Thursday, February 29, 2024

परळी नगर परिषद मध्ये चोरी;हबीबपुरा भागात घरफोडी,नगदी दोन लाखांसह सोन्याचे-चांदीचे दागिने पळविले.शहरात भीतीचे वातावरण.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी): शहरातील नगरपालिका कार्यालयाचे अज्ञात चोरटयाने कुलूप तोडून आतील कागदपत्रांची नासधूस केली, मात्र चोरट्यांना कुठलाही मुद्देमाल सापडला नाही. याच बाजुला असलेल्या हबीबपुरा भागातील एका घरात चोरी करून एका घरातील नगदी दोन लाख , सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीच्या तपासासाठी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

नगरपालिका कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. कार्यालयातील कपाट उघडून कागदपत्रांची नासधूस केली.  कार्यालयामध्ये कॅश नव्हती, त्यानंतर चोरट्याने हबीबपुरा येथील आफताब खान, अफजल खान यांच्या घरात चोरी केली. घरातील कपाट उघडून 26 ग्रॅम सोने, काही चांदी व नगदी दोन लाख रुपये चोरून नेले. या चोरीच्या घटनेप्रकरणी आफताब खान यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


बीडशहराचा आदर्श.जयभीम महोत्सव समितीमध्ये महिलाराज पन्नास टक्के महिलांना स्थान.


बीड (प्रतिनिधी): अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालुन देणाऱ्या बीड जयभीम महोत्सवाच्या अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने आणखी एक आदर्श पाऊल उचलले आहे. आयोजन समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान देण्यात आले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे २८ फेब्रुवारी रोजी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. विचार मंचावर बैठकीचे अध्यक्ष अरुण भोले, प्रा.प्रदिप रोडे, राजू जोगदंड, ॲड.भगवान कांडेकर, प्रशांत ससाणे, रवि वाघमारे, राजेंद्र जोगदंड, अशोक वीर, माया मिसळे, संगिता वाघमारे, पूनम वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी २०२४ च्या जयभीम महोत्सव संयोजन समिती प्रमुखपदी अरुणा आठवले, शैलजा ओव्हाळ, माया मिसळे, संगीता वाघमारे, पुष्पा तुरुकमारे, अनिता डोंगरे, लक्ष्मी सरपटे, नंदिनी ओहळ, पुनम वाघमारे, भगवान कांडेकर, अशोक ठोकळ, प्राचार्य प्रदीप गाडे,प्रा.अशोक गायकवाड,प्रा. पांडुरंग सुतार, सुमेध जोगदंड, वशिष्ठ तावरे, इंजि राहुल सोनवणे, तानाजी शिनगारे, सचिन वडमारे यांची सर्वानुमते समितीत निवड करण्यात आली.

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळे व कार्यक्रम संयोजक यांच्या विरोधात परळीत अखेर गुन्हा दाखल.

*आंबेडकरी समाजाच्या तीव्र आंदोलनापुढे अखेर पोलिसांना झुकावे लागले. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अनुसूचित जाती आणि जमातीचे कवच कुंडल असणाऱ्या ॲट्रॉसिटी कायद्या विषयी बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मानसिक विकृत अभिनेत्री केतकी चितळे आणि संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे .तमाम आंबेडकरी समाजाच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर पोलिसांना  चितेळेवर गुन्हा दाखल करावाच लागला.
   याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 25 फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद संपन्न झाली होती .या परिषदेत बोलताना मानसिक विकृत असणाऱ्या व महापुरुषांबद्दल नेहमीच आक्षेपार्ह बोलणाऱ्याअभिनेत्री केतकी चितळे हिने ॲट्रॉसिटी हा पैसे कमावण्याचा साईड बिझनेस आहे .ॲट्रॉसिटीचे रॅकेट आहे .खोट्या ॲट्रॉसिटी दाखल केल्या जातात अशा प्रकारचे बेताल आणि  विधान करून तमाम अनुसूचित जाती जमातीचा अवमान केला होता. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
    याबरोबरच मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलकांना येड्याची जत्रा म्हणून संबोधले गेले .व त्यांचा अवमान केला होता.या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात  उमटले होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आले होते.परळी येथील आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्या वतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
    अखेर चार दिवसानंतर आज दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी तसेच बेताल वक्तव्य करणारी केतकी चितळे यांच्या विरोधात कलम 295 (अ) तसेच कलम 505 (2) अन्वये दाखल करण्यात आला आहे. बाजीराव धर्माधिकारी हे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असून परळी शहर अजित दादा पवार गटाचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत. केतकी चितळे वरील हा गुन्हा म्हणजे तमाम आंबेडकरी समाजाच्या एकजुटीचा विजय  म्हणावा लागेल.

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक 4 ची 180 मीटर उंचीची चिमणी कालमर्यादा संपल्यामुळे जमीनदोस्त.


