडी सुरी काढून काकाच्या पोटात जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन वार करून जखमी केले. मोहमद मोठ्याने ओरडले असता आरोपी तेथून पळ काढला. त्यांनतर तेथे जमलेल्या लोकांनी मोहमंद यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मयत मोहमद यांनी दिलेल्या मृत्युपूर्व जबाबावरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. उपचारादरम्यान १ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ४.०० वा सुमारास मृत्यू झाला. यानंतर गुन्ह्यामध्ये कलम ३०२ हे वाढवण्यात आले. या प्रकरणातील आरोपीने स्वतःहून पिंपळनेर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा केल्याची माहिती दिली.

अशी सुनावली शिक्षा

या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक डी.पी. सानप यांनी केला. खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. मोहमद यांचा मृत्यूपूर्व जबाब, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा यांचे अवलोकन करून जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय दि. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी प्रकरणातील आरोपी फारूक रमजान कुरेशी याला दोषी ठरवून भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय दि. राख यांना पैरवी अधिकारी ए.एस. आय नागमवाड, एम. व्ही यांनी त्यांना सहकार्य केले.

गाईंना गुंगीचे औषध खाऊ घालून चोरण्या चा प्रयत्न. दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील स्नेहनगर भागात शुकवारी मध्यरात्रीनंतर गाईंना गुंगीचे औषध खाऊ घालून डांबून नेण्याचा संतापजनक प्रयत्न घडला आहे. चार गाई अशक्त होऊन कोसळल्यानंतर काही लोकांनी एका गाडीत भरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्लॅन फसला आणि त्यांनी धूम ठोकली. याबाबत नागरिकांनी धाव घेताच परळी शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली. शनिवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

स्नेहनगर भागात घटना घडली. त्या ठिकाणी गुंगीचे औषध लावलेली खारी बुंदी, बिस्किटे, शेंगदाणे व पाव आढळले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्नात गुंगीच्या औषधाचा वापर झाल्याची प्राथमिक शंका व्यक्त केली. सध्या या गाईंवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिस ठाणे गाठून दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, गायींच्या चोरीच्या या प्रकारांमध्ये यापूर्वीही चर्चेत असलेली कार हीच वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिस तपास सुरू आहे. आपआपली जनावरे रात्रीच्या दरम्यान बांधून निगराणीत ठेवावी तसेच मोकाट जनावरे यांच्याबाबत आजूबाजूच्या नागरिकांनी लक्ष ठेवावे, यापुढे मोकाट जनावराच्या संदर्भात नगर पालिकाच्यामार्फतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संशयित वाहन अथवा जनावर चोरी बाबत हालचाल रात्रीच्या वेळी दिसून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन परळी शहरचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी केले.

Tuesday, April 22, 2025

राज्यात पुन्हा पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी.


मुंबई (प्रतिनिधी) राज्य सरकार कडून आयएएस  अधिकाऱ्यांची खांदेपालट सुरूच असून आज पुन्हा 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या  करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बढती देण्यात आली असून मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.  तर बीड  जिल्हाधिकारीपदी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा केंद्रस्थानी असून संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये पोलिस खात्यात अनेक बदल करण्यात आले. बीडच्या एसपी पदावर नवनीत कावत यांना जबाबदारी देण्यात आली होती. तर, बीड शहरातील पोलीस दलातही काही बदल करण्यात आले होते. त्यानंतर, आता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली करण्यात आली आहे. यापूर्वी, बीडमध्ये दीप मुधोळ ह्या जिल्हाधिकारी होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची बदली करण्यात आली होती. आता, विवेक जॉन्सन यांच्याकडे बीडची जबाबदारी देण्यात आली आहे.  

5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

1. अभिषेक कृष्णा (आयएएस: आरआर: २००६) सदस्य सचिव, महा. जीवन प्राधिकरण मुंबई यांची संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. अविनाश पाठक (आयएएस: एससीएस: २०१३) जिल्हाधिकारी, बीड यांना व्यवस्थापकीय संचालकपदी, मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

3. विवेक जॉन्सन (आयएएस: आरआर: २०१८) मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर यांना बीड येथे नियुक्त करण्यात आले आहे.

4. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: २०१९) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांना व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. पुलकित सिंग (आयएएस: आरआर: २०२१) सहाय्यक जिल्हाधिकारी, अंबड उपविभाग, जालना यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडिलां च्या कारला ट्रॅक्टरने दिली धडक.




केज (प्रतिनिधी) : तुमची मुलगी मला का देत नाहीत? म्हणून मुलीच्या शिक्षक वडिलांवर ट्रॅक्टरने धडक देऊन नंतर बंदुकीच्या धाक दाखवून जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वरपगाव शिवारात आज, मंगळवारी (दि. 22 ) दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमी शिक्षकावर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली.

केज तालुक्यातील वरपगाव येथील जयकिसान विद्यालयात शिक्षक असलेले बाजीराव डोईफोडे हे बीडहून आपल्या कारमधून शाळेला येणेजाणे करतात. मंगळवारी डोईफोडे हे त्यांच्याच शाळेतील गर्जे नावाच्या शिक्षकासोबत आपल्या कारने ( क्रमांक एम एच 23 / बी एच 8161) गावी परतत होते. दातम्यान, कापरेवाडी शिवारात सुरज दिलीप गुंड ( रा गुंडगल्ली, केज) याने ट्रॅक्टरने त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर बंदुकीच्या धाकावर तुझी मुलगी मला का देत नाहीस म्हणत मारहाण केली. डोईफोडे यांना गंभीर जखमी करत गुंड तेथून पसार झाला. कारमधील दुसरे शिक्षक गर्जे यांनी डोईफोडे यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

पोलीस बीडला रवाना.

या प्रकरणी जखमी झालेले शिक्षक बसजीराव डोईफोडे यांना बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे व सहकऱ्यांना जवाब घेण्यासाठी बीडला पाठविले आहे. जवाब घेऊन ते केजला आल्यानंतरच केज पोलिसात अधिकृत गुन्हा नोंद होणार आसल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली.

एकतर्फी प्रेमातून प्रकार घडला.

या प्रकरणी मुलीचे आजोबा महादेव रंगनाथ भुमरे यांनी सांगितले की, सुरज दिलीप गुंड याचे शिक्षकाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. यातून त्याने यापूर्वी ही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ व्हायरल केले. त्यावरून त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. शिक्षक कुटुंबियांचा या विवाहाला विरोध असला तरीही गुंड हा मुलीचा पिच्छा सोडायला तयार नाही यातूनच हा प्रकार घडला आहे.

Saturday, April 19, 2025

धक्कादायक! प्रसिद्ध न्युरोसर्जनने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात हळहळ


सोलापूर (प्रतिनिधी)  सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली, जेव्हा शहरातील नामांकित न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या. 

 डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील एक आघाडीचे न्युरोसर्जन म्हणून ओळखले जात होते. शुक्रवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी धाव घेतली असता, त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. यानंतर तात्काळ त्यांना  वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलघटनेची माहिती मिळताच  सोलापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. हॉस्पिटल परिसरात नातेवाईक आणि सहकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. डॉ. वळसंगकर यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वैद्यकीय शिक्षण आणि कारकिर्दीतला प्रवास

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरच्या (DBF Dayanand College of Arts & Science) डीबीएफ दयानंद महाविद्यालयातून आपले शिक्षण घेतले. त्यानंतर (Dr. V.M. Medical College) डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी (Shivaji University) शिवाजी विद्यापीठातून एमबीबीएस, एमडी आणि (Royal College of Physicians, London) लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमआरसीपी ही पदवी प्राप्त केली होती. मराठी, इंग्रजी, कन्नड आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या वळसंगकर यांनी आपला व्यावसायिक प्रवास अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडलात्यांनी (CPR Hospital, Kolhapur) कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप पूर्ण केली होती. तसेच कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातही सेवा बजावली. पदव्युत्तर प्रशिक्षण (Dr. V.M. Medical College, Solapur) सोलापुरातील वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण झाल्यानंतर त्यांनी (Bombay Hospital, Mumbai) बॉम्बे हॉस्पिटलमध्ये न्युरोलॉजी विभागात वरिष्ठ रजिस्ट्रार म्हणून काम केले. त्यांना राष्ट्रीय न्युरोलॉजी बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून मान्यता प्राप्त झाली होती.

Tuesday, April 15, 2025

परळीत किरीट सोमय्या यांना मुस्लिम तरुणांनी घोषणाबाजी करत दाखवले काळे झेंडे.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे मंगळवारी परळी दौऱ्यावर होते. परळीचा दौरा आटपून कारने जात असताना दुपारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एक मिनार चौक दरम्यान मुस्लिम समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी करीत सोमय्या यांना काळे झेंडे दाखवले. 

विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द करून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करत गुन्हे दाखल करावे यासाठी सोमय्या हे परळी शहर पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाणे मार्गे ते दुपारी बाराच्या दरम्यान गेवराईकडे जाण्यासाठी  वाहनांमध्ये बसले असता छत्रपती शिवाजी चौक मार्गे जात असताना मुस्लिम तरुणांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाड्याजवळ घोषणाबाजी केली. 

सोमय्या यांच्यावर कारवाई करावी.

दरम्यान, सोमय्या हे बांगलादेशी घुसखोरांच्या आडून जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवत असून समाजात द्वेष पसरवत आहेत. जाणूनबुजून मुस्लिम समाजाला टार्गेट करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी केलेल्या मागण्या मान्य न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्याची मागणी सकल मुस्लिम समाजाने एका निवेदनाद्वारे तहसलिदारांकडे केली आहे.

बोगस जन्मप्रमाणपत्राची चौकशी करावी - किरीट सोमय्या.

बीड जिल्ह्यातील परळी, माजलगाव, गेवराई व बीड शहर येथे ज्यांच्याकडे जन्माचे कागदपत्र नव्हते, अशा नागरिकांना विलंबित पद्धतीने जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विलंबित जन्म प्रमाणपत्र देणे ही चिंतेची बाब आहे. जन्माचे कागदपत्र नसणे खोट्यासह्या, नोटरीचा पत्ता नाही, अशा अपात्र व्यक्तींना मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. नायब तहसीलदारांना अधिकार नसतानाही  जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे .या बोगस जन्मप्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी. यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील मूळ मुसलमान नागरिका विषयी काहीही अडचण नाही ,असे ही सोमय्या म्हणाले.

भाजपा पदाधिकाऱ्यावर तरुणाचे कोयत्या चे वार, हत्येने बीड जिल्हा हादरला.आरोपी चेे पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण.


माजलगाव (प्रतिनिधी) : शहरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका युवकाच्या खुनाच्या घटनेने माजलगाव शहरासह बीड जिल्हा हादरला आहे. बाबासाहेब प्रभाकर आगे ( रा. किट्टी आडगाव) असे मृताचे नाव आहे. ते भाजपाचे माजलगाव तालुका सरचिटणीस होते. दरम्यान, आरोपी नारायण शंकर फपाळ याने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याची आल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहिती नुसार, आज दुपारी माजलगाव शहरातील शाहू नगर भागात भाजपा कार्यालय आहे. येथे आज दुपारी तालुका सरचिटणीस बाबासाहेब आगे कामानिमित्त आले होते. काम आटोपून बाहेर पडताच तेथे दबा धरून बसलेल्या नारायण शंकर फपाळ याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. बचावासाठी आगे पुढे पळाले तेव्हा फपाळ याने पाठलाग केला. जिवाच्या आकांताने पुढे पळणाऱ्या आगे यांना स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर फपाळ याने गाठले. त्यानंतर फपाळ याने आगे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. 

प्रत्यक्षदर्शीनुसार फपाळ याने अगोदर आगे यांच्या पोटात वार करून दोन वार डोक्यात केले. त्यानंतर फपाळ तेथून पसार झाला. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली. पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी बाबासाहेब आगे यांना गंभीर जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी आगे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट.

दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी नारायण शंकर फपाळ पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. त्याने आगे यांचा  खून का केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, भर दिवसा रस्त्यावर हत्येच्या थरारक घटनेने माजलगाव शहरासह बीड जिल्हा हादरला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयाची दशा आधीच ३ माता मृत्यू आणी आता महिलेला शस्त्र क्रिया न करताच काढले बाहेर.वरिष्ठांना सांगितल्यानंतर शस्त्रक्रिया.


बीड (प्रतिनिधी) जिल्हा रूग्णालयात चालू महिन्यात तीन माता मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेबद्दल प्रश्न उपस्थित होत असतानाच मंगळवारी सकाळी एका महिलेला वेळ संपली असे कारण सांगून शस्त्रक्रिया गृहातून बाहेर काढले. हा प्रकार दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. त्यानंतर याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली. त्यानंतर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. परंतू या निमित्ताने गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

वडवणी तालुक्यातील एक महिला ८ एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. अंगावरून लाल, पांढरे जाणे, पोट दुखणे आदी आजार होते. त्यामुळे या महिलेला गर्भपिशवी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्व तपासण्याही केल्या. परंतू आज-उद्या करून १५ एप्रिलपर्यंत या महिलेच्या शस्त्रक्रियाला टोलवाटोलवी केली. त्यानंतर १५ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजता शस्त्रक्रिया गृहात नेले. परंतू १२ वाजेच्या सुमारास वेळ संपली असे सांगून या महिलेला बाहेर काढण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सिक आणि आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

सीएस, एसीएस, आरएमओंची धाव.

हा सर्व प्रकार नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय राऊत यांना सांगितला. त्यांनी तातडीने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सदाशिव राऊत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांना शस्त्रक्रिया गृहात पाठविले. आगोदर या महिलेची समुपदेशन केले. त्यानंतर स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.किरण शिंदे, डॉ.वाघमारे आदींना बोलावून घेत गर्भपिशवीची गंभीर शस्त्रक्रिया यशस्त्री केली. वरिष्ठांनी दखल घेतली खरी, परंतू नातेवाईकांनी प्रत्येकवेळी वरिष्ठांनाच सांगायचे? संबंधित डॉक्टर, कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिक बजावत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

दोन्ही राऊतांनी कठोर भूमिका घ्यावी.

सध्या जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.संजय राऊत तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सदाशिव राऊत आहेत. त्यांनी सेवेत हलगर्जी, टोलवाटोलवी करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शोधून कान टोचण्याची गरज आहे. आपल्या स्वभावात बदल करून थोडी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. आपले कोणीच काही करू शकत नाही, अशा अविर्भावात असणाऱ्यांना कारवाईचा दणका तर चांगले काम करणाऱ्यांचे कौतूक करणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर माता मृत्यू आणि रूग्णसेवेत हलगर्जी झाल्याच्या तक्रारी रोजच येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Saturday, April 12, 2025

बहिणीवरील प्रेमाचा राग.काेयत्याने वार करून तरुणाची हत्या.अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) बहिणीवर प्रेम करणाऱ्या युवकाला धडा शिकविण्यासाठी त्याच्यावर काठी व कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी शहरातील पोखरी रोडवर हा थरार घडला. जखमी तरुणाला तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले; परंतु अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांविरोधात अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजकुमार साहेबराव करडे (वय २५, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजकुमार हा सकाळी पोखरी रोड परिसरात एका हॉटेलसमोर उभा होता. यावेळी बहिणीवर प्रेम करणाऱ्या राजकुमार याला धडा शिकविण्यासाठी मुलीचा भाऊ वेदांत वैजनाथ शिंदे व आदिनाथ भांडे (रा. सारडानगरी) यांनी राजकुमारला हॉटेलवर गाठले. कोयत्यासह धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी केशाबाई साहेबराव करडे (रा. येल्डा रोड, गवळीपुरा, अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीचे वडील वैजनाथ शिंदे, भाऊ वेदांत शिंदे, आदिनाथ भांडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले करीत आहेत.

शॉर्ट फिल्म बनविताना प्रेम.

राजकुमार हा शॉर्ट फिल्म बनविण्याचे काम करत होता. त्याची व अल्पवयीन मुलीची तेथेच ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलीच्या वडिलांना हे प्रकरण मान्य नव्हते. त्यांनी राजकुमारला मुलीपासून दूर राहा अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली होती. परंतु तरीही राजकुमारमध्ये सुधारणा झाली नाही. याचाच राग मनात धरून राजकुमारची भरदिवसा हत्या करण्यात आली.

Friday, April 11, 2025

परळी रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 25 कोटी! परळी रेल्वे स्टेशन चे रुप पलटणार


मुंबई - विदर्भातील गोंदिया ते बल्हारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४,८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोबतच बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकासह राज्यातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित असलेल्या मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील यात समावेश आहे.


पुनर्गस होणाऱ्या रेल्वेस्थानकांमध्ये छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानक तसेच जालना, परभणी, परतुर, सेलू, गंगाखेड आदि रेल्वेस्थानकांचाही समावेश आहे.
यावेळी अन्य घोषणा करताना विदर्भातील गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 4819 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा देखील रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.
या प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे जाळे अधिक मजबूत होणार असून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्र प्रदेशाशी व्यापार-व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली.

महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून याद्वारे १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश आहे. रेल्वेच्या पायाभूत विकासासाठी एकूण १.७३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र शासनाकडून करण्यात येत आहे. यावर्षी रेल्वे बजेटमधून महाराष्ट्राला २३,७०० कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले..

रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार आहे. यामध्ये महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांचा टूर आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दीड वर्षांची आराध्या बनली बाल हनुमाना ची छबी; श्री हनुमान जन्मोत्सवात सर्वांचे लक्ष वेधले.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील सुर्वेश्वरनगर भागात आज श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक सुंदर आणि भक्तिभावाने भरलेला दृश्य पाहायला मिळाले. श्री हनुमान भक्त राहुल पाचनकर यांची दीड वर्षांची चिमुरडी आराध्या हिने आज शुक्रवार, दिनांक 11 एप्रिल रोजी श्री हनुमानाची वेशभूषा परिधान करत सर्वांचे मन जिंकले.
आराध्याच्या हातातील गदा, अंगावरची भगवी वस्त्रे आणि चेहऱ्यावरचे तेज पाहून परिसरातील नागरिक स्तिमित झाले. 'जय श्रीराम', 'श्री बजरंगबली की जय' अशा घोषणा देत तिने भक्तीमय वातावरण निर्माण केले.  या गोंडस रूपातील बाल हनुमानावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, सोशल मीडियावरही तिच्या या रूपाची छबी व्हायरल होत आहे.

घरासमोर तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीस स्पर्श झाल्याने,एकाचा मृत्यू एकजन बचावले.


आष्टी (प्रतिनिधी) : गावातील किर्तन संपल्यानंतर रात्री घरी परतणाऱ्या वकिलाचा घरासमोर तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. तर नशिब बलवत्तर म्हणून त्यांचे वडिल बचावले. अमोल पंढरीनाथ पारखे ( ३०) असे मृत वकिलाचे नाव आहे. ही घटना हनुमंतगाव येथे गुरूवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली.

आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथे गुरूवारी रात्री  किर्तन होते. ते संपल्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान वकील अमोल पंढरीनाथ पारखे हे वडिल आणि चुलत भावासह घराकडे निघाले. मात्र, घराच्या समोर विद्युत वाहिनी तुटून पडली होती. अमोल व त्याचे वडील पंढरीनाथ यांच्या हाताला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने ते दोघेही बाजूला फेकले गेले. यावेळी अमोल पारखे हे अत्यावस्थ होते. तर त्यांचे वडील जखमी झाले. 

दरम्यान, अमोल यांना लागलीच आष्टी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मांजरा धरणाच्या सिंचन व बिगर सिंचना साठी थकबाकी वसुलीत लक्षणीय वाढ 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची यशस्वी वसुली.


केज (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील मांजरा जलाशयातून बिगर सिंचनासाठी कार्यरत असलेल्या एकूण 20 पाणी पुरवठा योजनांमधून तसेच सिंचनासाठी डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी शेतकऱ्यांकडून 3 मार्च 2025 दरम्यान एकूण 56 कोटी 47 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी सांगितले की, मार्च अखेरपर्यंत एकूण 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची यशस्वी वसुली करण्यात आली आहे.

63 गावांना पाणी पुरवठा.

या जलाशयातून लातूर, बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांतील 20 पाणी पुरवठा योजनांद्वारे लातूर महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, अंबाजोगाई, कळंब व धारूर नगरपरिषद तसेच केज नगर पंचायत अशा एकूण 63 गावांना पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय या तीनही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी दिले जाते.

सिंचन व बिगर सिंचन वसुलीचा तपशील.

मार्च अखेरपर्यंत सिंचन विभागात 1 कोटी 11 लाख 18 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. तर बिगर सिंचन वसुलीतून 6 कोटी 57 लाख 3 हजार रुपये वसूल झाले. यामध्ये मिळून एकूण वसुली 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांवर पोहोचली आहे. या वसुलीसाठी अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, सहायक अभियंता अभिजीत नितनवरे, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, शाखा अधिकारी सूरज निकम, शेखर अंधारे, अक्षय माने, शुभम गंभीरे, आशिष चव्हाण, कृष्णा येणगे, अब्दुल वाजिद आणि अनुप गिरी यांनी विशेष प्रयत्न केले.

उद्दिष्टाच्या पुढे जाऊन वसुली.

लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक 1 ला सिंचन वसुलीसाठी 1 कोटी 1 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले गेले होते, मात्र प्रत्यक्षात 1 कोटी 11 लाख 18 हजार रुपयांची म्हणजेच 110.08 टक्के वसुली झाली. तसेच बिगर सिंचनासाठीचे उद्दिष्ट 7 कोटी 42 लाख होते, परंतु प्रत्यक्षात 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची म्हणजेच 103.53 टक्के वसुली करण्यात आली. ही उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली झाल्यामुळे कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी सर्व वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले आहे.

Thursday, April 10, 2025

अत्याचार अन् फोटो व्हायरल ब्लॅक मेलिंगला कंटाळून मजूर महिलेचा जीवन संपविण्याचा प्रयत्न. आरोपी फरार


दिंद्रुड (प्रतिनिधी) : शिल्लक मजुरी दे अन्यथा शारीरिक संबंध ठेव नाही तर तुझ्या पतीला मारून टाकेल अशी धमकी देत दोन ते तीन वर्षांपासून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावातील महिलेवर मुकादमाने अत्याचार केले. तसेच अश्लील फोटो व्हायरल केल्याने महिलेने मानसिक व शारीरिक जाचास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, महिलेचा तक्रारीवरून अमोल श्रीमंत शिनगारे याच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात गुरुवारी अत्याचार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला. 

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावातील ऊसतोड मजूर जोडपं अमोल श्रीमंत शिनगारे याच्याकडे ट्रॅक्टरवर कामाला होते, दरम्यान दोन लाख रुपयांची बाकी त्यांच्याकडे शिल्लक राहिल्याने तुमच्याकडे असलेले पैसे दे अन्यथा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव म्हणत अमोल शिनगारे याने जबरदस्तीने महिलेने अत्याचार केले. तसेच भेटायला ये अन्यथा फोटो व्हायरल करेल अशा धमक्या दिल्या. 

दरम्यान, सात महिन्यांपासून महिला भेटण्यास टाळाटाळ करत असल्याने अमोलने महिलेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले. शिनगारे याच्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून पीडित महिलेने मंगळवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अमोल श्रीमंत शिनगारे याच्या विरोधात अत्याचारासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार असून दिंद्रुड पोलीस शोध घेत आहेत.

चिमुकलीने धाडसाने उधळून लावला अपहरणाचा डाव; हाताला चावा घेऊन करून घेतली सुटका.


आष्टी (प्रतिनिधी) : आई वडील बाहेर गावी गेल्याने घरच्या अंगणात एकटीच खेळत असलेल्या चिमुकली चे अपहरण करण्याचा प्रयत्न आज सकाळी अकरा वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या चिमुकलीने धाडसाने अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन स्वतःची सुटका करून घेतली. ही धक्कादायक घटना अंभोरा येथील 'वडाचे मळा' शेत वस्तीवर घडली.

आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील वडाचे मळा येथील शेत वस्तीवर राहत असलेले ज्ञानेश्वर दत्तात्रय खाकाळ हे गुरूवारी सकाळी पत्नीसह कामानिमित्त अहिल्यानगर येथे गेले होते. तर त्यांची सात वर्षाची मुलगी ही घरी आजीजवळ होती. सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घराच्या अंगणात खेळत असताना दुचाकीवर आलेल्या दोघाजणांनी चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिमुकलीने घाबरून न जाता मोठ्या धाडसाने एकाच्या हाताला चाव घेत स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर चिमुकलीने या धक्कादायक प्रकाराची माहिती आजीला दिली. आजीने शेजाऱ्यांना माहिती दिली असता ग्रामस्थांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. मात्र त्यांचा मागमूस लागला नाही. दरम्यान, ग्रामस्थ आणि पोलिसांनी घाबरून न जाता चिमुकलीने मोठ्या धाडसाने स्वतःची सुटका करून घेतल्याने तिचे कौतुक केले आहे.

पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन.

याबाबत अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांना सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणी तक्रार दिली नाही. मात्र, आम्ही परिसरात व ठाणे हद्दीत संशयितांचा शोध घेत आहोत. नागरिकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष ठेवून दक्ष राहावे. कोणी संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क करावा.

बीड सायबर पोलिसांची गुजरातमध्ये करोडोंची डील.पीएसआयनंतर हवालदार, चालकही निलंबित. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचा दणका.


बीड(प्रतिनिधी) : परवानगी न घेता आरोपी घेऊन गुजरातमध्ये गेले. तेथे गेल्यावर कोट्यवधी रुपयांची डील केल्याचा आरोप झाला. प्राथमिक चाैकशीत दोषी आढळल्याने सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांचे निलंबन झाले होते. आता त्यांच्यासोबत गेलेले हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांनाही बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. एकाच पोलिस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना दणका दिला आहे. यामुळे ठाणेदारही अडचणीत आले असून, कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.

सायबर पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पोलिस निरीक्षक देविदास गात यांच्याकडे होता. त्यात एक आरोपी अटक केला. त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली होती, परंतु याच पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रणजीत कासले, हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत हे तिघे जण खासगी वाहनाने या आरोपीला घेऊन गुजरात राज्यात गेले. त्या आधी त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत अथवा छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांची परवानगी घेतली नाही. त्यानंतर गुजरातमध्ये गेल्यानंतरही त्यांनी एका व्यक्तीकडे पैशांची मागणी केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिस अधीक्षक काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी चौकशी करून कासले यांना तडकाफडकी निलंबित केले होते, तर गिरी आणि चालक भाग्यवंत यांची चौकशी केजचे सहायक अधीक्षक कमलेश मिना यांच्याकडे सुरू होती. त्याचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी या दोघांचेही निलंबन करण्यात आले.

खासगी वाहनातून आरोपी गुजरातमध्ये.

कासले यांच्यासह गिरी, भाग्यवंत यांनी शासकीय ऐवजी खासकी वाहन गुजरातमध्ये नेले. भाग्यवंत हे सुट्टीवर होते. तसेच, सायबर पोलिस ठाण्यात वाहन नसतानाही त्यांची पोस्टींग तेथेच होती. तर, गिरी हे देखील एका ठिकाणी युनिफॉर्मवर बैठकीत बसल्याचे दिसले. हे सर्व पुरावे पाहून आणि चौकशीतील मुद्द्यांवरून काँवत यांनी गिरी व भाग्यवंत यांनाही निलंबित केले.

कासलेंचे व्हिडीओ अन् पोलिसांची बदनाम.

निलंबित केल्यानंतर रणजीत कासले यांनी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. यात अनेकांवर आरोप केले. आता देखील त्यांचे व्हिडीओ सुरूच आहेत. त्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा बीड पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे.

पोलिस निरीक्षकही अडचणीत.

सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांचीही चौकशी झाली आहे. त्यांचाही कसुरी अहवाल पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी विशेष पाेलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांच्यावरही गंभीर आरोप असल्याचे सूत्रांनी सांगितले जात आहे. आता आयजी हे गात यांच्यावर कारवाई करतात की पाठीशी घालतात? याकडे लक्ष लागले आहे.

सायबर ठाणेदारही बदलणार ?

पोलिस ठाण्यातील कर्मचारी दोषी आढळला, तर ठाणेदाराला जबाबदार धरून कारवाई करणार, असे पोलिस अधीक्षक काँवत यांनी सुरुवातीलाच सांगितले होते. आता या प्रकरणात एका पीएसआयसह दोन कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्यामुळे गात यांच्यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. गात यांना नियंत्रण कक्षात घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी दुपारपर्यंत तसे आदेश निघाले नव्हते.

कारवाई होणारच.

सायबर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित केले आहेत, तसेच पोलिस निरीक्षक यांचाही कसुरी अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पाठवला आहे. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई होणारच आहे. चांगले काम करणाऱ्यांना माझे पाठबळ असेल.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

Wednesday, April 9, 2025

बंधाऱ्याच्या लोंखडी गेटची चोरी करताना तिघांना आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले.


आष्टी (प्रतिनिधी) : आष्टी-सांगवी क्षेत्रातील नागापूर सांगवी बंधाऱ्याचे लोंखडी गेटची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना मंगळवारी रात्री आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. आरोपींमध्ये एका अल्पवयीनसह दोघांचा समावेश आहे. या आरोपींकडून बंधाऱ्याच्या लोंखडी गेट चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. आष्टी तालुक्यातील आष्टी-सांगवी क्षेत्रातील नागापूर सांगवी बंधाऱ्याचे लोंखडी गेट चोरटे लंपास करत असल्याची गोपनीय माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांना मिळाली. यावरून पोलिस हवालदार अशोक शिंदे, पोलिस नाईक विकास जाधव, वाहन चालक उदावंत यांच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान तिघाजणांना रंगेहाथ पकडून मुद्देमालासह अटक केली आहे.

पाटबंधारे विभागातील कर्मचारी मारूती आबा पवार याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात मयुर अशोक लष्कर ( रा.भैरूबावाडी.जि.अहिल्यानगर) , विकास विजय विटकर आणि एक अल्पवयीन ( रा. शेकापूर रोड आष्टी,ता.आष्टी) यांच्यावर कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर करीत आहेत. 

अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता!

आष्टी पोलिस ठाणे हद्दीत काही महिन्यापूर्वी नांदा व धिर्डी येथील दोन ठिकाणच्या बंधाऱ्याचे लोंखडी गेट चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांची देखील आरोपींकडून उकल होण्याची शक्यता आहे.

पवनचक्की उभारणी विडा शिवारातअवादा कंपनीच्या प्लांटवर चोरट्यांचा धुमाकूळ सुरक्षारक्षकांचे हातपाय बांधून लाखोंची केबल लंपास.


केज (प्रतिनिधी) : पवनचक्की उभारणीचे काम प्रगतीपथावर असलेल्या तालुक्यातील विडा शिवारात १४ जणांनी दोन सुरक्षारक्षकांचे हातपाय बांधून 12 लाख 87 हजार रुपयांची केबल आणि इतर मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सोमवारी (दि.7) मध्यरात्री 12 वाजण्याच्या दरम्यान विडा शिवारातील पवनचक्की उभारणीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तोंडाला कपडा बांधलेल्या 14 चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी सुरक्षारक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांना धमकावून दोघांचेही हातपाय बांधले. 4 चोरटे त्यांच्याजवळ थांबले तर इतरांनी टॉवर मधील शिडीचा आधार घेऊन 12 लाख  87 हजार रुपये किमतीचे केबल व इत्तर साहित्य ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व चोरट्यांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोबारा केला.

दरम्यान, सुरक्षारक्षकांनी आपली सुटका करून घेत चोरीची माहिती अवादाच्या अधिकाऱ्यांना दिली. वॉचमन आकाश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 14 चोरट्यांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत.

गोदामाला पोलीस पहारा 

अवादा ऍनर्जी कंपनीच्या गोदामाला बुधवारी (दि. 9 ) सकाळी 10 वाजल्यापासून राज्य राखीव दलाच्या एका तुकडीचा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती अवादाचे अधिकारी शिवाजी थोपटें यांनी  दिली.

रामनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंतीची कार्यकारणी जाहिर.अध्यक्ष भास्करभाऊ सरवदे, उपाध्यक्ष किशोर चव्हाण.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  रामनगर लिबोनी बौद्ध विहार येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती उत्सव समितीची बैठक  राम नगर येथील जेष्ठ नागरीक आयु. सुभाष कांबळे, माणिक वाघमारे दिलीप जगताप मच्छिंद्र ठेंगे मारोती बदणे बालाजी ढगे रवि ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी मोठया उत्साहात  पार पडली. 
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची नविन कार्यकारिणी निवडण्यात आली यात अध्यक्ष भास्करभाऊ सरवदे, उपाध्यक्ष किशोर चव्हाण, कोषाध्यक्ष सचिन ठेंगे, सचिव विशाल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तर मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत वाघमारे गोविंद सरवदे लालासाहेब वाघमारे  कुंडलीक कांबळे बिभीषन फड सुग्रीव फड लक्ष्मण कांबळे राजभाऊ बावणे बालाजी बावणे कृष्णा बावणे आनंत लटपटे गौतम जगताप अंकुश नाईकवाडे मनोज कांबळे नवनाथ आचार्य गोविंद  आचार्य निरंजन लटपटे वैजनाथ वाघमारे सुभाष लहाने तर सदस्यपदी रोहीत वाघमारे संतोष ठेंगे राहुल वाघमारे आदित्य ढगे आकाश चव्हाण अनिकेत ढगे साहील चव्हाण पिल्लू वाघमारे आभिषेक ढगे बालाजी सरवदे आशोक ढगे छोट्या वाघमारे सोहम चव्हाण यांची निवड करण्यात आली. 
दरम्यान या बैठकीत भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार असून यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Tuesday, April 8, 2025

सरकारी वाळू धोरणात बदल! घरकुला साठी मोफत वाळू मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय.


मुंबई (प्रतिनिधी)-पूर्वीचे वाळू डेपो चे धोरण बदल करत मंत्रिमंडळाने नवे वाळू धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे सरकारी कामकाजासाठी कृत्रिम वाळू वापरण्यात येईल तसेच घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळ वैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

आता राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार आहे. तसेच शिंधी समाजाला त्यांची घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने कायदेशीर करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ते आज मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

राज्यातील घरकुलांना आपण पाच ब्रास मोफत वाळू देणार आहोत. प्रत्येक वाळूघाटात 10 टक्के आरक्षण हे घरकुलांसाठी असेल. ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही, त्या ठिकाणी स्थानिक ग्रामंपचायती यांनीही पुढची कारवाई कारवाई करायची आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

सरकारी बांधकामात एम सँडचाच वापर होणार

तसेच, नैसर्गिक वाळू देण्याचं धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये आणणार आहोत.. एम सँड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करण्यात येईल. सरकारी बांधकामात एम सँड वाळूच वापरली जाईल. नदीच्या वाळूची गरज पडणार नाही. एम सँड धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये आणले जाईल. दगड आणि गिट्टीपासून ही वाळू तयार केली जाणार आहे, अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

“1947 साली फाळणीत जे विस्थापित झाले, अशा सिंधी समाजाच्या राज्यात 30 वसाहती आहेत. नागपूर, जळगाव, मुंबई इथे या वसाहती आहेत. त्या कायदेशीर नाहीत. या सिंधी विस्थापितांसाठी विशेष धोरण आणले आहे. ज्यावेळी जमीन घेतली, त्यावेळचे रेडी रेकनर दर व 10 टक्के इतर कर लावले जातील. या सर्व वसाहती क्लास वनमध्ये बदलण्यात येतील. आम्ही निवडणूक संकल्पनाम्यात हे वचन दिले होते, ते आज पाळले आहे. आजपासून सिंधी समाजाला ही घरे व आस्थापना अधिकृत करता येतील. त्यासाठी सिंधी समाज ज्यादिवशी विस्थापित झाला त्यावेळचा रेडी रेकनर दर, अडीच टक्के कर लावला जाईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.

1) नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार, यातून विकास कामांना वेग येणार
(नगर विकास)

2) राज्याचे वाळू- रेती निर्गती धोरण-2025 जाहीर
(महसूल)

3) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय; झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार
(गृहनिर्माण)

4) वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर (वरळी) या दोन म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा C&DA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय
(गृहनिर्माण)

5) सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना-2025
(महसूल)

6) नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार
(आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन)

7) खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांची ‘सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करण्याचा निर्णय
(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

8) शासकीय आयुर्वेद / होमिओपॅथी / युनानी / योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित
(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

9) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा
(ग्रामविकास)

Sunday, April 6, 2025

गृहराज्यमंत्री योगेश कदमांचाच मोबाईल चोरीला चोरीची तक्रार खुद्द गृहराज्यमंत्र्या ना द्यावी लागली. गृहखात्याची मोठी नामुष्की.


बीड (प्रतिनिधी) राज्यात कायदा व सुव्यवस्थेच किती धिंधवडे निघाले आहेत, हे शुक्रवारी घडलेल्या घटनेवरून लक्षात येईल. कारण दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नव्हे गृहमंत्रालय ज्यांच्या ताब्यात आहे, ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला गेला आहे आणि दुसरी तिसरीकडे नाही तर बीडमध्ये ही घटना घडली आहे. 

आता मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार खुद्द गृहराज्यमंत्र्यांना द्यावी लागावी, ही म्हणजे गृहखात्याची मोठी नामुष्कीच आहे, नाही का. कदमांचा मोबाईल पोलीस अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोर चोरीला गेला आहे. म्हणजे दिवसाढवळ्या चोरी होते हे ऐकले होते पण पोलिसांच्या नाकासमोरून, माध्यमांचे कॅमेरे असताना देखील त्यांचा मोबाईल लंपास होतोय म्हणजे तेथील चोरटे किती हातचलाखीने हे काम करतात हे समोर येत आहे. 

योगेश कदम यांनी केज पोलिसांत मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. कदम हे बीड दौऱ्यावर असताना मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या सांत्वनासाठी गेले होते. यावेळी माध्यमे देखील समोर होती. तेथून कदम यांचा मोबाईल पळविण्यात आला आहे. हे समजताच शोधाशोध सुरु झाली, परंतू कुठेच सापडत नसल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. 

अत्यंत गंभीर बाब! अंबाजोगाईच्या शास कीय रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांना पिण्याचे पाणी नसल्याने स्वच्छता गृहा साठी ठेवलेले पाणी पिण्याची पाळी ?


कुठे गेले रुग्णालयाच्या परिसरात फिरणारे समाजसेवक, समाजसेवी संघटना, दानशूर व्यक्ती कोणालाच याच्याशी देणे घेणे नाही का! 

अंबाजोगाई (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात एक ना अनेक समस्या आहेत प्रत्येक समस्येला फक्त डीनच जबाबदार नसतो मग वार्डाचे इन्चार्ज , विभागप्रमुख इतरांची काही जबाबदारी नाही का ? शासकीय रुग्णालयातील वार्डात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे वार्डाच्या स्वच्छतागृहात पाण्याची टाकी ठेवली आहे त्यावर पिण्याचे पाणी असा उल्लेख असल्याने अनेक नातेवाईकांना वाटले हे पिण्याचे पाणी समजून ते पाणी पीत असल्याचे स्वतः डोळ्यांनी संभाजी ब्रिगेडच्या महिला अध्यक्ष सुनंदा लोखंडे यांनी पाहिले उद्या या संदर्भात त्या डीन यांना निवेदन देणार आहेत कुठे गेले समाजसेवक, समाजसेवी संघटना, दानशूर व्यक्ती कोणालाच याचेशी देणे घेणे नाही का ? असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे 

         सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला पाण्याची नितांत गरज असते प्रत्येक वार्डात रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना पिण्याचे पाणी नसल्याने त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे खाजगी पाणी विक्रेत्याच्या आर्थिक लाभासाठी गोरगरीब रुग्ण व नातेवाईकांची ठरवून आर्थिक पिळवणूक होत असताना वार्डात पिण्याचे पाणी नाही यासंदर्भात उपाययोजना करण्याची वार्ड इनचार्ज पासून विभाग प्रमुख तसेच वैद्यकीय अधीक्षक उपअधीक्षक यांची काहीच जबाबदारी नाही का ? रुग्णालय परिसरात अनेक ठिकाणी जलकुंभ शोभेच्या वस्तू म्हणून उभे आहेत काही ठिकाणी थोडावेळ पाणी येते इतर वेळेला तहान भागवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना मेडिकल कॅन्टीनमध्ये तसेच ऑटो पॉईंट वर जाऊन पैसे मोजून बाटलीभर पाणी आणावे लागते पुन्हा तीच पायपीट ज्या रुग्णाकडे नातेवाईक नाही त्यांनी काय करायचे 

संभाजी ब्रिगेडच्या महिला अध्यक्षांचा गंभीर आरोप . 

अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील एवढ्या गंभीर समस्या असताना कार्यरत असणाऱ्या एकाही विभाग प्रमुखाला याचेही देणे-घेणे नाही असेच म्हणावे लागेल त्याचे कारण म्हणजे प्रत्येक विभाग प्रमुखाच्या पाठीशी कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद असतो त्यामुळे डीन यांना सुद्धा विभाग प्रमुखाला सूचना करताना सांभाळून बोलण्याची पाळी आल्याचे बोलले जात आहे हा प्रश्न गंभीर वाटत नसला तर विभाग प्रमुखाचे समर्थन करणारा एकही नेता पुढे येऊन रुग्णालयातील वॉर्डातील रुग्ण व नातेवाईकांना पिण्याचे पाणीपुरवठा मी करतो असे कोणीही म्हणत नाही आहो तेही जाऊ द्या इतर वेळा समाजसेवेच्या बेंबीच्या देठापासून डंका पिटणारी देशात नाव असलेली समाजसेवी संघटना त्यांनीही कधी गोरगरिबा साठी पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही समाजसेवक, समाजसेवी संघटना तर समाजात शिल्लक आहेत का ? असे म्हणण्याची पाळी सध्या आली आहे 

संभाजी ब्रिगेडच्या अंबाजोगाईच्या महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष सुनंदा लोखंडे यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे त्या म्हणतात नातेवाईक एडमिट असल्याने मी वार्डात गेले असता स्वच्छता गृहाच्या बाजूला पाण्याची टाकी ठेवलेली आहे त्यावर चक्क पिण्याचे पाणी असे लिहिले असल्याने वार्डातील काही रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या टाकीतील पाणी पित असल्याचे आपण स्वतः पाहिले ही बाब अत्यंत गंभीर आहे आपण संघटनेच्या वतीने उद्या रुग्णालयाचे डीन यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे पिण्याचे पाण्याची समस्या सोडवण्यासाठी इतर राजकीय पक्ष, नेते, आजी-माजी आमदार संघटना पुढाकार घेणार का की आपल्याला काय करायचे म्हणून गप्प बसणार बघू कोण कोण येते पुढे

चिमुकला शिवांश सचिन पाचनकर याच्या श्रीराम वेशभूषेने सर्वांचे मन जिंकले


 *लहानग्यांमध्येही प्रभू श्रीरामांविषयीची आस्था व आकर्षण अधोरेखित* 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्रीराम जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला परळीतील सुर्वेश्वरनगर परिसरात एक आगळीवेगळी झलक पाहायला मिळाली. येथील रहिवासी सचिन पाचनकर यांचा तीन वर्षाचा चिमुकला मुलगा शिवांश पाचनकर याने प्रभू श्रीरामाची वेशभूषा साकारून उपस्थितांचे मन जिंकले. त्याच्या या भक्तिरसात न्हालेल्या रूपाने नागरिकांमध्ये आनंद, श्रद्धा आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले.
आजच्या युगात लहान वयातच मोबाइल, गेम्स याकडे मुलांचा कल असताना शिवांशसारख्या मुलांनी आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत रस घेणे हे निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. शिवांश याने याआधी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मासाहेब, तसेच भगवान शंकर यांची वेशभूषा साकारली असून, त्यामुळे तो परिसरात लहान वयातच एक संस्कारशील, गुणी मुलगा म्हणून ओळखला जात आहे.
शिवांशच्या या सादरीकरणाने एक गोष्ट अधोरेखित केली – की आजही लहान मुलांमध्ये प्रभू श्रीरामांविषयीची क्रेझ आणि भक्ती कायम आहे. त्याचे वडील सचिन पाचनकर आणि संपूर्ण कुटुंब यामागे सतत प्रोत्साहन देत असल्यानेच शिवांशच्या प्रतिभेला अशी सुंदर दिशा मिळत आहे. श्रीराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवांशचा श्रीराम गणवेश सणाच्या उत्साहात एक वेगळीच भक्तीमय रंगत भरून गेला. या चिमुकल्या रामाच्या रूपाने संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांचे डोळे आनंदाने पाणावले. शिवांश सचिन पाचनकर याचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद असून, अशा बालगोपाळांच्या माध्यमातूनच समाजात संस्कार, श्रद्धा आणि परंपरेचे मूल्य जपले जात आहे.

Saturday, April 5, 2025

आष्टी तालुक्यातील बेलगाव चौकातील घटना खाजगी स्कूल बस झाडावर आदळली चालकासह विद्यार्थी जखमी.


आष्टी (प्रतिनिधी) - आष्टी जवळील बेलगाव चौकात शनिवारी सकाळी सव्वा आठच्या दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने खाजगी स्कूल बस झाडावर आदळली. यात चालकासह विद्यार्थि जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

अहिल्यानगर -बीड राष्ट्रीय महामार्ग परिसरातील विद्यार्थी आष्टी येथे विविध खाजगी शाळेत शिक्षण घेतात. त्यांना नेआण करण्यासाठी एक खाजजी स्कूल बस आहे. आज सकाळी नेहमी प्रमाणे विद्यार्थी घेऊन स्कूलबस आष्टीकडे निघाली. सकाळी सव्वा आठच्या दरम्यान बेलगाव चौकात चालकाचा ताबा सुटल्याने स्कूल बस ( क्रमांक एम.एच १२,एच.बी.१५१४) रस्त्याच्या बाजूच्या झाडावर आदळली. यात चालकासह काही विद्यार्थी जखमी झाली झाल्याची माहिती आहे. आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Friday, April 4, 2025

अवकाळी पावसामुळे केज तालुक्यातील केकाणवाडीत वीज पडून एका शेतकऱ्या सह गायीचा मृत्यू.


केज (प्रतिनिधी) तालुक्यात गुरुवारी दुपारी पडलेल्या आवकाळी पावसात आडस केकानवाडी या भागात वीज कोसळून  एका शेतकऱ्यासह एक गाय जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

देवीदास शहाजी केकाण वसय काणवाडी असे वीज कोसळून मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ते दुपारी आसरडोह रस्त्याकडील नवरुका शिवारात जनावरे चारीत होते. यावेळी अचानक पाऊस आल्याने ते लिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. यावेळी या झाडावर वीज कोसळून शेतकरी देवीदास केकाण जागीच ठार झाले तर एक गाय ही दगावली आहे.

वेधशाळेने गारपीट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. या अंदाजा प्रमाणे आज दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील आडस परिसरात सुसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या घटनेची माहिती तालुका प्रशासन आणि आडस पोलीस चौकीला देण्यात आली आहे.

पुण्याला राहायला जाण्यावरून दोघांत वाद पत्नीने राहत्या घरात तर पतीने शेतात गळ फास घेऊन आत्महत्या.


बीड (प्रतिनिधी) ४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह झाला; परंतु गावाकडून पुण्याला राहायला जाण्यावरून दोघांत वाद झाला. यात पत्नीने राहत्या घरात तर पतीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी बीड तालुक्यातील केतुरा येथे घडली. अक्षय गालफाडे (२७) व पत्नी शुभांगी (२१) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

अक्षय हा पुण्यात लाइट फिटिंगचे काम करीत होता. लग्नासाठी त्याने सुटी घेतली होती. बुधवारी तो परत पुण्याला जात होता. यावेळी शुभांगीनेही पुण्याला राहायला जाण्याचा हट्ट धरला. अक्षयने समजावल्यानंतरही तिने ऐकले नाही. अक्षय बसमधून पुण्याला जाण्यासाठी गेला असता इकडे पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजल्यानंतर अक्षय परत आला. यावेळी त्याच्या सासरच्या लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला. याच तणावातून अक्षयनेही शेतात जाऊन झाडाला गळफास घेतला. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर केतुरा येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  अक्षयच्या नातेवाइकांनी त्याचे मृत्यूपश्चात नेत्रदान केले.