*संच क्रमांक5 ही महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने स्क्रॅपमध्ये काढलेला आहे .त्याचीही चिमणी लवकरच पाडून जमीनदोस्त केली जाणार आहे. 


परळी वैजनाथ प्रतिनिधी-मराठवाड्याचे भूषण ठरलेल्या जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक 4 ची  180 मीटर उंचीची चिमणी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आली. परळी शहराजवळ असलेल्या 210  मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक- 4 हा आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने स्क्रॅपमध्ये  काढला आहे.

औष्णिक विद्युत केंद्राचे संच चालू असताना बॉयलरमधील दगडी कोळशाच्या जळणानंतर तयार झालेला धूर हा या चिमणीतून बाहेर सोडण्यात येत असे. संच क्रमांक-4  ची 180 मीटर उंचीची चिमणी पाडण्याची प्रक्रिया आज सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली. प्रथम पोकलेनने जमिनीतील असलेली चिमणीचा भाग पाडणे सुरू केले. नंतर ब्रेकरच्या साह्याने उंच चिमणी एका बाजूने पाडण्यात आली यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी व औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षितता पाळली. 

जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीनची  120 मीटर उंचीची चिमणी 12 सप्टेंबर 2022 रोजी अशीच जमीनदोस्त केली होती .त्यानंतर 29 फेब्रुवारी रोजी संच क्रमांक चार ची चिमणी पाडण्यात आली .संच क्रमांक-4 बरोबरच संच क्रमांक-5 ही महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने स्क्रॅपमध्ये काढलेला आहे .त्याचीही चिमणी लवकरच पाडून जमीनदोस्त केली जाणार आहे . 

जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रात 30 मेगावॉट  चे दोन संच तर 210 मेगावॉट क्षमतेचे तीन संच होते .एकूण पाच संच असलेल्या जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्राची एकूण स्थापित क्षमता 690 एवढी होती. पाचही संच स्क्रॅप मध्ये काढण्यात आलेले आहेत.या सर्व संचातून गेल्या अनेक वर्षापासून वीजनिर्मिती होणे थांबले आहे. संच क्रमांक चार हा 1987 पासून कार्यान्वित करण्यात आला होता.2019 पासून हा संच  बंद ठेवण्यात आला होता . परळी तालुक्यातील दाऊतपुर व दादाहरी वडगाव शिवारातील नवीन परळी औष्णिकविद्युत केंद्रात 250 मेगावॉट  क्षमतेचे तीन नवीन संच चालू आहेत.

योग्य ती काळजी घेतली. 

या नवीन थर्मल ची एकूण  स्थापित क्षमता750 मेगावॉट  आहे. जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 210 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 4 हा आयुर्मान संपल्यामुळे स्क्रॅप मध्ये काढलेला आहे  त्या संचाची  चिमणी योग्य ती काळजी घेऊन पाडण्यात आली. - अनिल काठोये ,मुख्य अभियंता परळी औष्णिक विद्युत केंद्र परळी


Wednesday, February 28, 2024

परळीत भीषण आग आगीत दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक. लाखो रुपयांचे नुकसान.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी): शहरातील स्वामी विवेकानंद नगर भागातील शिरीष सलगरे यांच्या पत्र्याच्या  शटर च्या दुकानातील सहित्यास व लगतच्या लॉन्ड्री व फेट्याच्या दुकानास मंगळवारी रात्री अचानक  आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. रात्री उशिरा सव्वा बारा वाजता ही आग नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली. आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. या आगीत शिरीष सलगरे यांचे ४ लाख रुपये किमतीचे साहित्य व अर्जुन बुंदीले यांचे ५ लाख रुपयाचे लग्नातील फेटे व कपडे व इतर साहित्य जळाले आहे. 

येथील विवेकानंद नगर भागात श्री शिरीष सलगरे हे राहतात. त्यांच्या घरासमोरच त्यांचे पत्राची चार दुकाने आहेत या चार दुकानापैकी एका दुकानात अर्जुन बुंदिले यांचे तुळजाभवानी फेटेवाले हे भाड्याने लॉन्ड्री सेंटर व फेट्याचे दुकान आहे. या दुकानात फेटे व लॉन्ड्री चे कपडे होते. तर शिरीष सलगरे यांचे दुकानात घरगुती वापराचे साहित्य होते हे साहित्य मंगळवारी रात्री लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. रात्री साडेआठ वाजता अर्जुन बुंदिले ते नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास या दुकानातून अचानक धुरांचा लोट बाहेर आले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.

नागरिकांनी लागलीच नगरपालिकेच्या अग्निशामन विभागास माहिती दिली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आणि नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. तब्बल तीन तासांनंतर रात्री सव्वा बाराच्या सुमारास आग पूर्णपणे शमली. मात्र तोपर्यंत फेटे आणि लॉन्ड्रीमधील कपडे जळून नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले.